PM Modi Security Breach: 'सुरक्षेतील त्रुटींमुळे देशानं दोन पंतप्रधान गमावले आहेत, म्हणून...'; उद्धव ठाकरे पंजाब घटनेवर काय म्हणाले संजय राऊतांनी सांगितलं...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 09:47 PM2022-01-06T21:47:52+5:302022-01-06T21:49:24+5:30
PM Modi Security Breach: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब दौऱ्यात सुरक्षेतील त्रुटींमुळे एका उड्डाणपुलावर १५ ते २० मिनिटं अडकून पडले होते. यावरुन आता जोरदार राजकारणाला देखील सुरुवात झाली आहे.
PM Modi Security Breach: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीपंजाब दौऱ्यात सुरक्षेतील त्रुटींमुळे एका उड्डाणपुलावर १५ ते २० मिनिटं अडकून पडले होते. यावरुन आता जोरदार राजकारणाला देखील सुरुवात झाली आहे. भाजपानं पंजाब काँग्रेसवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. तर काँग्रेसनंही मोदींच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन वेगवेगळे आरोप केले आहेत. यातच आता शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही उडी घेतली आहे.
संजय राऊत यांनी पंजाब घटनेबाबत नुकतंच एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका स्पष्ट केली आहे. "पंतप्रधान संपूर्ण देशाचे असतात. त्यांच्या सुरेक्षेबाबत कोणतीच तडजोड होता कामा नये. पंजाब दौऱ्यात मोदी यांच्या सुरक्षेत आढळलेल्या त्रुटी गंभीर आहेत. याच त्रुटींमुळे देशाने दोन पंतप्रधान गमावले आहेत. या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे", असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.
पंतप्रधान संपूर्ण देशाचे असतात. त्यांच्या सुरेक्षे बाबत कोणतीच तडजोड होता कामा नये.पंजाब दौऱ्यात मोदी यांच्या सुरक्षेत आढळलेल्या त्रुटी गंभीर आहेत. याच त्रुटींमुळे देशाने दोन पंतप्रधान गमावले आहेत. या घटनेची सखोल चौकशी व्हावी
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 6, 2022
अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
सोनिया गांधींनीही केली चौकशीची मागणी
काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांनी पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांच्याशी संपर्क साधला. यात त्यांनी, या संपूर्ण घटनेस जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींबाबत काँग्रेस हायकमांडने पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली आहे. यावेळी सोनिया गांधी यांनी सीएम चन्नींना, पंतप्रधानांच्या सुरक्षेसंदर्भात संपूर्ण काळजी घ्यायला हवी, असे सांगितले. तसेच झालेल्या घटनेस जे कुणी जबाबदार असतील, त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असेही म्हटले आहे.
नाना पटोले म्हणाले मोदी नौंटकी करुन देश चालवतात
पंजाब दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत झालेली चूक आणि त्यानंतर सुरू झालेल्या राजकारणावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आता गंभीर आरोप केला आहे. पंजाबच्या घटनेमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह याचा हात तर नाही ना? असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
"पंतप्रधानांचा दौरा असतो तेव्हा १५ दिवसांपूर्वीपासूनच सर्व सुरक्षेच्या व्यवस्था पाहिल्या जातात. तीन गुप्तचर यंत्रणांकडून माहिती घेतली जाते. एसपीजी या सर्वांचं नियंत्रण करत असते. एसपीजी गृहखात्याअंतर्गत येते. अमित शहा त्याचे प्रमुख आहेत. त्यामुळे या घटनेमागे अमित शहांचाच तर हात नाही ना असा प्रश्न निर्माण होतो. देशाच्या गृहमंत्र्यांनीच खरंतर याबाबत उत्तर द्यायला पाहिजे", असं विधान नाना पटोले यांनी केलं आहे.