ठाकरेंनी सांगितला कसब्याच्या निकालाचा अर्थ; भाजपाच्या पराभवाचा 'हाच' एकमेव मंत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 08:49 AM2023-03-03T08:49:21+5:302023-03-03T08:50:05+5:30

पराभव समोर दिसू लागला तसा ‘धनशक्ती’चे ब्रह्मास्त्रही ‘महाशक्ती’ने वापरून पाहिले. तरीही शेवटी भ्रमाचा भोपळा फुटायचा तो फुटलाच असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray criticizes BJP over Kasba by-election results | ठाकरेंनी सांगितला कसब्याच्या निकालाचा अर्थ; भाजपाच्या पराभवाचा 'हाच' एकमेव मंत्र

ठाकरेंनी सांगितला कसब्याच्या निकालाचा अर्थ; भाजपाच्या पराभवाचा 'हाच' एकमेव मंत्र

googlenewsNext

मुंबई - एकास एक उमेदवार दिला तर भाजपाचा पराभव करणे सहज शक्य आहे. जागरूक झालेल्या मतदारांनी त्यांचे काम चोख बजावले. आता जबाबदारी विरोधी पक्षांची आहे. आपल्यात वजाबाकी होऊ न देणे आणि मतांची बेरीज वाढवणे हाच भाजपच्या पराभवाचा एकमेव मंत्र आहे. कसब्याच्या निकालाचा हाच अर्थ आहे. कसब्याच्या निकालाने पुण्यात जल्लोष सुरू झाला आहे. महाराष्ट्रात आणि देशातही २०२४ पर्यंत हा जल्लोष असाच सुरू राहील असा विश्वास सामना अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे. 

तसेच कसब्यातील भाजपचा हा पराभव केवळ कसब्यापुरताच मर्यादित नाही तर या निकालाने संपूर्ण महाराष्ट्रालाच भाजपचा भ्रमाचा भोपळा कसा फोडायचा याचा उत्तम संदेश दिला आहे. महाराष्ट्रात आणि देशातही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात किती तीव्र असंतोष खदखदत आहे, हेच कसब्याच्या निकालाने दाखवून दिले असंही ठाकरेंनी म्हटलं. 

सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे
पुण्यातील कसबा हा तब्बल २८ वर्षांपासून भाजपाच्या ताब्यात असलेला गड महाविकास आघाडीने उद्ध्वस्त केला आहे. कसबा आणि चिंचवड या पुण्यातील दोन्ही विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. 

मुक्ताताई टिळक आणि लक्ष्मण जगताप या भाजप आमदारांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे ही पोटनिवडणूक झाली आणि यातील कसब्याची अत्यंत प्रतिष्ठेची जागा गमावण्याची नामुष्की भारतीय जनता पक्षावर आली. 

कसब्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा दारुण पराभव केला, तर चिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी या केवळ तिरंगी लढतीमुळे विजयी झाल्या. 

तिथेही कसब्याप्रमाणेच दुरंगी लढत झाली असती तर ‘खोकेशाही’च्या नादाला लागलेल्या भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातच काय, देशातही तोंड दाखवायला जागा राहिली नसती. मात्र अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते, ते कसब्याच्या निकालाकडे. कारण 1995 पासून ते आजतागायत सलग 28 वर्षे या मतदारसंघावर भाजपचेच वर्चस्व होते. आधी गिरीश बापट आणि नंतर मुक्ता टिळक येथून निवडून गेल्या.

अर्थात, भाजपच्या आजवरच्या कसब्यातील विजयामध्ये त्या वेळी युतीमध्ये असलेल्या ‘ओरिजनल’ शिवसेनेचे योगदानही तेवढेच महत्त्वपूर्ण होते. शिवसैनिकांनी त्या वेळी प्रयत्नांची पराकाष्ठा केली नसती, तर भाजपचा हा कपोलकल्पित गड कधीच धराशायी पडला असता. 

असो, आता ‘डुप्लिकेट’ शिवसेनेच्या साथीने भारतीय जनता पक्ष पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरला आणि तोंडावर आपटला. हे होणारच होते. कसब्याचा निकाल असाच लागणार होता. रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे उमेदवार असले तरी महाआघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या घटक पक्षांच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी या पोटनिवडणुकीत भाजपला धडा शिकवण्यासाठी जिवाचे रान केले व ‘मविआ’च्या भक्कम एकजुटीपुढे भाजपच्या हेमंत रासने यांचा निभाव लागला नाही. 

जवळपास 11 हजार मतांनी त्यांचा पराभव झाला. कसब्यातील भाजपचा हा पराभव केवळ कसब्यापुरताच मर्यादित नाही तर या निकालाने संपूर्ण महाराष्ट्रालाच भाजपचा भ्रमाचा भोपळा कसा फोडायचा याचा उत्तम संदेश दिला आहे. 

मुंबई महापालिकेसह महाराष्ट्रातील आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि 2024 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये तथाकथित महाशक्तीला पराभूत करण्याचा उत्तम वस्तुपाठ कसब्याच्या निकालाने घालून दिला आहे. भाजपचा हा पराभव सामान्य नाही. 

बेइमानी करून व सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून राज्यात घडवलेला सत्ताबदल जनतेच्या किती डोक्यात गेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी जनमानस किती प्रक्षुब्ध झाले आहे, याचा अंदाज भाजपच्या नेतृत्वाला आधीच आला होता. 

तरीही नसलेल्या बेटकुळय़ा फुगवून ‘हा आमचा पारंपरिक बालेकिल्ला आहे,’ अशा फुशारक्या भाजप नेते एकीकडे मारत होते आणि दुसरीकडे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह राज्याचे अख्खे मंत्रिमंडळ प्रचारासाठी कसब्यात तळ ठोकून होते. मुख्यमंत्र्यांसह मिंधे मंडळाचा रोड शो झाला व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेदेखील निवडणुकीदरम्यान पुण्यात येऊन गेले. पण त्याचा पेठांतील मतदारांवर काडीमात्र परिणाम झाला नाही. 

पराभव समोर दिसू लागला तसा ‘धनशक्ती’चे ब्रह्मास्त्रही ‘महाशक्ती’ने वापरून पाहिले. तरीही शेवटी भ्रमाचा भोपळा फुटायचा तो फुटलाच! राजकारणातील नीतिमत्ता विकून खाणाऱ्या सत्तांधांना शनिवार पेठ, सदाशिव पेठ, नारायण पेठ आणि रविवार व शुक्रवार पेठांतील जनतेने मोठीच अद्दल घडवली. महाराष्ट्रात जी गद्दारी झाली, त्या गद्दारीचे मुस्काट फोडणारे परिवर्तन कसब्याने घडवले. 

आधी अंधेरीच्या पोटनिवडणुकीत मशाल पेटली, त्यापाठोपाठ शिक्षक व पदवीधर मतदारसंघांतील निवडणुका व आता कसब्यामध्ये पडलेली विजयाची ही ठिणगी भविष्यात महाराष्ट्र व देशातही परिवर्तनाचा वणवा पेटवल्याशिवाय राहणार नाही. कसब्याचा निकाल म्हणजे लोकशाहीचे हत्याकांड घडवून गद्दारांच्या खोकेशाहीला राजवस्त्रे देणाऱ्या हुकूमशहा व ठोकशहांच्या तोंडावर जनतेने मारलेला तमाचाच आहे. 
 

Web Title: Uddhav Thackeray criticizes BJP over Kasba by-election results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.