रोजच रेल्वे अपघातांची ‘बुलेट’ मालिका, उत्तर प्रदेशातील रेल्वे अपघातांवरुन उद्धव ठाकरेंनी साधला पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2017 07:43 AM2017-08-24T07:43:29+5:302017-08-24T08:34:10+5:30

उत्तर प्रदेशात आठ दिवसांत दोन रेल्वे अपघात झाले. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

Uddhav Thackeray condescends Narendra Modi on railway accidents in Uttar Pradesh | रोजच रेल्वे अपघातांची ‘बुलेट’ मालिका, उत्तर प्रदेशातील रेल्वे अपघातांवरुन उद्धव ठाकरेंनी साधला पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा 

रोजच रेल्वे अपघातांची ‘बुलेट’ मालिका, उत्तर प्रदेशातील रेल्वे अपघातांवरुन उद्धव ठाकरेंनी साधला पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा 

Next

मुंबई, दि. 24 - उत्तर प्रदेशात आठ दिवसांत दोन रेल्वे अपघात झाले. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेशात शनिवारी (19 ऑगस्ट) उत्कल एक्स्प्रेस व बुधवारी (23ऑगस्ट) कैफियत एक्स्प्रेसचा भीषण अपघात झाला. यावरुन ''देशात सध्या रोजच रेल्वे अपघातांची ‘बुलेट’ मालिका सुरू आहे. माणसे मरत आहेत, जखमी होत आहेत, रक्ताचे सडे पडत आहेत व सरकार जपानच्या मदतीने ‘बुलेट ट्रेन’सारखी थेरं करीत आहे'', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर टीका केली आहे.

नेमके काय आहे सामना संपादकीय ?
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तो स्वीकारला नाही. देशात सध्या रोजच रेल्वे अपघातांची ‘बुलेट’ मालिका सुरू आहे. माणसे मरत आहेत, जखमी होत आहेत, रक्ताचे सडे पडत आहेत व सरकार जपानच्या मदतीने ‘बुलेट ट्रेन’सारखी थेरं करीत आहे. मुंबईसारख्या शहरात तर रेल्वे ही ‘लाइफलाइन’ म्हणजे जीवनवाहिनी आहे; पण ब्रिटिशांनी मुंबईसह देशात जे रेल्वेचे रूळ टाकले त्यात स्वातंत्र्यानंतर रेल्वे मंत्रालयाने किती भर टाकली? चला मुरारी हीरो बनने त्याप्रमाणे चला मुरारी बुलेट ट्रेन शुरू करने, हे स्वप्न चांगले असले तरी आधी आहे ती रेल्वे नीट चालवा. फलाट व डबे, शौचालये स्वच्छ करा. रेल्वेच्या जेवणात उंदरांच्या शेपटय़ा व झुरळे मिळणार नाहीत याची काळजी घ्या व मगच तुमच्या त्या बुलेट ट्रेनची शिट्टी वाजवा. बरं तुमच्या त्या बुलेट ट्रेनचे ठेवा बाजूला, पण रेल्वेमध्ये ज्या पद्धतीने बजबजपुरी वाढली आहे व रोजच अपघात होत आहेत त्याकडे तर पहा. अर्थात या अपघात मालिकांशी रेल्वेमंत्र्यांचा थेट संबंध नसतो. हिंदुस्थानी रेल्वेचा कारभार आजही जुनाट मोगलशाही पद्धतीने सुरू आहे. डिजिटल इंडियाच्या बाता तुम्ही कितीही मारल्यात तरी

राष्ट्रीय रेल्वेचा गंज

उतरायला तयार नाही व आधुनिकतेची चकाकी त्यावर येता येत नाही. प्रत्येक रेल्वे अपघातानंतर पंतप्रधान व रेल्वेमंत्री दुःख व्यक्त करतात. थातूरमातूर रकमांची मदत जाहीर करतात. अपघातांची चौकशी समिती नेमून वेळ मारून नेतात; पण अपघातांच्या रोगावर कुणी रामबाण उपाय शोधायला तयार नाही. उत्तर प्रदेशात गेल्या आठ दिवसांत दोन रेल्वे अपघात झाले. मंगळवारी कैफियत एक्प्रेसला अपघात झाला. त्याआधी तीन दिवसांपूर्वी मुजफ्फरनगर येथे उत्कल एक्प्रेसला झालेला अपघात ‘कैफियत’ एक्प्रेसच्या अपघातापेक्षा भयंकर होता. त्या अपघातात २३ ठार व शंभरावर जखमी झाले. पुन्हा उत्कल आणि कैफियत एक्प्रेसला जे अपघात झाले ते मानवी बेफिकिरीमुळे झाले हे महत्त्वाचे. अनेकदा मानवी चूक रेल्वे अपघाताला कारणीभूत ठरत असते, पण या दोन्ही अपघातांसाठी कारण ठरली ती निव्वळ कर्मचाऱ्यांची बेफिकिरी आणि निष्काळजीपणा. दोन्ही अपघात झाले तिथे रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. अशा वेळी त्या मार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्या रेल्वे गाडय़ांच्या चालकांशी जो समन्वय राखणे तसेच सुरक्षाविषयक खबरदारी घेणे आवश्यक असते ती दोन्ही ठिकाणी घेतली गेली नाही आणि

‘न घडणारे’ अपघात

घडले. मागील पाच वर्षांत देशभरात सुमारे ५८६ रेल्वे अपघात झाले. त्यात माणसे किडय़ा-मुंग्यांसारखी मरत आहेत. आता कोठे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष कुणी एका मित्तलने राजीनामा दिला व त्यापाठोपाठ रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पंतप्रधानांकडे म्हणे राजीनामा देऊ केला आणि पंतप्रधानांनी तो स्वीकारला नाही, म्हणजे नक्की काय? मंत्र्यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर देऊ केलेला राजीनामा खरा की नैतिकतेच्या मुद्द्यावर मंत्र्यांनी देऊ केलेला राजीनामा पंतप्रधानांनी स्वीकारला नाही ही नैतिकता मोठी? अर्थात राजकारणात नैतिकता वगैरे या शब्दांना आता अर्थ उरलेला नाही. मंत्र्यांच्या राजीनाम्याने प्रश्न धसास लागले असते तर रोजच असे राजीनामे देऊन प्रश्न सुटले असते, मात्र तसे होत नाही. अपघात झाला म्हणून लालबहादूर शास्त्री यांनी रेल्वेमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. तो नैतिकतेचा विषय होता, पण त्यानंतरही पुढची
५०-६० वर्षे रेल्वे रोज रुळांवरून घसरत आहे. मग त्या नैतिकतेतून आपण काय धडे घेतले? या प्रश्नाचे उत्तर काहीच नाही असेच येते. तेव्हा राजीनामा दिलेले पुन्हा ‘ब्रेक’ के बाद नव्या खुर्च्यांवर विराजमान होतील व रेल्वेसह अनेक मंत्रालयांचे ‘ब्रेक’ रोज फेल होतील. आपण मात्र नैतिकतेचे ढोल वाजवत बसू!

Web Title: Uddhav Thackeray condescends Narendra Modi on railway accidents in Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.