भ्रष्टाचार करा, भाजपात या, कुछ नही होगा "मोदी गॅरंटी"; रायगडात उद्धव ठाकरे कडाडले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 02:23 PM2024-02-01T14:23:47+5:302024-02-01T14:24:45+5:30
आता पंतप्रधान सारखे दौरे करतायेत. मते हवी असताना मेरे प्यारे देशवासियो, त्यानंतर तुम्हाला चिरडून विकास करणे हे काम आहे असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
पेण - Uddhav Thackeray on 'Modi's guarantee ( Marathi News ) अब की बार ४०० पार असं होणार असेल तर तुम्हाला नीतीश कुमार का लागतात?, मोदी की गॅरंटी, एकाबाजूला हेमंत सोरेन यांना अटक आणि दुसरीकडे अजित पवारांना क्लीनचीट अशी बातमी वृत्तपत्रात बाजूबाजूला होती. भ्रष्टाचार करा, भाजपात या, कुछ नही होगा, मोदी गॅरंटी आहे अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपा सरकारवर केली आहे.
पेणच्या सभेत उद्धव ठाकरेंनी ईडी, सीबीआयवरून भाजपावर निशाणा साधला. ते म्हणाले की, भ्रष्टाचार करा, भाजपात या, तुम्हाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पद मिळेल. आरोप करणारे हेच, पक्षात घेणारे हेच आणि क्लीनचीट देणारेही हेच. नीतीश कुमारांनी भाजपासोबत शपथ घेतली आणि दुसऱ्यादिवशी लालू यादव आणि तेजस्वी यादव यांना ईडीचे समन्स आले. ही मोदी गॅरंटी, ही गॅरंटी तुम्हाला परवडणार आहे का? जे हुकुमशाहीविरोधात राहतील त्यांना तुरुंगात टाकले जातंय. भाजपा-आरएसएस कार्यकर्त्यांनी डोळे उघडावे. ही लढाई भाजपाविरोधात इतर पक्ष नाही तर ही लढाई हुकुमशाहीविरुद्ध लोकशाही अशी आहे. तुम्ही ज्यांच्या सतरंज्या घालताय, ज्यांच्यामागे उठाबशा काढतायेत, त्यांच्या हातात देश देताय याचा अर्थ तुम्ही तुमच्या पुढच्या पिढ्या हुकुमशाहीच्या हातात देतायेत. पुढच्या पिढ्या तुम्हाला माफ करणार नाहीत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
तसेच एखाद्याला गाडायचे तर आधी खड्डा करावा लागेल. त्या खड्ड्यात मतांची माती टाकावी लागेल. त्यासाठी आपल्याला घराघरात जावे लागेल. प्रत्येक ठिकाणी जाऊन गेल्या १० वर्षातील सरकारच्या कामांचा आढावा घ्या. जे अर्थसंकल्प मांडले ते प्रत्यक्षात किती उतरलंय? महिलांना योजनांचा लाभ मिळाला का? शेतकऱ्यांना मदत मिळाली का? तरुणांना नोकरी मिळाली का? हे प्रश्न विचारा. कोकणात २ वेळा चक्रीवादळ येऊन गेले तेव्हा केंद्राकडून एकही मदत आली नाही. संकट आल्यावर पंतप्रधान कोकणाकडे फिरकले नाहीत. तेव्हा मी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना मदत केली. आता पंतप्रधान सारखे दौरे करतायेत. मते हवी असताना मेरे प्यारे देशवासियो, त्यानंतर तुम्हाला चिरडून विकास करणे हे काम आहे असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
दरम्यान, राम मंदिरासाठी शिवसेनाप्रमुखांचे मोलाचे योगदान, मला त्याचा आनंद आहे. मी नाशिकला काळाराम मंदिरात दर्शन घेतले, गोदातीरी आरती केली. काळाराम मंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला होता. हा राम तुमच्या मोदींची प्रॉपर्टी नाही तर हा राम देशातील करोडो रामभक्तांचाही आहे. त्या सोहळ्यात मोदींची तुलना आमचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची केली. ती माणसं निर्बुद्ध आहे. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लागला तर याद राखा असं छत्रपतींनी म्हटलं होते, परंतु इथे शेतकऱ्यांच्या मालाला किंमत नाही. मणिपूरमध्ये महिलांची विटंबना झाली. ते पाहावतही नाही, एवढे होऊन सुद्धा ती व्यक्ती महाराजांच्या बरोबरीची होऊ शकते? जे कोणी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना करतायेत ते बिनडोक आहेत अशी संतप्त प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली.
हुकुमशाहीला मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही
राज्यात गद्दारांची घराणेशाही आलीय. घराणेशाहीला आम्ही तिकीट देणार नाही असं भाजपानं जाहीर करावे. लोकसभेत निवडून येऊ शकत नाही म्हणून सुनील तटकरे राज्यसभेची तयारी करतायेत. फसवण्याचे दिवस गेले. आम्ही कडवट राष्ट्रीय हिंदुत्वासाठी तुमच्यासोबत आलो होतो. या देशाला मानणारा जो कोणी जातपात कुठल्याही धर्माचा असला तरी ते आमचं हिंदुत्व, भाजपानं त्यांच्या हिंदुत्वाची व्याख्या सांगावी. प्रचंड खर्च जाहिरातबाजीवर केला जातो. पेट्रोल पंपावर जाहिराती लावल्या जातात. पण पंतप्रधानांना पेट्रोलची दरवाढ दिसत नाही. गरिब महिलांना किती उज्ज्वला योजना मिळाली एकमेकांना विचारा. आपण सगळे जाहिरातीचे बळी ठरतो. जनसंवाद माझा नाही तर जनतेने एकमेकांशी करावा. चर्चा होऊ द्या आणि खरे काय ते जनतेसमोर येऊ द्या. सत्य जनतेसमोर आणणं ही जबाबदारी प्रत्येकाची आहे. सत्य समोर आले तर मी पेण, रायगडमध्ये सभा घेतली नाही तरी आपला खासदार निवडून येईल. याच जनतेच्या ताकदीवर हुकुमशाहाविरोधात आपण लढणार आहोत. जनतेची ताकद एकवटते तेव्हा हुकुमशाहीला मातीत गाडल्याशिवाय राहत नाही असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.