राजकीय निवृत्तीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान; "मुख्यमंत्रिपदाची इच्छा नाही..."
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 11:05 AM2024-09-16T11:05:29+5:302024-09-16T11:06:45+5:30
कदाचित कॅबिनेटमध्ये तुमची ही मागणी मान्य करतील, परंतु हा दगाफटका तुम्हाला नाही महाराष्ट्राला होणार आहे असा आरोप उद्धव ठाकरेंनी करत महायुती सरकारवर हल्लाबोल केला.
अहमदनगर - मला मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न तेव्हाही नव्हतं आणि आताही नाही. सत्ता असली काय अन् नसली काय तुम्ही माझ्यासोबत असल्याने सत्ता माझ्याकडेच आहे असं सांगत उद्धव ठाकरेंनी राजकीय निवृत्तीवर जाहीर भाष्य केले आहे. शिर्डी इथं सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन महाधिवेशनात ते बोलत होते.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्यांनी माझ्याशी गद्दारी केली, या लोकांना कुटुंबाचं मानलं होतं. ज्या शिवसेनेच्या कुशीतून यांचा राजकीय जन्म झाला त्या शिवसेना आईवर हे वार करू शकतात ते तुमच्यावर वार करू शकत नाहीत? म्हणून मला हे सरकार नकोय. मला मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न तेव्हाही नव्हते आणि आताही नाही. मी अजून निवृत्त झालो नाही त्यामुळे पेन्शन किती मिळणार मला माहिती नाही. सत्तेतून मला कुणी निवृत्त करू शकत नाही. सत्ता असली काय अन् नसली काय तुम्ही माझ्यासोबत असल्याने सत्ता माझ्याकडेच आहे. जनतेची सत्ता आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे. सरकार वेगळे, शिवसेनाप्रमुख सत्तेत कुठे होते? परंतु सत्ता त्यांच्याकडे होती ना...जनता माझी ताकद आहे ती माझी सत्ता आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच मला सत्तेची पर्वा नाही, मला तुमच्या कुटुंबाची, तुमच्या आयुष्याची चिंता आहे. सत्ता येते आणि सत्ता जाते. गेलेली सत्ता परत येणार आहे. नक्की येणार, खेचून आणणार, तुम्हाला मी न्याय देणार. पण एक लक्षात घ्या. एकजूट, दीड वर्षापूर्वी तुम्ही नागपूरात आला होता. स्टेडिअम भरले होते तेव्हा तुमच्यातला एक गट तिथे सटकला आणि तुमच्या आंदोलनावर पाणी ओतलं. फोडाफोडीचं राजकारण जे शिवसेनेसोबत केले ते तुमच्यासोबत करणार नाहीत असं तुम्हाला वाटतंय? जर एकजूट झाली तर सरकार गेल्यात जमा आहे. यांना पेन्शन कसाला टेन्शन देण्याची वेळ आलीय असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, आमरण उपोषणाची तुम्ही हाक दिली परंतु हे उपोषण करू नका, तुम्ही आधीच उपाशी आहात. आपलं आंदोलन असं असायला हवं की या लोकांना सत्तेशिवाय उपाशी ठेवले पाहिजे. आंदोलनाची मशाल पेटल्यानंतर तुमच्यात फूट पडू देऊ नका. जुनी पेन्शन योजना आपण सगळे मिळून अंमलात आणून दाखवल्याशिवाय राहायचे नाही हा तुम्हाला शब्द देतो. माझा शब्द आणि तुमची ताकद हे सत्ताधारी टीव्हीवर बघतायेत. निवडणूक येईपर्यंत ज्यांना आपली बहीण आहे हे माहिती नव्हते त्यांनी लाडकी बहीण योजना आणली. निवडणुकीच्या तोंडावर या सरकारने पेन्शन योजना आणली तर तुम्ही त्यांना मत देणार का?, निवडणुकीला २ महिने आहेत. आपले सरकार तुम्ही निवडून आणा, मी तुमची मागणी मान्य करतो. हे मी वचन दिल्यानंतर सत्ताधाऱ्यांना घाम फुटणार आहे. कदाचित ते कॅबिनेटमध्ये ही मागणी मान्य करतील परंतु हा दगाफटका तुम्हाला नाही महाराष्ट्राला होणार आहे असा आरोप उद्धव ठाकरेंनी करत महायुती सरकारवर हल्लाबोल केला.
आम्ही कंत्राटी कामगार....
राजकारण्यांना किती पेन्शन मिळते आणि तुम्हाला किती पेन्शन मिळते ही तफावत तुम्ही पाहिली, आम्ही राजकारणी, मी मुख्यमंत्री होतो, आता माजी मुख्यमंत्री झालो, काही मंत्री होतात, काही माजी मंत्री होतात काही पुन्हा मंत्री होतात. आम्ही कंत्राटी कामगार आहोत तुम्ही पर्मनंट कामगार आहात. मग कंत्राटी कामगारांना ५० खोके मिळत असतील तर माझ्या कायमच्या कामगारांना का मिळत नाहीत? सरकार तुम्ही चालवताय, आम्ही चालवत नाही. योजना आम्ही जाहीर करतो, परंतु तुम्ही त्या योजना घराघरापर्यंत राबवता, जर तुम्ही साथ दिली नाही तर कुठलेही सरकार चालू शकत नाही असंही उद्धव ठाकरेंनी सांगितले.