Uddhav Thackeray: दहीहंडी म्हणजे काही स्वातंत्र्ययुद्ध नाही, राज ठाकरेंच्या खोचक टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं चोख प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 02:40 PM2021-08-31T14:40:50+5:302021-08-31T15:06:03+5:30
Uddhav Thackeray Criticize Raj Thackeray: मनसेने दहीहंडी साजरी केल्यावर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली होती. त्या टीकेला आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
ठाणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून दहीहंडी साजरी करण्यावर निर्बंध लादण्यात आले होते. मात्र याविरोधात मनसेने रणशिंग फुंकत दहीहंडी साजरी केली होती. तसेच त्यानंतर मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली होती. त्या टीकेला आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. काही जणांनी दहीहंडी साजरी केल्याचं ऐकलं. पण दहीहंडी हे काही स्वातंत्र्ययुद्ध नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लागावला.
ठाण्यामध्ये एका कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फ्रंसिंगच्या माध्यमातून संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी जुन्या काळातील दहीहंडीच्या आठवणी जागवल्या. तसेच नियम मोडून दहीहंडी साजरी करणाऱ्या मनसेला आणि राज ठाकरेंनाही टोला लगावला. आज काही जणांनी दहीहंडी साजरी केली. हे करा नाही तर आम्ही अमूक करू, असा इशारा त्यांनी दिला होता. पण दहीहंडी म्हणजे काही स्वातंत्र्ययुद्ध नाही. ज्यामध्ये कोरोनाचे नियम मोडले आणि आम्ही करून दाखवलं. तुम्ही काही स्वातंत्र्य नाही मिळवलंय. त्यासाठी आंदोलन केलं असतं तर तो भाग वेगळा होता, असे मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोना हा काही सरकारी कार्यक्रम नसल्याचा पुनरुच्चार केला. काही नियम पाळावे लागतात. नियम पाळले नाही तर तिसऱ्या लाटेचा इशाा दिला आहे, असे ते म्हणाले. यावेळी जनआशीर्वाद यात्रा काढणाऱ्या भाजपावरही मुख्यमंत्र्यांनी निशाणा साधला. करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका समोर असताना यांना यात्रा काढायच्या आहेत. नवीन काही सोई सुविधा करायच्या नाही आहेत. पण लोकांचे जीव कदाचित धोक्यात येऊ शकतील, असे सभा समारंभ करायचेत. का तर जनतेचे आशीर्वाद पाहिजेत. तुम्हाला कशाला हवेत जनतेचे आशीर्वाद? जनतेचा जीव धोक्यात घालायला का? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाला विचारला.