भानगडी व उचापती करण्यासाठी सत्ता दिलेली नाही, उद्धव ठाकरेंची भाजपावर टीका

By admin | Published: May 12, 2016 08:01 AM2016-05-12T08:01:53+5:302016-05-12T09:13:45+5:30

भानगडी व उचापती करण्यासाठी लोकांनी तुमच्या हाती सत्ता दिलेली नाही, ज्यांनी शिखरावर बसवले तेच उद्या धुळीस मिळवल्याशिवाय राहणार नाहीत अशी टीका उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून केली आहे

Uddhav Thackeray criticizes BJP for not giving power to Bhangadi and overthrow | भानगडी व उचापती करण्यासाठी सत्ता दिलेली नाही, उद्धव ठाकरेंची भाजपावर टीका

भानगडी व उचापती करण्यासाठी सत्ता दिलेली नाही, उद्धव ठाकरेंची भाजपावर टीका

Next
>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 12 -  भानगडी व उचापती करण्यासाठी लोकांनी तुमच्या हाती सत्ता दिलेली नाही. ज्यांनी शिखरावर बसवले तेच उद्या धुळीस मिळवल्याशिवाय राहणार नाहीत, असे टीकास्त्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपावर सोडले आहे. हूकुमशहा हिटलरचाही गर्व, अहंकार गळून पडला व अंधार्‍या खंदकात त्याला स्वत:वरच गोळी झाडावी लागली. म्हणून लोकशाहीचे महत्त्व समजून वागा. जनतेने राज्य करण्यासाठी हाती दुधारी तलवार दिली आहे. या तलवारीने स्वत:चेच नाक कापू नका! उत्तराखंडात तसेच घडले आहे असेही त्यांनी सामनाच्या अग्रलेखातून सुनावले आहे.
उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणे व त्यानंतर शक्तीपरीक्षेत काँग्रेसचा झालेला विजय व भाजपाचा पराभव या सर्व पार्श्वभूमीवर भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने टीका करत त्यांना सल्ला दिला आहे. उत्तराखंडला देवभूमीचा दर्जा आहे. त्यामुळे राजकीय शक्तिपरीक्षणाच्या निकालात कोण जिंकले व कोण हरले यापेक्षा लोकशाहीचा विजय झाला असेच म्हणावे लागेल. काँग्रेस पक्षाला विजयाच्या तुतार्‍या व ढोल वाजविण्याची संधी मिळाली. उत्तराखंडवर घिसाडघाईने राष्ट्रपती राजवट लादून ‘शक्ती’ दाखवण्याचा ज्यांनी प्रयत्न केला ते स्वत: उताणे पडले. पण काँग्रेसला ‘टॉनिक’ मिळाले याचे आम्हाला दु:ख आहे असं उद्धव ठाकरे यांनी लेखात म्हटले आहे. 
 
फाटाफूट व त्यानंतरच्या तोडबाज्या हा आपल्या लोकशाहीला लागलेला रोग आहे. या रोगावर उपचार करण्याचे सोडून डॉक्टर व वैद्य मंडळी आजार पसरवण्यासाठी शर्थ करताना दिसतात तेव्हा देशाच्या भविष्याविषयी चिंता वाटते व देशात अराजक, आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण होईल की काय याची भीती वाटते. काँग्रेस राजवटीत अशा घटना घडत होत्या म्हणून ज्यांनी लोकशाही व राजकीय साधनशूचितेच्या नावाने गळा काढला तेच लोक सत्तेवर येताच काँग्रेसच्या वरताण वागू लागले. प्रभू श्रीरामाने रावणाची व कृष्णाने कंसमामाची भूमिका करावी असेच घडत आहे अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
 
सामना संपादकीयमधील इतर मुद्दे - 
- उत्तराखंडात काँग्रेसचे नऊ आमदार फुटले व सरकार अल्पमतात गेले. विधानसभेत बहुमताची परीक्षा तेव्हाच झाली असती तर काँग्रेसचे सरकार पराभूत झाले असते. पण नाना खटपटी लटपटी करून सत्तेचा दबाव टाकून बहुमताची परीक्षा टाळण्यात आली व राष्ट्रपती राजवट लादली गेली. जणू लोकशाहीला दंडबेड्या लावून जखडून ठेवले. 
 
- भारतीय जनता पक्षाची यात पूर्ण नाचक्की झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संमतीने हे सर्व घडले असेल तर देशाची जनता त्यांना कोपरापासून दंडवत आताच घालीत आहे. 
 
- देश काँग्रेसमुक्त करण्याची ही पद्धत नव्हे. हीच पद्धत स्वीकारली जाणार असेल तर देशात सरळ हुकूमशाहीच लादली जाईल व लोकशाही मार्गाने निवडून आलेली सरकारे जोरजबरदस्तीचा अवलंब करून गाडली जातील. हे चित्र भयंकर आहे. 
 
- बिहारात राष्ट्रपती शासन लावा, अशी मागणी आता भाजपच्या गोटातून सुरू आहे. छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात पोलीस व जवान मरत आहेत व कश्मीर खोर्‍यातील स्थिती हाताबाहेर आहे. केजरीवाल यांचे दिल्लीतील सरकारही बरे चालले नसल्याची बोंब भाजपवाले मारीत आहेत. मग येथेही राष्ट्रपती शासन लावून राज्य करण्याची इच्छा बाभळीचे झाड फुटावे तशी फुटली आहे काय? 
 
- लोकशाहीत लोकांचेच ऐकायचे असते. फक्त सत्ता चघळत बसायची म्हणून लोकशाही नको. आज देशाचा कारभार जणू न्यायालयेच चालवत आहेत व याला राज्यकर्तेच जबाबदार आहेत. उत्तराखंडमध्ये न्यायालयाचा हस्तक्षेप राज्यकर्त्यांच्या चुकांमुळे झाला. न्यायालयासही पायघड्या आपण अंथरल्या, पण शेवटी न्यायालयाने लोकशाहीचे रक्षण केले हे महत्त्वाचे

Web Title: Uddhav Thackeray criticizes BJP for not giving power to Bhangadi and overthrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.