उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंना निरोप; कधीही कॉल करा, पण सावंतवाडीतून बोलतोय सांगा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 12:42 PM2022-03-25T12:42:03+5:302022-03-25T13:24:45+5:30
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद साधारण सतरा वर्षे रंगत आहे. राणे भाजपमध्ये जाऊन केंद्रीय मंत्री झाल्यानंतर हा वाद अधिकच वाढला आहे
रत्नागिरी : गुरुवारी दुपारच्या वेळेत येथील शासकीय विश्रामगृहात चक्क नारायण राणे यांनी निधीसाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत(Uday Samant) यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांच्याशी फोनवर संपर्क केला. ‘‘राणे, तुम्ही कधीही फोन करा, मी तुमचा फोन घेईन; पण, फक्त सावंतवाडीतून बोलतोय असे सांगा,’’ असेही मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितले. राजकीय वर्तुळात धक्कादायक ठरू शकणारा हा प्रकार घडला रत्नागिरीत. फक्त फरक एवढाच होता की, मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलणारे नारायण राणे आहेत सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सदस्य.
केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) आणि शिवसेना(Shivsena) यांच्यातील वाद साधारण सतरा वर्षे रंगत आहे. राणे भाजपमध्ये जाऊन केंद्रीय मंत्री झाल्यानंतर हा वाद अधिकच वाढला आहे. गेल्या काही महिन्यांत तर या वादाने टोक गाठले आहे. अशा पार्श्वभूमीवर नारायण राणे शिवसेनेच्या राज्यातील मंत्र्याची निधीसाठी भेट का घेतील? मुख्यमंत्र्यांशी फोनवर का बोलतील? पण हे गुरुवारी रत्नागिरीत घडले. फक्त ‘हे’ राणे ‘ते’ राणे नव्हते.
मंत्री सामंत यांची भेट घेणारे हे नारायण राणे आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली गावचे. ते माजी पंचायत समिती सदस्य आहेत. निधीसाठी त्यांनी सामंत यांची भेट घेतली. राणे माझ्याकडे निधी मागण्यासाठी आले असल्याची मिश्किल प्रतिक्रियाही यावेळी सामंत यांनी दिली. या भेटीनंतर राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. ‘तुम्ही कधीही फोन करा, मी तुमचा फोन घेईन; पण, फक्त सावंतवाडीतून बोलतोय असे सांगा,’ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे राणे यांनी सांगितले.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
नारायण राणे यांनी जेव्हा मुख्यमंत्र्यांना फोन केला तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले की, ‘‘त्या’ नारायण राणे यांचा मी फोन घेत नाही. तुम्ही फोन केल्यावर सावंतवाडीहून नारायण राणे बोलतोय, असे सांगा. मी फोन घेईन.’ पुढे राणे म्हणाले, ‘मला उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी कुणाचीही गरज पडत नाही. मी त्यांना थेट भेटतो. यावेळी त्यांनी ठाकरे यांनी बांधलेले शिवबंधनही अभिमानाने दाखविले. उदय सामंत यांची भेट घेतल्यानंतर नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.