Uddhav Thackeray: भुजबळांनी बाळासाहेबांच्या अटकेचा प्रयत्न केला? उद्धव ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 08:51 AM2022-07-27T08:51:43+5:302022-07-27T08:55:01+5:30

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी नको, आपण भाजपसोबत जाऊ, अशी भूमिका घेत शिवसेनेतून फारकत घेतली.

Uddhav Thackeray: Chhagan Bhujbal tried to arrest Balasaheb Thackeray? Uddhav Thackeray said 'policy' | Uddhav Thackeray: भुजबळांनी बाळासाहेबांच्या अटकेचा प्रयत्न केला? उद्धव ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'

Uddhav Thackeray: भुजबळांनी बाळासाहेबांच्या अटकेचा प्रयत्न केला? उद्धव ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'

Next

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सामनातील मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रकाशित झाला आहे. पहिल्या भागात त्यांनी भाजपा आणि बंडखोरांवर जबरी टीका केली होती. त्यानंतर, विरोधकांनी त्यांच्या मुलाखतीवर प्रहार केला. केंद्रीयमंत्री नारायण राणेंनीही पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. तर, मनसेच्या संदीप देशपांडे यांनीही ही मुलाखत म्हणजे शरद पवारांनी दिलेले प्रश्न-उत्तरे असल्याची टीका केली होती. आता, मुलाखतीच्या दुसऱ्या भागातही राऊत यांनी अनेक प्रश्नांवर त्यांना बोलतं केलं आहे. त्यात, छगन भुजबळ यांच्याबद्दलचा खुलासाही उद्धव ठाकरेंनी केला आहे. 

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी नको, आपण भाजपसोबत जाऊ, अशी भूमिका घेत शिवसेनेतून फारकत घेतली. त्यावेळी, शिंदेगटाचे प्रवक्ते दिपक केसरकर आणि इतरही आमदारांनी छगन भुजबळ यांचा दाखला दिला. शिवसेनेत पहिलं बंड केलेल्या छगन भुजबळांच्या मांडीला मांडी लावून मंत्रीमंडळात बसता, ज्या भुजबळांनी बाळासाहेबांना अटक करण्याचे आदेश दिले, त्यांच्याशी आघाडी करता असे म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. आता, बंडखोरांच्या या टिकेला उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

गेल्या अडीच वर्षात मातोश्रीवर अश्लाघ्य भाषेत बोललं गेलं, त्यावर कुणीही काही बोललं नाही याचा संदर्भ देत भुजबळांबद्दलही बोललं गेल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. भुजबळांनी अटकेचा प्रयत्न केला, मात्र भुजबळांनी व्यवस्थित खुलासा केला आहे. स्वत: भुजबळ आणि शिवसेनाप्रमुखांची मातोश्रीत भेट झाली. तो सगळा संवाद जो काही झाला, त्याला मीही साक्षीदार होतो. तुम्ही पण होतात मला वाटतं, असे संजय राऊत यांनी उद्देशून उद्धव ठाकरेंनी म्हटलं. तसेच, बाळासाहेबांनी भुजबळांना माफ केलं, बाळासाहेबांनी सांगितलं की, आता आपलं वैर संपले. बाळासाहेब हे उमद्या स्वभावाचे होते, अनेकवेळा त्यांनी शत्रूलाही माफ केलंय, असा खुलासा उद्धव ठाकरेंनी आठवण स्वरुपात सांगितला.

भाजप त्रास देतंय सांगणारे हेच होते

“भाजपबरोबर सत्तेत होतो तेव्हा भाजप त्रास देतोय असं म्हणायचे. भाजप नको असे सांगणारे हेच लोक होते गावागावात भाजप शिवसेनेला काम करू देत नाही. भाजप शिवसेनेला संपवतेय असा यांचा आक्षेप होता. २०१९ मध्ये भाजपने खोटेपणाचा कळस केला. ठरवलेल्या गोष्टी नाकारतोय म्हणून आपण महाविकास आघाडीला जन्म दिला. तर म्हणे, आता काँग्रेस-राष्ट्रवादीवाले त्रास देतात. मग नेमकं तुम्हाला हवंय तरी काय? की फक्त कारणे शोधताय,” असा सवाल उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना केला आहे.

भुजबळांनी काय केला होता खुलासा

बाळासाहेबांना अटक करायची नाही, असे आदेश मी पोलिसांना दिले होते असा दावा पत्रकारांशी बोलताना माजीमंत्री छगन भुजबळ यांनी केला. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मंडल आयोगावरून मतभेद झाल्यावर मी बाहेर पडलो होतो. तत्कालीन कमिशनरांना मी बाळासाहेबांना अटक करायची नाही असे सांगितले होते. अटक झाल्य़ावर त्यांना जामीन मिळत असेल तर मिळू द्या, आडकाठी आणू नका असे आदेश दिले होते, असा खुलासा भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. 

Web Title: Uddhav Thackeray: Chhagan Bhujbal tried to arrest Balasaheb Thackeray? Uddhav Thackeray said 'policy'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.