"उद्धव ठाकरे स्वत:ला मर्द समजतात, पण…’’ भास्कर जाधवांच्या टीकेनंतर नितेश राणेंचं जहरी प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 03:55 PM2022-10-18T15:55:48+5:302022-10-18T15:56:53+5:30
Nitesh Rane: कुडाळमध्ये वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ झालेल्या विराट मोर्चानंतर भास्कर जाधव यांनी नारायण राणेंवर घणाघाती टीका केली होती. त्यानंतर आता नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांनी भास्कर जाधव आणि उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली आहे.
मुंबई - दिवाळी तोंडावर आली असताना कोकणामध्ये पुन्हा एकदा राणे कुटुंबीय आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आरोप-प्रत्यारोपांची धुळवड सुरू झाली असून, राजकीय शिमगा होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. आज कुडाळमध्ये वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ झालेल्या विराट मोर्चानंतर भास्कर जाधव यांनी नारायण राणेंवर घणाघाती टीका केली होती. त्यानंतर आता नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांनी भास्कर जाधव आणि उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली आहे. बाळासाहेबांसारखा थेट हल्ला कऱण्याची हिंमत उद्धव ठाकरेंमध्ये नाही. त्यांना अशी भटकी कुत्री सोंगाडे लागतात, असे नितेश राणे म्हणाले.
भास्कर जाधव यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले की, भास्कर जाधव आमच्यावर भुंकण्याचं काम करून गेले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही बघतोय की, उद्धव ठाकरे स्वत:ला मर्द म्हणवातात. मात्र बाळासाहेबांसारखा थेट हल्ला कऱण्याची हिंमत उद्धव ठाकरेंमध्ये नाही. त्यांना अशी भटकी कुत्री, सोंगाडे लागतात. जे येऊन राणेंवर प्रहार करणार. भाजपावर आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेवर प्रहार करणार आणि उद्धव ठाकरे मातोश्रीवर बसून मजा करणार, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.
यावेळी त्यांनी भास्कर जाधव यांच्यावरही जोरदार टीका केली. भास्कर जाधव म्हणतात की मी शिक्षकाचा मुलगा आहे. मात्र मला वाटत नाही की, शिक्षकाचा मुलगा हा एवढा वात्रट निघेल, कार्टा निघेल. नेमका शिक्षक असलेल्या वडिलांनी काय संस्कार केलेले आहे. ते खरंच शिक्षकाचा मुलगा आहेत की चिपळूणच्या कचऱ्यातून उचलला आहे, संशोधनाचा विषय आहे, असे नितेश राणे म्हणाले.
महाराष्ट्राच्या जनतेला आता कळलं असेल की, नेमकं उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाने आईसक्रिमचा कोन चिन्ह म्हणू का दिलं. उद्धव ठाकरेंमध्ये रग नाही हिंमत नाही. उद्धव ठाकरे एकदम थंड माणूस आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे पाहून आइस-क्रिमचा कोन दिला असेल. आता आदित ठाकरे आणि आईसक्रिमचा कोन यांचा काय संबंध हे डिनो मोरियाला विचारलं तर आदित्य ठाकरेंना आईसक्रीमचे कोन किती आवडतात हे तो तुम्हाला निश्चितपणे सांगेल. हे दोघेही रिझवी कॉलेजमागे बसून आईसक्रिमचे कोन खायचे, असो, असे नितेश राणे म्हणाले.
दरम्यान, वैभव नाईक यांच्या एसीबी चौकशीवरूनही नितेश राणे यांनी मोठा दावा केला. ते म्हणाले की, एसीबीची चौकशी का झाली हा मूळ मुद्दा आहे. चोऱ्यामाऱ्या करायच्या वैभव नाईकांनी,भ्रष्टाचार करायचा वैभव नाईकांनी आणि ही भटकी कुत्री आमच्यावर भुंकत बसणार. त्यापैक्षा वैभव नाईक यांनी त्यांच्या मालमत्तेची माहिती दिली पाहिजे. २००९ ते २०१९ पर्यंत संपत्ती का वाढली याची माहिती दिली पाहिजे. एसीबीविरोधात मोर्चा निघालाय, मग त्याची माहिती कुडाळ-मालवणच्या जनतेला दिली पाहिजे होती. एसीबीला दिली पाहिजे होती. त्यापेक्षा या सर्व सोंगाड्यांनी नंगानाच केला.
या संपूर्ण प्रकरणातील मूळ तक्रारदार प्रदीप भालेकर हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. तसेच तो विनायक राऊत यांचा माणूस आहे. वसईतील त्यांचं घर हे विनायक राऊत यांनीच दिलं आहे. काल त्यांचा एक व्हिडीओ आला होता की, ही तक्रार २०२१ मध्ये दिली होती, मग २०२२ मध्ये मी मागे घेतली. मात्र मूळ तक्रार तुमचीच आहे ना, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.