कंत्राटदार नेते बनायला लागले अन्...; उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 01:48 PM2023-04-27T13:48:28+5:302023-04-27T13:49:13+5:30

जोडे पुसण्याची लायकी असलेले लोक राज्य करतायेत. महाराष्ट्राचे होणार काय? अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केली.

Uddhav Thackeray criticizes CM Eknath Shinde-Deputy CM Devendra Fadnavis | कंत्राटदार नेते बनायला लागले अन्...; उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल

कंत्राटदार नेते बनायला लागले अन्...; उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल

googlenewsNext

मुंबई - कंत्राटदार नेते बनायला लागले. कंत्राटदारांचे लाड करायचे आणि प्रसाद खायचे असं सरकार आहे. आपले दिवस परत येतील त्यानंतर जो प्रसाद आपण देऊ तो आयुष्यभर लक्षात राहील. कामगार दिन, महाराष्ट्र दिन जवळ आलाय. जय जवान, जय किसान आणि जय कामगार ही घोषणा बाळासाहेबांनी दिली होती. AC मध्ये बसून कॅबिनेट मिटिंग घेणाऱ्यांना कामगारांचे मोल कळत नाही. कामगारांच्या हिसक्याने काय होणार? सरकार संवेदनशील असायला हवे अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

भारतीय कामगार सेनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन केले. उद्धव ठाकरे म्हणाले की, १९९५ साली युतीचे सरकार होते तेव्हा बाळासाहेबांनी म्हटलं होतं मोर्चे येतील ते अडवायचे नाही. ज्या खात्याविरोधात मोर्चा येईल त्या खात्याच्या मंत्र्याने मंत्रालयातून खाली उतरून मोर्चाला सामोरे जायचे. पण आता असं होत नाही. वापरा आणि फेका ही कंत्राटी कामगारांची अवस्था आहे. महाराष्ट्राचं काम 'गार' करणारे राज्यात सरकार आहे. आपले सरकार असताना जवळपास २५ पेक्षा जास्त उद्योग महाराष्ट्रात आणले. अडीच लाख कोटी गुंतवणूक आणली. पण या सरकारच्या काळात त्यातील अनेक उद्योग पळवले. भूमिपुत्रांच्या न्यायहक्कासाठी शिवसेना जन्माला आली. आज जे बाळासाहेबांचे विचार सांभाळतो बोलणारे मूग गिळून गप्प आहेत अशी टीका त्यांनी केली. 

तसेच जोडे बनवणारी कंपनीही तामिळनाडूत गेली. जोडे पुसण्याची लायकी असलेले लोक राज्य करतायेत. महाराष्ट्राचे होणार काय? माझ्या पाठित वार करून सरकार पाडले. त्याचा सूड आणि बदला घेणारच. १२ तासाची ड्युटी, कंत्राटी कामगार, उद्योग बाहेर चालले आहेत. घर पेटवणे सोपे पण घरातील चूल पेटवणे कठीण, मशिन बिघडते पण कामगारांचा माणूस म्हणून विचार करणार की नाही? मी एका क्षणात वर्षा आणि मुख्यमंत्रिपद सोडले. अरविंद सावंत केंद्रीय मंत्री असताना राजीनामा द्या असं फोनवर सांगितले. फोन ठेवला आणि ते राजीनामा देऊन आले. ही शिवसेनाप्रमुखांनी घडवलेली माणसे असं सांगत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंसह समर्थक आमदारांवर निशाणा साधला. 

कामगारांनी रस्त्यावर येण्याची तयारी ठेवली पाहिजे
शेतकऱ्यांविरोधात कायदा आणल्यानंतर शेतकरी देशात रस्त्यावर उतरले. वर्षभर ऊन, पावसात बसले. जगभरात जिथे जिथे क्रांती झाली ती कामगार, शेतकऱ्यांमुळे झालीय. ती नेत्यांनी केली नाही. कामगारांविरोधातील कायदा येत असेल तर रस्त्यावर येण्याची तयारी हवी. आपले धनुष्यबाण चोरल्यानंतर मशाल चिन्ह उगाच घेतले नाही. धगधगती मशाल ज्वलंत असून अन्याय जाळून टाकणारच. हुतात्मा चौकात मशाल घेऊन प्रतिमा आहे. कामगार, शेतकऱ्यांच्या हातात मशाल आहे. मशाल तुमच्या हाती नसेल तर शाल, सत्कार घेऊन मी काय करू? अन्यायाला लाथ मारायची हे बाळासाहेबांचे विधान आहे. ते तुमच्याकडून व्हायला हवे. प्रलोभन दाखवली जातायेत. मी भाषणाशिवाय काहीच देऊ शकत नाही. तरीही तुम्ही माझ्यासोबत आहात. कारण आपल्यात एक नाते आहे. ही सगळी पुण्याई पूर्वजांची आहे. कामगारांची चळवळ एकजूट ठेवा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. 
 

Web Title: Uddhav Thackeray criticizes CM Eknath Shinde-Deputy CM Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.