कुजबुज! उद्धव ठाकरे अन् चाय पे चर्चा; शरद पवारांचा दृष्टीकोनच वेगळा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 05:49 AM2023-02-20T05:49:29+5:302023-02-20T05:49:51+5:30

रविवारी करीरोड नाका येथे शिवसेनेने संयुक्त सभा घेत निवडणूक आयोगाविरुद्ध आंदोलन केले.

Uddhav Thackeray and Chai Pe Charcha; Sharad Pawar's approach is different | कुजबुज! उद्धव ठाकरे अन् चाय पे चर्चा; शरद पवारांचा दृष्टीकोनच वेगळा

कुजबुज! उद्धव ठाकरे अन् चाय पे चर्चा; शरद पवारांचा दृष्टीकोनच वेगळा

googlenewsNext

उद्धव ठाकरे अन् चाय पे चर्चा

निवडणूक आयोगाने शिवसेनेविरुद्ध निकाल दिल्याने पुन्हा एकदा शिवसैनिक रस्त्यावर आला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रतिक्रिया उमटत असतानाच गल्लीगल्लीतला सैनिकसुद्धा रस्त्यांवर उतरला आहे. रविवारी करीरोड नाका येथे शिवसेनेने संयुक्त सभा घेत निवडणूक आयोगाविरुद्ध आंदोलन केले. हे आंदोलन होते नाही तोवर पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जात असतानाच आता सर्वसामान्य नागरिकांकडून ठाकरे की शिंदे गट यावर तावातावाने गप्पा मारल्या जात असून, शिंदे गटाने कितीही उड्या मारल्या तरी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयावर उद्धव ठाकरे यांचाच झेंडा फडकणार...या चाय पे चर्चेने आता नाक्यानाक्यावर आणखी वेग पकडला आहे.

आदित्य यांचा दौरा रद्द का झाला?

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वसई दौरा करण्याचे जाहीर केले होते, मात्र दोन वेळा अगदी शेवटच्या क्षणी दौरा रद्द झाल्याचे सांगण्यात आले. हा दौरा वसईतील ठाकरे गटाच्या शिवसेनेसाठी आवश्यक होता. मात्र आदित्य ठाकरे न आल्याने शिवसैनिकांनी केलेली जोरदार तयारी वाया गेली. एकीकडे शिंदे गटाने वसई तालुक्यात संघटना बांधणीकडे लक्ष दिले आहे. नजीकच्या काळात वसई-विरार पालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यासाठी संघटना बांधणी आवश्यक आहे. शिवसैनिकांना नेत्यांनी अशा वेळी येऊन कार्यक्रमातून संघटनेचा कार्यक्रम पुढे नेला पाहिजे व संघटना बांधणीला बळ दिले पाहिजे, अशीच चर्चा शिवसैनिकांत होताना दिसत आहे.

शरद पवार यांचा दृष्टिकोन 

महिनाभरापूर्वी माझ्या दोन्ही डोळ्यांचा प्रॉब्लेम झाला होता. तेव्हा डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करायचे ठरवले. एकाचवेळी दोन्ही डोळ्यावर शस्त्रक्रिया करा, असा माझा आग्रह होता. पण माझे दोन्ही डोळे बंद असतील, तर महाराष्ट्रात काय चालले आहे, हे मला दिसणार कसे? असा प्रश्न डॉक्टरांनाच पडला. पण शस्त्रक्रिया झाली. डॉक्टरांनी डोळ्यात काय बसवले माहीत नाही, पण आता मला व्यवस्थित दिसतेय. कोण काय करतेय हे वेगळे सांगायची गरज नाही...हा किस्सा शरद पवार यांनी इंदापूरच्या सभेत सांगितला आणि हास्यकल्लोळ झाला. शिवाय पवारांच्या बदललेल्या दृष्टिकोनाची चर्चाही रंगली.

 

Web Title: Uddhav Thackeray and Chai Pe Charcha; Sharad Pawar's approach is different

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.