Sanjay Raut Uddhav Thackeray: "वसुली बहाद्दरांचा उद्धव ठाकरेंना नेहमीच अभिमान वाटतो"; भाजपाचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 07:15 PM2022-08-01T19:15:41+5:302022-08-01T19:16:11+5:30
"सचिन वाझे बद्दल पण उद्धव ठाकरेंना असाच अभिमान वाटला होता."
Sanjay Raut Uddhav Thackeray: मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना रविवारी रात्री उशिरा सक्तवसुली संचलनालयाने (ED) अटक केली. पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी आज त्यांना PMLA कोर्टाने ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली. मात्र, राऊतांवरील कारवाई ही राजकीय सूडापोटी केली जात असल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी राऊतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर बोलताना, संजय राऊतांचा मला अभिमान आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यावरूनच भाजपाने उद्धव यांना टोला लगावला.
'संजय राऊत हा माझा जुना मित्र आहे. त्याचा मला अभिमान आहे. त्याचा दोष नसतानाही त्याला अटक करण्यात आली आहे. मरण आलं तरी शरण जाणार नाही हे त्यांचं वाक्य मला खूप आवडलं. तो सच्चा शिवसैनिक आहे', अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी केली. त्यानंतर भाजपा महाराष्ट्रच्या ट्वीटर हँडलवरून ट्वीट करत उद्धव ठाकरेंना टोला लगावण्यात आला. "संजय राऊतांचा उद्धव ठाकरेंना अभिमान वाटतं तर हे साहजिक आहे. कारण, राऊतांनी ६०० मराठी कुटुंबियांना बेघर केलं. हे उद्धव ठाकरे यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट असेल. सचिन वाझे बद्दल पण उद्धव ठाकरे, आपल्याला असाच अभिमान वाटला होता. वसुली बहाद्दरांचा उद्धव ठाकरेंना नेहमीच अभिमान वाटतो", असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला.
संजय राऊतांचा उद्धव ठाकरेंना अभिमान वाटतं तर हे साहजिक आहे.
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) August 1, 2022
कारण, राऊतांनी 600 मराठी कुटुंबियांना बेघर केलं. हे उद्धव ठाकरे यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट असेल.
सचिन वाझे बद्दल पण @OfficeofUT आपल्याला असाच अभिमान वाटला होता.
वसुली बहाद्दरांचा उद्धव ठाकरेंना नेहमीच अभिमान वाटतो. pic.twitter.com/R8qsV3Iyji
उद्धव ठाकरे नक्की काय म्हणाले?
"भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी प्रादेशिक पक्षांबद्दल विधान केलंय. तुमच्याकडे आज बळ आहे पण सगळ्यांचे दिवस फिरत असतात. तुमचे दिवस फिरले की काय होईल याचा विचार तुम्ही करू शकत नाही. संजय राऊतांचा काय गुन्हा होता? मला संजय राऊतांचा अभिमान आहे. विरोधकांना वाटेल ते करून अडकवायचं अशी स्थिती सध्या देशात चालू आहे. प्रादेशिक अस्मिता आणि विरोधकांना आणि हिंदू अस्मिता चिरडून टाकण्याचा प्रयत्न भाजपकडून होतोय. पण शिवसेना संपणार नाही आणि आम्ही सारे संजय राऊतांच्या सोबत आहोत", असे उद्धव ठाकरे आपल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.