Uddhav Thackeray Eknath Shinde: "तुम्हाला शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे हवेत, पण त्यांचा मुलगा नको"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2022 07:02 PM2022-10-09T19:02:36+5:302022-10-09T19:03:47+5:30
Uddhav Thackeray Eknath Shinde: उद्धव ठाकरेंचा फेसबुक लाइव्हमधून शिंदे गटावर घणाघात
Uddhav Thackeray Eknath Shinde: महाराष्ट्रात जून महिन्यात मोठा राजकीय उलटफेर झाला. शिवसेनेतून ५० आमदारांनी बंड केले आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वेगळे झाले. त्यानंतर, आकड्यांच्या बळावर, शिवसेना हा पक्ष आमचाच आहे असा दावाही शिंदे गटाकडून करण्यात आला. त्यामुळे आता खरी शिवसेना कोणाची... ठाकरेंची की शिंदेंची? याचा फैसला निवडणूक आयोगात होणार आहे. पण तत्पूर्वी, अंधेरीची पोटनिवडणूक लागली असल्याने पक्ष चिन्ह आणि नावाचा काय फैसला होतो याकडे साऱ्यांचे लक्ष होते. निवडणूक आयोगाने तात्पुरते या पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवून ठेवले असून, शिवसेना हे नाव किंवा धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरे किंवा शिंदे कोणालाच वापरता येणार नाही. या निर्णयावर विविध प्रतिक्रिया येत असतानाच, आज उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आणि शिंदे गटावर घणाघाती टीका केली.
तुम्हाला शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे पाहिजेत, पण त्यांचा मुलगा नको!
"निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर मला नक्कीच राग आलाय आहे. पण त्यासोबतच दु:खही होत आहे. या उलट्या काळजाच्या माणसांनी त्यांच्या राजकीय आईच्या काळजात कट्यार घुसवली. ४० डोक्याच्या रावणाने प्रभू श्रीरामाचे धनुष्यबाण गोठवले. या लोकांच्या मागे असलेल्या महाशक्तीला या गोष्टींमुळे नक्कीच उकळ्या फुटत असतील. मराठी माणसाची भक्कम एकजूट तुम्ही फोडायला निघाला आहात. तुम्हाला शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे पाहिजेत, पण त्यांचा मुलगा नको. असो.. काहीही असले तरीही मी कुठेही डगमगललो नाही, आत्मविश्वास मला माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी शिकवलाय", असे उद्धव ठाकरे म्हणाले.
"संकटातही संधी असते असं म्हणतात, मी याच संधीची वाट पाहतोय, या संधीचं मी सोनं करणार
मिंधे गटाचा वापर भाजपा करून घेतोय, पण यांचा उपयोग जेव्हा संपले तेव्हा यांना भाजपा बाजूला फेकून देईल. शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात एक नक्की झाले की सारेच आपमतलबी नसतात. पण आता शिवसैनिकांना दमदाट्या सुरू आहेत. शिवसैनिकांबद्दल जे काँग्रेसने केलं नाही, ते तुम्ही करताय. तुम्ही शिवसेना संपवायला निघालाय. जर तुमची बुद्धी गोठलेली नसेल तर तुम्ही आमच्या पक्षाचे नाव आणि वडिलांचे नाव न वापरता निवडणुकीला सामोरे जा", असे आव्हान त्यांनी शिंदे गटाला दिले.
३ नावे आणि ३ चिन्हांचा दिला पर्याय
उद्धव ठाकरे यांच्या गटाने निवडणूक आयोगाकडे अंधेरी पोटनिवडणुकीसाठी नावांचे आणि निवडणूक चिन्हांचे तीन पर्याय दिले आहेत. पक्षाच्या चिन्हासाठी त्रिशूळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल असे तीन चिन्हांचे पर्याय ठाकरे गटाकडून देण्यात आले आहेत. तर, पक्षाच्या नावांसाठी शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा तीन नावांचा पर्याय निवडणूक आयोगाकडे देण्यात आला आहे. यापैकी एक नाव आणि एक चिन्ह लवकरात लवकर आम्हाला देण्यात यावे जेणेकरून आम्हाला जनतेच्या दरबारात जाता येईल, अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी केली आहे.