पुन्हा ठाकरे बंधूंची भेट, नात्यातील दुरावा मिटला; कौटुंबिक सोहळ्यात राज-उद्धव एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 13:49 IST2024-12-22T12:36:37+5:302024-12-22T13:49:04+5:30
आता कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र आलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे राजकीय पटलावर कधी एकत्र येणार हा खरा प्रश्न आहे.

पुन्हा ठाकरे बंधूंची भेट, नात्यातील दुरावा मिटला; कौटुंबिक सोहळ्यात राज-उद्धव एकत्र
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या निकालात दोन्ही ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसला त्यानंतर या भावांनी एकत्र यावं अशी चर्चा सुरू झाली. मात्र त्याबाबत दोन्ही पक्षांनी अधिकृत दुजोरा दिला नाही. त्यातच मागील ७ दिवसात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची दोनदा भेट झाली आहे. कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त ठाकरे बंधू भेटले असले तरी त्यांच्या भेटीतून यांच्यातील दुरावा कमी होण्याचे संकेत मिळत आहेत. राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाचं आज लग्न असून त्यासाठी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे उपस्थित होते.
दादरच्या राजे शिवाजी विद्यालयात आज राज ठाकरेंच्या बहिणीच्या मुलाचा लग्नसोहळा होता. भाच्याच्या या लग्नाला शुभेच्छा देण्यासाठी राज आणि उद्धव दोन्ही मामा एकत्र आले. उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब या सोहळ्याला हजेरी लावत वधू वरांना आशीर्वाद दिले. या लग्न सोहळ्याचे काही व्हिडिओ, फोटो आता समोर आलेत. त्यात उद्धव आणि राज दोन्ही नेते बाजूला उभे राहून जोडप्यांवर अक्षता टाकत आहेत असं दिसून येते. विशेष म्हणजे नुकतेच राज ठाकरे यांनी रश्मी ठाकरेंचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्या मुलाच्या लग्नाला उपस्थिती लावली होती.
श्रीधर पाटणकर यांचा मुलगा शौनक याचा विवाह सोहळा मागील रविवारी मुंबईतील ताज लँड्स या हॉटेलमध्ये झाला. पाटणकर कुटुंबीयांच्या निमंत्रणाला मान देत राज ठाकरे लग्नाला आले होते. मात्र, सोहळ्यात दोन्ही ठाकरे बंधूंची प्रत्यक्षात भेट झाली नाही. निवडणुकीत उद्धव आणि राज यांनी एकमेकांवर टीका केली होती. परंतु, मनसे आणि उद्धवसेनेला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याच्या मागणीने जोर धरला होता.
ठाकरे बंधूचे राजकीय मनोमिलन कधी?
यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात ठाकरे बंधूंना मोठा फटका बसला. राज ठाकरे यांच्या मनसेला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हेदेखील निवडणुकीत पराभूत झाले. त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराने पराभव केला. तर अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद सांभाळलेल्या उद्धव ठाकरेंच्या पक्षाला राज्यात केवळ २० जागांवर समाधान मानावे लागले आहे. ठाकरे बंधू यांचा निवडणुकीतील पराभव पाहता अनेक मराठी माणसांकडून दोन्ही बंधूंनी एकत्र यावे अशी गळ घालण्यात आली. त्याशिवाय दोन्ही पक्षातील काही कार्यकर्तेही हीच मागणी करत आहेत. त्यात आता कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र आलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे राजकीय पटलावर कधी एकत्र येणार हा खरा प्रश्न आहे.