"जन्म देणाऱ्या आईलाच गिळायला निघालेली ही अवलाद...;" मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 12:56 PM2022-07-26T12:56:27+5:302022-07-26T12:58:44+5:30
त्यांना ताकद दिली, पण त्या ताकदीने त्यांनी नुसता उलटा वार नाही केला, तर...
राजकारणात ज्या आईने जन्म दिला त्या आईला गिळायला निघालेली ही अवलाद आहे. नुसते आईवर वार करणारे, असे आपण म्हणत होतो. पण केवळ तसे नाही. राजकारणात ज्यांनी यांना जन्म दिला, त्या आईला म्हणजे शिवसेनेला गिळायला निघालेली अवलाद आहे, अशा शब्दात शिवसेना पत्रक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. ते शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी त्यांची ही मुलाखत घेतली आहे.
यावेळी, ज्यांना मिळाले नाही किंवा ज्यांना कमी मिळाले ते आपल्याबरोबर राहिलेत, असा प्रश्न राऊतांनी केला असता, "मला हेच म्हणायचंय की, हीच शिवसेनेची ताकद आहे. बाळासाहेबांनी सामान्यांना असामान्यत्व दिलं, हीच शिवसेनेची ताकद आहे. आता पुन्हा एकदा या सामान्यांतून असामान्य लोक घडवण्याची वेळ आली आहे आणि म्हणून मी माझ्या तमाम शिवसैनिकांना, माताभगिनींना आणि बांधवांना विनंती करतो की, चला परत उठा, आता पुन्हा एकदा सामान्यांना असामान्य बनवूया... कारण ही साधी लोकं होती आणि पुन्हा तेच म्हणेन की चूक माझी आहे, की त्यांना ताकद दिली. पण त्या ताकदीने त्यांनी नुसता उलटा वार नाही केला, तर राजकारणामध्ये ज्या आईने जन्म दिला त्या आईला गिळायला निघालेली ही अवलाद आहे. नुसते आईवर वार करणारे असं आपण म्हणत होतो. पण केवळ तसं नाहीये. राजकारणात ज्यांनी यांना जन्म दिला त्या आईला म्हणजे शिवसेनेला गिळायला निघालेली अवलाद आहे. पण तितकी ताकद त्यांच्यामध्ये नाही. कारण आई ही शेवटी आई असते," असे ठाकरे यांनी म्हटले आहे.
राजकारणात ज्यांनी यांना जन्म दिला त्या आईला म्हणजे शिवसेनेला गिळायला निघालेली ही अवलाद आहे. पण तितकी ताकद त्यांच्यामध्ये नाही. कारण आई ही शेवटी आई असते.
— Shivsena Communication (@ShivsenaComms) July 26, 2022
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे pic.twitter.com/VWrL3yWdlW
ठाकरे आणि शिवसेनेचे नाते तोडून दाखवा -
मुलाखती दरम्यान, ते बाळासाहेबांवर हक्क सांगत आहेत? असा सवालकेला असता, उद्धव ठाकरे म्हणाले, “ठाकरे आणि शिवसेना हे नाते तोडून दाखवा, हे माझे त्यांना आव्हान आहे. मात्र ते करताना माझ्या वडिलांचे फोटो लावून मते मागू नका. प्रत्येकाला आई-वडील असतात. मला माझ्या आई-वडिलांबद्दल आदर आहे. तसा प्रत्येकाला प्रत्येकाच्या आई-वडिलांबद्दल आदर असला पाहिजे. गेल्याच आठवड्यांत गुरुपौर्णिमा झाली. मी माझ्या वडिलांना आणि आजोबांना गुरू मानतो. प्रत्येकाने मातृदेवभव, पितृदेवभव, असे देव मानले पाहिजे. स्वतःच्या आई-वडिलांचे फोटो लावावेत आणि मते मागावीत. एवढेच नाही, तर आज माझ्या दुर्दैवाने माझे आई-वडील माझ्यासोबत, असे नाहीयेत, पण ते माझ्यात आहेत, असे मी मानतो,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.