...तेव्हा नवरा-बायको दोघे बॅग भरून घराबाहेर पडले; रामदास कदमांचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 11:30 AM2024-06-22T11:30:22+5:302024-06-22T11:31:00+5:30

रामदास कदम यांनी एका मुलाखतीत उद्धव ठाकरेंवर घणाघात केला असून मातोश्रीतील अनेक गोष्टी अजून बाहेर पडल्या नाहीत असं सांगत एक गौप्यस्फोट केला आहे. 

Uddhav Thackeray blackmailed Balasaheb Thackeray for Narayan Rane ouster in party- Shiv Sena leader Ramdas Kadam | ...तेव्हा नवरा-बायको दोघे बॅग भरून घराबाहेर पडले; रामदास कदमांचा मोठा गौप्यस्फोट

...तेव्हा नवरा-बायको दोघे बॅग भरून घराबाहेर पडले; रामदास कदमांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई - नारायण राणेंची हकालपट्टी बाळासाहेबांना ब्लॅकमेल करून उद्धव ठाकरेंनी करायला लावली. मातोश्रीतल्या अनेक गोष्टी अजून बाहेर आल्या नाहीत. अन्याय सहन करू नका ही बाळासाहेबांची शिकवण आहे असं सांगत शिवसेना नेते रामदास कदमांनीउद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. 

शिवसेना नेते रामदास कदम म्हणाले की, नारायण राणेंची शिवसेनेतून हकालपट्टी बाळासाहेब ठाकरेंनी केली नाही. उद्धव ठाकरेंनी हकालपट्टी करायला लावली. मी या घटनेचा साक्षीदार आहे. राणेंना पक्षातून काढून टाका नाहीतर मी घर सोडून चाललो, नवरा-बायको दोघेही बॅगा भरून बाहेर निघाले होते. उद्धव ठाकरेंनी अक्षरश: बाळासाहेबांना ब्लॅकमेल केले आणि नारायण राणेंची हकालपट्टी करायला लावली फक्त याला मुख्यमंत्री व्हायचं होतं. हे वास्तव आहे आणि मी साक्षीदार आहे. हे आज मी पहिल्यांदा बोललोय असा दावा कदमांनी केला. मुंबई तकच्या मुलाखतीत ते बोलत होते

तसेच  अनेक गोष्टी आहेत. मातोश्रीतल्या अनेक गोष्टी बाहेर बोलत नाही, काही पथ्य आम्हीही पाळतो. माझ्या मुलाला राजकारणातून मुळासकट उपटण्याचा प्रयत्न केला. मुलाला पुढे आणण्यासाठी शिवसेनाप्रमुखांसोबत काम केलेल्या नेत्यांची हकालपट्टी आणि बाजूला करून टाकलं हे आम्हाला कळत नाही? प्रत्येक गोष्ट आम्हाला कळते. सहन होत नव्हतं आणि सांगताही येत नव्हते. बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलं, अन्याय सहन करू नका. अन्याय सहन करणाराही दोषी आहे असं रामदास कदमांनी म्हटलं.

दरम्यान, मुख्यमंत्री असताना अर्थ खात्याच्या फाईलींवर डोळे झाकून सह्या केल्या, आमच्या माणसाने सह्या केल्या, मुख्यमंत्र्यांच्या सहीशिवाय एक पैसा पुढे जात नाही. उद्धव ठाकरे २ वर्षात मंत्रालयात किती वेळा गेले? आम्ही अजितदादांना दोष देण्यापेक्षा आमचाच माणूस नालायक निघाला, म्हणजे त्या पदाला लायक नाही. आता एकनाथ शिंदेंच्या कारकिर्दीत एकदाही बातमी आली का, अजित पवारांनी या आमदारांना निधी दिला वैगेरे, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून व्यवस्थित काम केले असते, कुणाला निधी देतोय हे पाहिले असते तर आज ही वेळ आली नसती असं रामदास कदमांनी सांगितले.

पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारलं

उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारले, स्वत: मुख्यमंत्री बनले, मुलाला मंत्री बनवले आणि दिवाकर रावते, रामदास कदम यासारख्या नेत्यांना बाहेर काढले. मंत्रिपद काढले आणि आमदारकीही काढली. मुलाच्या मतदारसंघात आमदारकी दिली. ज्या ज्यावेळी शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याच्या सभा झाल्या, बाळासाहेब असताना प्रत्येक सभेत माझं भाषण आहे. पण बाळासाहेब गेल्यानंतर माझी भाषणे बंद केली. मनोहर जोशींना ज्याप्रकारे अपमानित करून बाहेर काढले त्या मेळाव्यालाही मी होतो. मनोहर जोशी व्यासपीठावर आले तेव्हा त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पायाला हात लावला तेव्हा उद्धव ठाकरेंनी दुसरीकडे तोंड केले हे मी पाहिलंय. समोर घोषणा चालू केल्या आणि मनोहर जोशींना हाकलवून लावलं हे पाप नाही? सुधीर जोशी, मनोहर जोशी, छगन भुजबळ, दत्ताजी साळवी, दत्ताजी नलावडे, मधुकर सरपोतदार, वामनराव महाडिक या सर्वांनी शिवसेना मोठी केली असं सांगत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.  
 

Web Title: Uddhav Thackeray blackmailed Balasaheb Thackeray for Narayan Rane ouster in party- Shiv Sena leader Ramdas Kadam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.