"मराठा गोष्टी सांगत नाही, तर इतिहास रचतो", नीरज चोप्राच्या कुटुंबीयांना उद्धव ठाकरेंचा फोन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 05:30 PM2021-08-08T17:30:16+5:302021-08-08T17:31:16+5:30
Uddhav Thackeray : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नीरज चोप्राच्या कुटुंबाशी संवाद साधला असून त्याचा सत्कार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
मुंबई : टोकियो ऑलम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्राने भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले. टोकियो ऑलिंपिकमध्ये देशाला पहिले सुवर्णपदक मिळवून दिल्यानंतर नीरज चोप्रावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सोशल मीडियातून नीरज चोप्राचे अभिनंदन करण्यात येत आहे.
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नीरज चोप्राच्या कुटुंबाशी संवाद साधला असून त्याचा सत्कार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. नीरज चोप्राच्या कुटुंबीयांनी 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी नीरज चोप्राचा सत्कार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासाठी उद्धव ठाकरेंनी वेळ मागितली असून विधानसभेत बोलावून सन्मानित केले जाणार आहे. मुंबईत त्याचे भव्य स्वागत होणार आहे, अशी माहिती कुटुंबातील सदस्याने दिली.
याचबरोबर, मराठा गोष्टी सांगत नाही, तर इतिहास रचतो असेही उद्धव ठाकरेंनी म्हटल्याचे नीरज चोप्राच्या कुटुंबीयांनी सांगितले. हरयाणातील खांदरा हे नीरज चोप्राचे मूळ गाव आहे. 13 ऑगस्टला नीरज चोप्रा आपल्या गावात येणार आहे. त्यामुळे गावातही सध्या उत्साहाचे वातावरण आहे. यावेळी इतिहासात आतापर्यंत झाले नाही, असे सेलिब्रेशन करणार असल्याचे नीरज चोप्राच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. तसेच, कुटुंबीयांनी आपले मराठी कनेक्शनही सांगितले.
महाराष्ट्राशी नाते!
नीरज चोप्रा याने टोकिओत सुवर्णपदक जिंकले आणि हरयाणा, दिल्लीत नीरज चोपडे यांचे अभिनंदन, असे संदेश सुरू झाले. त्याचे कारण पानिपतजवळच्या खंदरा गावचा रहिवासी असलेल्या नीरज चोप्राचे मूळ महाराष्ट्रात आहे. १७६४ च्या तिसऱ्या पानिपत युद्धातून वाचलेले सगळ्या जाती-समाजाचे लोक हरयाणात रोड मराठा म्हणून ओळखले जातात. सोनीपत, पानीपत, कुरूक्षेत्र, कर्नाल, कैथल आणि जिंद या सहा जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने राणे, भोसले, चोपडे, मुळे, महले वगैरे आडनावे असलेला हा समाज राहतो. शेती, दुग्धउत्पादन हा त्यांचा मुख्य व्यवसाय. नीरजचे कुटुंबही शेतीव्यवसायातच आहे. २०१५ मध्ये जागतिक ज्युनिअर स्पर्धेत नवा विक्रम नोंदविल्यापासून प्रत्येक मुलाखतीत तो रोड मराठा समाज व कुटुंबांच्या शेती व्यवसायाचा आवर्जून गौरवाने उल्लेख करीत आला आहे.
सुवर्ण उत्सव! नीरजने इतिहास घडवला!
तब्बल शंभर वर्षांहून अधिक कालावधीपासून सुरू असलेली भारताच्या अॅथलेटिक्समधील सुवर्ण पदकाची प्रतीक्षा अखेर शनिवारी संपली. नीरज चोप्रा याने भालाफेकीत सुवर्ण फेक करत भारताला अॅथलेटिक्स फील्ड अॅण्ड ट्रॅक प्रकारात पहिलेवहिले सुवर्ण पदक मिळवून दिले. भारतासाठी हा दिवस सुवर्ण उत्सवी ठरला. दुसरीकडे कुस्तीत सुवर्ण पदकाची संधी हुकल्यानंतर बजरंग पुनियाने कांस्य पदकावरील पकड अजिबात ढिली केली नाही. यामुळे भारतासाठी शनिवारचा दिवस अत्यंत जल्लोषाचा ठरला.
नीरजने इतर खेळाडूंना दिली नाही एकही संधी
अंतिम फेरी सहापैकी दुसरा प्रयत्न सर्वोत्तम
पहिला ८७.०३ मीटर
दुसरा ८७.५८ मीटर
तिसरा ७६.७९ मीटर
चौथा फाऊल
पाचवा फाऊल
सहावा ८४.२४ मीटर
ऐतिहासिक कामगिरी
२००८ सालच्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये नेमबाज अभिनव बिंद्राने सुवर्ण पदक पटकावले होते. नीरजने बिंद्राच्या कामगिरीशी बरोबरी करताना तो ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्ण पटकावणारा दुसरा भारतीय ठरला.