महाराष्ट्रात सर्वात आधी उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला; CM एकनाथ शिंदेंचा थेट निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 05:56 PM2024-08-18T17:56:51+5:302024-08-18T17:57:56+5:30
शरद पवारांनी स्वत: त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे. मुख्यमंत्र्यांना राज्याची परिस्थिती माहिती असावी. घरात बसून राज्य करू शकत नाही हे त्यांनी पुस्तकात लिहिलं आहे असंही एकनाथ शिंदेंनी सांगितले.
मुंबई - उद्धव ठाकरे नव्हे तर आमच्यावर अन्याय झाला. शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला मग दु:ख का?, सोन्याचा चमचा घेणारेच, साखर कारखाने असणारेच मुख्यमंत्री बनायला हवेत का? महाराष्ट्रात सर्वात आधी उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला. मुख्यमंत्री बनण्यासाठी त्यांनी खूप आधीच रणनीती बनवली होती असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
एएनआयला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ शिंदे म्हणाले की, निवडणुकीच्या आधी युती करून निकालानंतर मुख्यमंत्री बनण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसारख्या पक्षांशी हातमिळवणी केली. लोकांनी युतीला मतदान केले होते. पक्ष का फुटतो? ५० आमदार का जातात, लाखो कार्यकर्ते का जातात याचे आत्मपरिक्षण करायला हवे. जो गेला तो कचरा, आमची चूक काय, आम्ही पक्षाला ३०-४० वर्ष दिली, कुटुंबाचा विचार केला नाही. संपूर्ण जीवन आम्ही पक्षासाठी काम केले. गद्दारी तुम्ही केली. मोठी गद्दारी केली. कार्यकर्त्यांची भावना समजणे हे नेत्याचे काम असते असं त्यांनी सांगितले.
तसेच मुख्यमंत्री बनण्याचं उद्धव ठाकरेंचं खूप वर्षाचं स्वप्न होते. मुख्यमंत्री बनण्याचं सर्वकाही गुपित ठेवण्यात आले. कोण मुख्यमंत्री बनाव हे तुमच्या पक्षाचा प्रश्न होता. शरद पवारांनी मला ते सांगितले. भाजपाने अनेक राज्यात मित्रपक्षांचे कमी आमदार असूनही मुख्यमंत्री बनवले होते. ज्यादिवशी निकाल आले तेव्हा उद्धव ठाकरेंनी आमच्यासाठी सर्व दरवाजे खुले आहेत असं विधान केले. मुख्यमंत्री बनायचं या रणनीतीने त्यांनी सर्वकाही ठरवले होते. गुवाहाटीला जाणं ही आमची रणनीती होती. उद्धव ठाकरेंचा मला फोन आला. मी रस्त्यात जाताना त्यांच्याशी बोलत होतो. तुम्ही येऊन दाखवा, लाखो लोक रस्त्यावर येतील. वरळीतूनच तुम्ही जायचं आहे अशा धमक्या दिल्या. मी मुंबईत आलो तिथे रोडने प्रवास केला. धमक्या कुणाला देता, मी कुणाला घाबरत नाही असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं.
दरम्यान, अनिल देशमुख गृहमंत्री असताना भ्रष्टाचार उघडपणे सुरू होता. मी हे मुख्यमंत्री आणि अजित पवारांनाही सांगितले होते. गृह विभाग हे कायदा सुव्यवस्था सांभाळणारा विभाग आहे. मात्र तो भ्रष्टाचार सुरूच होता त्याची भरपाई देशमुखांना करावी लागली. मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांना बोलायला हवं होते. आमचे कार्यकर्ते जेलला जात होते. आमदारांना मतदारसंघात काम करता येत नव्हते. विचारधारेला फटका बसत होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर काही बोलले त्यावेळी मौन बाळगावं लागत होते. आम्ही हिंदुत्वाचा विचार पुढे करत असलो तरी दुसऱ्या धर्म जातीचा अपमान केला नाही. मात्र आमच्या विचारधारेला तोडमोड करण्याचं काम मविआत होत होते. त्यामुळे आमदार चिंतेत होते. शरद पवारांनी स्वत: त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे. मुख्यमंत्र्यांना राज्याची परिस्थिती माहिती असावी. घरात बसून राज्य करू शकत नाही हे त्यांनी पुस्तकात लिहिलं आहे असंही एकनाथ शिंदेंनी सांगितले.
विरोधकांसह मलाही अडकवण्याचा कट
देवेंद्र फडणवीस आणि इतरांना अटक करण्याची योजना सुरू होती. भाजपा आमदार फुटतील त्यातून महाविकास आघाडी मजबूत होईल असं त्यांचे राजकारण होते. परंतु त्यांच्यासोबत काम करणारा एकनाथ शिंदे, जो २५-३० वर्ष तो तुमचा सहकारी आहे त्यालाही अडकवा आणि अटक करा असं सुरू होते. मला याची भनक लागली होती. मी कुणाला घाबरत नाही. जर माझ्याविरोधात असं कुणी करत असेल तर मी बाळासाहेबांची शिकवण आणि दिघेंची शिकवण आहे तसं मी करेन. गडचिरोलीचा मी पालकमंत्री होतो तेव्हा माझी सुरक्षा हटवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी गृह विभागाला दिले होते. जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा मला हे वरून आदेश होते असं अधिकाऱ्यांकडून समजलं असा खुलासा एकनाथ शिंदेंनी केला.
विरोधकांकडून मराठा समाजाचा राजकीय वापर
मराठा समाज हा सामाजिक आणि आर्थिक मागासलेला आहे. जेव्हा देवेंद्र फडणवीस यांचे सरकार होते त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले होते. हे आरक्षण हायकोर्टात टिकवलं मात्र दुर्दैवाने सुप्रीम कोर्टात हे प्रकरण गेले तेव्हा राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होते. त्या सरकारने सुप्रीम कोर्टात योग्य बाजू मांडली नाही. मराठा समाजाचा राजकारणासाठी महाविकास आघाडीने वापर केला. माथाडी कामगार, ऊसतोड कर्मचारी, डबेवाले यात बहुतांश मराठा गरीब आहे. विदर्भ, मराठवाड्यातील मराठा शेतकरी आत्महत्येचा मार्ग निवडतो. आमचे सरकार आल्यापासून आम्ही सुप्रीम कोर्टात मराठा समाज कसा मागासलेला आहे त्याची बाजू मांडत आहोत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
आम्ही टीममधून काम करतोय...
महाराष्ट्रात भाजपाचे जास्त आमदार ते वास्तव आहे. आजही आम्ही एकत्रित काम करतोय. देवेंद्र फडणवीसांना मी मुख्यमंत्रिपेक्षा कमी पाहत नाही. आम्ही टीम म्हणून काम करतोय. आमचे उद्दिष्टे एकच लोकांना काय द्यायचे, राज्याच्या हिताचं काय करायचे. मविआने अडीच वर्षात काय केले आणि आम्ही काय करतोय याची तुलना करा. आम्ही त्यांच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त काम केले आहे असं शिंदेंनी सांगितले.