बऱ्याच वर्षांनी NDA नावाचा अमिबा जिवंत आहे हे कळलं; उद्धव ठाकरेंचा भाजपावर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 07:48 AM2023-07-26T07:48:04+5:302023-07-26T07:54:31+5:30
मणिपूरमध्ये महिला अत्याचाराची दुसरी घटना समोर आली. महिलेची विवस्त्रावस्थेत धिंड काढून अत्याचार केले. त्याची चीड बाळगा अशी टीका उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे.
मुंबई - बऱ्याच वर्षांनंतर या देशात 'एनडीए' नावाचा काहीतरी अमिबा जिवंत आहे हे कळलं आणि आपण जे देशभक्त राजकारणी आहोत त्यांची 'इंडिया' नावाची एक आघाडी केलेली आहे त्याला उत्तर देण्यासाठी. त्याच दिवशी आपल्या पंतप्रधानांनी छत्तीस पक्षांची जेवणावळ यातली. खरं म्हणजे छत्तीस पक्षांची त्यांना गरज नाहीय. त्यांच्या 'एनडीए'मध्ये आता ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय हे तीनच पक्ष मजबूत आहेत असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे.
उद्धव ठाकरे मुलाखतीत म्हणाले की, राज्यपाल नावाचं एक पद असतं, त्या पदावर केंद्राच्या अखत्यारीतून राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून एक व्यक्ती बसवली जाते. पण मणिपूरला राज्यपाल आहेत का? मणिपूरच्या राज्यपाल महिला, देशाच्या राष्ट्रपती महिला अशा देशात महिलांवर आपत्ती का येते? महिला म्हणून देशात जे चाललंय त्यावर राष्ट्रपती काय भूमिका घेणार? आपल्या देशाचा उल्लेख भारतमाता करतो त्या मातेचा अपमान आणि असे धिंडवडे निघत असतील तर काय करत आहात? असा सवालही त्यांनी विचारला.
त्याचसोबत मणिपूरमध्ये महिला अत्याचाराची दुसरी घटना समोर आली. महिलेची विवस्त्रावस्थेत धिंड काढून अत्याचार केले. त्याची चीड बाळगा, या घटनेचा तिथल्या तिथेच रोखठोक समाचार घ्यायला हवा होता पण तो घेतला गेला नाही हे दुर्दैव म्हणायचं. एवढे होऊनही आपले पंतप्रधान तिकडे जायला तयार नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने ताकीद दिल्यावर ३६ सेकंदच बोलले आणि राजस्थानला प्रचारासाठी निघून गेले. गेले २-३ महिने हिंसाचार चालूच आहे. ज्या महिलेवर अत्याचार झाला ती कारगिल जवानाची पत्नी होती हे तर जास्तच भयंकर आहे असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला.
शिवसेना नाव पुन्हा मिळेल
धनुष्यबाण आणि मशाल या माझ्यासाठी नंतर आलेल्या गोष्टी आहेत. पहिली आली ती शिवसेना. ते नाव फार महत्त्वाचे आहे. जे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांनीही सांगितलेले आहे की, शिवसेना हे नाव प्रबोधनकारांनी म्हणजे माझ्या आजोबांनी दिलेले आहे. मी वारंवार हे सांगतोय, निवडणूक आयोगाचे काम हे निवडणूक निशाणी किंवा चिन्ह देण्याचे आहे. पक्षाचं नाव देण्याचं किंवा पक्षाचं नाव बदलण्याचे नाही. म्हणून आता जो विचित्र निकाल निवडणूक आयोगाने दिला आहे. त्याविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयत गेलोय. आपली बाजू मांडताना ज्या गोष्टींची पूर्तता करण्याची आवश्यकता होती त्या सर्व गोष्टींची पूर्तता केल्यामुळेच शिवसेना हे नाव पुन्हा आपल्याला मिळेल असा विश्वासही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. शिवसेना पॉडकास्टमध्ये खासदार संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.