शरद पवारांच्या भूमिकेचं काँग्रेसकडून समर्थन; उद्धव ठाकरेंची मागणी अमान्यच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 02:28 PM2024-09-04T14:28:59+5:302024-09-04T14:30:59+5:30
मुख्यमंत्रिपदाबाबत महाविकास आघाडीकडून निवडणुकीनंतरच ठरवलं जाईल असं काँग्रेस-राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
मुंबई - विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवावा. हवं तर मी त्याला पाठिंबा द्यायलाही तयार आहे अशी मागणी उद्धव ठाकरेंकडून सातत्याने होत आहे. मात्र या मागणीवर शरद पवारांनी स्पष्ट भूमिका मांडल्यानंतर आता काँग्रेसकडूनही त्याचे समर्थन करण्यात आले आहे.
शरद पवारांच्या विधानावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं की, शरद पवार चुकीचे काय बोलले, महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही निवडणुकीला पुढे जाणार आहोत. महाविकास आघाडीचं संख्याबळ आल्यानंतरच तिथे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवला जाईल. मविआच्या मेळाव्यात आम्ही उद्धव ठाकरेंच्या मागणीवर बोललोय. महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ असं त्यांनी सांगितले.
तर कुणीही मुख्यमंत्रिपदासाठी लढत नाही. जे महाराष्ट्रद्वेष्टे भाजपा आहेत त्यांना आम्हाला सत्तेतून दूर करायचं आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत आम्ही चर्चा करत राहू. जागावाटपात रस्सीखेच होणारच आहे. जर नाही झाली तर कुणाला असं वाटू नये ताकद नाही. प्रत्येक जागा प्रत्येकाने मागितली पाहिजे तरच आम्ही २८८ मतदारसंघात सर्वांना मदत करू शकतो असं माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी सांगितले.
काय म्हणाले शरद पवार?
मुख्यमंत्री चेहऱ्याबाबत आताच आग्रह धरण्यात काही अर्थ नाही. मुख्यमंत्रिपदाबाबतीत महाविकास आघाडी एकत्र बसून निर्णय घेईल. आकड्यांच्या आधारावर विधानसभा निवडणुकीननंतर महाविकास आघाडीचा कोण होणार हे ठरणार आहे. मुख्यमंत्री कोण? हे आता महत्त्वाचं नाही. सध्या महाविकास आघाडीला बहुमत मिळेल अशी स्थिती आहे. तसे वातावरण राज्यात आहे. तसेच, लोकांच्या पाठिंब्यानंतर एक स्थिर सरकार देणं महत्त्वाचं आहे. स्थिर सरकार देणं, हे आमचे उद्दिष्ट्य आहे", असे म्हणत संख्याबळ आल्यानंतर नेतृत्व कुणी करायचे, याचा निर्णय होईल अशी स्पष्ट भूमिका शरद पवारांनी घेतली आहे.
उद्धव ठाकरे आग्रही
महाविकास आघाडीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा देऊन निवडणुकीला सामोरे जावे. ज्याची जास्त संख्या त्याचा मुख्यमंत्री असं सूत्र केले तर त्यात पाडापाडी होते. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा, तुम्ही जे नेतृत्व द्याल त्याला मी पाठिंबा द्यायला तयार आहे अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी जाहिरपणे महाविकास आघाडीच्या मेळाव्यात मांडली होती. परंतु त्यावर काँग्रेस आणि शरद पवारांकडून सातत्याने नकार देण्यात येत आहे.