दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंचा उल्लेख टाळला
By balkrishna.parab | Published: October 1, 2017 08:07 AM2017-10-01T08:07:36+5:302017-10-01T08:11:15+5:30
विजयादशमीच्या मुहुर्तावर झालेल्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना केंद्रातील मोदी सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. मात्र गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर सातत्याने टीका करणाऱ्या नारायण राणे यांचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण भाषणात टाळला.
मुंबई - विजयादशमीच्या मुहुर्तावर झालेल्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना केंद्रातील मोदी सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. मात्र गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर सातत्याने टीका करणाऱ्या नारायण राणे यांचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण भाषणात टाळला.
काँग्रेसच्या नेतृत्वावर नाराज होत पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींवर टीका केली होती. तसेच आपल्या भाजपा प्रवेशात आडकाठी ठरलेल्या उद्धव ठाकरेंवरही राणेंनी टीकास्र सोडले होते. बाळासाहेबांना उद्धव ठाकरेंएवढा त्रास कुणीही दिला नसेल, अशी बोचरी टीका नारायण राणेंनी दसऱ्याच्या पूर्वसंध्येला डोंबिवलीत बोलताना केली होती. त्यामुळे राणेंच्या टीकेला उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यातून प्रत्युत्तर देतील, अशी अपेक्षा होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातील आपल्या भाषणात राणेंचा अनुल्लेख करणेच योग्य समजले.
दरम्यान, दसरा मेळाव्यातील भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि मोदींवर जोरदार टीका केली. शिवसेनेचे सगळे काही खणखणीत अन् ठणठणीत असते. आम्ही सरकारला साथही देऊ आणि जनतेच्या प्रश्नांवर प्रसंगी लाथा मारू, असे सांगत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना केंद्र व राज्य सरकारमध्ये कायम राहणार असल्याचे शनिवारी स्पष्ट केले.
दसरा मेळाव्यात ते म्हणाले की, देशभर कारभाराचा चिखल झाला आहे. मळच मळ दिसतो, कमळ कुठे दिसत नाही. स्वत: अच्छे दिनचे स्वप्न पाहणारे सरकार सामान्यांची झोप उडवत आहे. उद्धव यांनी पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केले. सहनशीलतेचा अंत पाहू नका. वाटेल त्या क्षणी निर्णय घेऊ, एवढाच काय तो इशारा ठाकरे यांनी दिला.
मेळाव्यासाठी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पण गर्दीचा आकडा ओसरल्याचे दिसत होते. सत्तेतून बाहेर पडण्याची भूमिका उद्धव जाहीर करतील, या अपेक्षेने आलेल्या शिवसैनिकांची निराशा झाल्याचे जाणवत होते.
आम्ही सत्तेत का आहोत असा सवाल करणाºयांना काश्मीर, बिहारमध्ये तत्वांशी तडजोड करून उपमुख्यमंत्रीपद घेतलेले कसे चालते?, असा सवाल करून,ठाकरे यांनी २५ वर्षांपासूनच्या मित्राला भाजपा संपवायला निघाल्याचा आरोप केला. संपवण्याचा प्रयत्न केल्यास देशच उसळेल असा इशारा त्यांनी दिला. सत्तेत राहून हिंदुत्व, महागाई, महिलारक्षण, शेतकºयांची कर्जमुक्ती यावर आमचे आंदोलन सुरूच राहील आणि ते चिघळेल, असे सांगून ते म्हणाले की, पंतप्रधान वा कुणाविषयी आचकट विचकट घोषणा देऊ नका, ती आपली संस्कृती नाही.