उद्धव ठाकरे महापौर बंगल्याच्या आरोपावर उत्तर देणार ?
By Admin | Published: February 15, 2017 02:17 PM2017-02-15T14:17:16+5:302017-02-15T18:23:33+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी आपल्या पहिल्याच जाहीर सभेत बोलताना शिवसेना- भाजपावर जोरदार शाब्दीक हल्ला चढवला.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - मुलाच्या आजारपणामुळे उशिराने प्रचारात उतरलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी आपल्या पहिल्याच जाहीर सभेत बोलताना शिवसेना- भाजपावर जोरदार शाब्दीक हल्ला चढवला. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावरुन शिवसेनेवर गंभीर आरोप केले.
उद्धव ठाकरेंची नजर समुद्रकिनारी वसलेल्या महापौर बंगल्यावर आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या नावाखाली उद्धव ठाकरेंना तो बंगला हडपायचा आहे असा स्पष्ट आरोप त्यांनी केला. महापौर बंगल्याच्या जागी स्मारक आणि महापौरांचा बंगला राणीच्याबागेत. जिथे एकही प्राणी नाहीय. लोक तिथे महापौरांना बघायला येणार अशी टीका राज यांनी केली. शिवसेनेच्या कारभाराचे वाभाडे काढले. आतापर्यंत शिवसेना पक्षप्रमुख प्रत्येक प्रचारसभेमध्ये भाजपावर तुटून पडले पण त्यांनी मनसेविषयी बोलण्याचे टाळले आहे.
मनसेविषयी बोलून त्यांना चर्चेत आणण्यापेक्षा त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याची रणनिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आखली आहे. पण आता राज ठाकरेंनी शिवसेनेला लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे मनसेविषयीची भूमिका बदलून राज ठाकरेंनी केलेल्या आरोपांना उत्तर देणार ?, राज यांनी टाळीसाठी केलेल्या फोनवर खुलासा करणार ? असे प्रश्न उपस्थित आहेत.
2009 लोकसभा निवडणुकीच्यावेळी शिवसेनेने असेच मनसेला महत्व न देण्याची रणनितीआखून त्यावेळी आरोपांकडे दुर्लक्ष केले होते. राज मात्र प्रत्येक सभेतून शिवसेनेच्या धोरणाविषयी प्रश्न उपस्थित करत होते. त्यावेळी शिवसेनेला फटका बसला होता. त्यामुळे शिवसेना रणनिती बदलणार का ? त्याचे उत्तर लवकरच मिळेल.