मुख्यमंत्री काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनुमतीशिवाय निर्णयच घेऊ शकत नाही: मुनगंटीवार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 04:01 PM2019-12-19T16:01:12+5:302019-12-19T16:04:10+5:30
दिलेले आश्वासन त्यांनी पाळावे व शेतकऱ्यांना 25 हजारांची तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी सुद्धा यावेळी मुनगंटीवार यांनी केली.
मुंबई: नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या आज चौथ्या दिवशी सुद्धा विरोधकांनी शेतकऱ्यांच्या 25 हजाराच्या मदतीच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेतली. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणात राज्यासाठी कोणतीही ठोस आश्वासने नसल्याचे आरोप करत भाजप आमदारांनी सभात्याग करत सभागृहाच्या बाहेर पडणे पसंद केले. त्यांनतर माजी मंत्री व भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
यावेळी बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, अभिभाषणावर जे मुद्दे उपस्थित करण्यात येतात त्याचे उत्तर मिळणे अपेक्षित असते. मात्र आज राज्यपालांच्या अभिभाषणावर आम्हाला मुख्यमंत्र्यांचे डमी भाषण आयकायला मिळाले. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनुमतीशिवाय एक पाऊल पुढे जाऊ शकत नाही. तसेच त्यांना परवानगी घेतल्या शिवाय निर्णय सुद्धा घेता येत नाही.
तर उद्धव ठाकरेंना निर्णय घेण्यासाठी काँग्रेस प्रमुख सोनिया गांधींची परवानगी घ्यावी लागते. तसेच शरद पवारांची सुद्धा अनुमती घ्यावी लागते. उद्धव ठाकरे यांनी एक डमी मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर एक झुंझार मुख्यमंत्री म्हणून काम करायले पाहिजे. तसेच त्यांच्याकडून आज जे उत्तर अपेक्षित होते, ते आम्हाला मिळाले नसल्याचे सुद्धा मुनगंटीवार म्हणाले.
तर शेतकऱ्यांच्या मुद्यावरून सुद्धा त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भूमातीच्या साक्षीने व शेतकऱ्यांच्या उपस्थित 25 हजार मदत देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे दिलेले आश्वासन त्यांनी पाळावे व शेतकऱ्यांना 25 हजारांची तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी सुद्धा यावेळी मुनगंटीवार यांनी केली.