उद्धव ठाकरे हे तर विनोदी नट
By Admin | Published: April 27, 2017 01:36 AM2017-04-27T01:36:56+5:302017-04-27T01:36:56+5:30
सत्तेतून वारंवार बाहेर पडण्याची नौटंकी करून उद्धव ठाकरे यांनी ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातील कलाकारांनाही मागे टाकले आहे.
सांगली : सत्तेतून वारंवार बाहेर पडण्याची नौटंकी करून उद्धव ठाकरे यांनी ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातील कलाकारांनाही मागे टाकले आहे. सत्तेतील विनोदी नट म्हणून त्यांचा परिचय होऊ लागला आहे, अशी बोचरी टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.
विरोधी पक्षांच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काढलेली संघर्ष यात्रा सांगलीत पोहोचली. कृष्णाकाठच्या वसंतदादा पाटील स्मारकास अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना विखे यांनी शिवसेनेला टिकेचे लक्ष्य केले. ते म्हणाले, सर्वात भ्रष्ट मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. त्यासाठीच ते सरकारमधून बाहेर पडण्यास तयार नाहीत. आपल्या एका सहकाऱ्याचे गैरकृत्य लपविण्यासाठी शिवसेनेचे खासदार लोकसभेत नागरी उड्डाणमंत्र्यांच्या अंगावर धावून जातात. मग शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते असे का धावत नाहीत?
अजित पवार म्हणाले की, २५ रुपये मूळ दर असणाऱ्या पेट्रोलवर ५१ रुपयांचा कर सरकारने लावला आहे. महामार्गावरील दारूबंदीच्या माध्यमातून होणारी तूट भरून काढण्यासाठी हा उद्योग करण्यात आला आहे. दारूड्यांचा कर दुष्काळाच्या नावावर दारू न पिणाऱ्या लोकांकडून वसूल करतानाही या सरकारला लाज वाटत नाही. (प्रतिनिधी)
कृषी व पणनमंत्र्यांनी राजीनामा द्यावा...
तूरडाळ उत्पादक शेतकऱ्यांना सरकारी धोरणाने संकटात आणले असताना केवळ २२ एप्रिलपर्यंत टोकन घेणाऱ्या शेतकऱ्यांचीच तूरडाळ खरेदी करण्याचे धोरण मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. त्यांची ही उपकाराचीच भाषा आहे. ज्यांचा पेरा उशिरा आहे अशा उत्पादकांनी काय करायचे, असा सवाल अजित पवार यांनी केला. तूरडाळीच्या प्रश्नावर मार्ग काढण्यात अपयशी ठरलेल्या राज्याच्या कृषी व पणनमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी पवार व विखे-पाटील यांनी केली.
स्वाभिमानी शब्द वगळा!
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि खासदार राजू शेट्टी आता शेतकऱ्यांचे नेते राहिलेले नाहीत. शेतकरी अडचणीत असताना दोन्ही नेते तोंडाला पट्ट्या बांधून गप्प आहेत. याशिवाय त्यांच्या संघटनेला आता स्वाभिमानी हा शब्दही शोभत नाही, अशी टीकाही या नेत्यांनी केली.