दिशा सालियनवेळी उद्धव ठाकरेंनी मला फोन केलेला, काय म्हणाले? नारायण राणेंचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 04:50 PM2024-09-04T16:50:49+5:302024-09-04T16:51:49+5:30
दिशा सालियन प्रकरणाबाबतचे पुरावे नितेश राणे यांनी बंद लिफाफ्यात पेनड्राईव्हद्वारे विधानसभेत सरकारला दिले आहेत. यावर अद्याप काहीच कारवाई झाल्याचे बाहेर आलेले नाही.
एकीकडे नितेश राणे दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून आदित्य ठाकरेंना टार्गेट करत असताना खासदार नारायण राणेंनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्यचे नाव येऊ लागल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आपल्याला फोन केला होता, असा दावा राणे यांनी केला आहे.
दिशा सालियन प्रकरणाबाबतचे पुरावे नितेश राणे यांनी बंद लिफाफ्यात पेनड्राईव्हद्वारे विधानसभेत सरकारला दिले आहेत. यावर अद्याप काहीच कारवाई झाल्याचे बाहेर आलेले नाही. परंतू, अधून मधून राणे कुटुंबीय दिशा सालियनचा विषय काढत असतात. गेल्या आठवड्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावरील पुतळा पडल्यावरून आदित ठाकरे आणि नारायण राणे आमनेसामने आले होते. यामुळे पुन्हा एकदा राणे- ठाकरे ठिणग्या उडताना दिसत आहेत.
नारायण राणे यांनी आज दिशा सालियनच्या विषयावर उद्धव ठाकरेंचा फोन आला होता असे सांगितले आहे. मिलिंद नार्वेकरांनी मला फोन केला होता. उद्धव ठाकरेंना माझ्याशी बोलायचे होते. फोनवर ठाकरेंनी आदित्यला सांभाळून घ्या, तुम्हालाही दोन मुले आहेत, असे आपल्याला सांगितलेले असे राणे म्हणाले. यावेळी मी त्यांना तुम्ही तुमच्या मुलाला सायंकाळी सातनंतर सोडू नका, असा सल्ला दिलेला असा गौप्यस्फोट राणे यांनी केला आहे.
याचबरोबर राणे यांनी विजय वडेट्टीवारांना टोला लगावताना माझा चेला असे प्रश्न विचारतो याचे दुःख वाटतेय असे म्हटले. शिवरायांचा पुतळा निर्माण करणारा आपटे बेपत्ता आहे, त्याला भाजपाने लपवून ठेवले असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला होता. यावर राणे यांनी नावात फक्त विजय आहे, त्याला पराजयच दिसतो, असा टोला हाणला.