...उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात एकत्र एन्ट्री; चर्चेला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 12:30 PM2023-03-23T12:30:10+5:302023-03-23T12:31:00+5:30
विधान भवनात एन्ट्री करताना उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाचवेळी आले. त्यामुळे आतमध्ये प्रवेश करताना दोघेही एकमेकांशी संवाद करताना पाहायला मिळाले.
मुंबई - राज्यातील सत्तांतरानंतर भाजपा-उद्धव ठाकरे यांच्यात दुरावा निर्माण झाला. त्यात शिवसेनेची धुरा आता एकनाथ शिंदेंच्या हाती आली आहे. उद्धव ठाकरे पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यात आज विधान भवनात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकत्र एन्ट्री झाल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या. ठाकरे-फडणवीस एकत्र संवाद करत विधान भवनात आले.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा अंतिम आठवडा आहे. आज मराठी भाषेसंदर्भात कार्यक्रम होणार आहे. तत्पूर्वी उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस हे दोघेही विधान भवनाच्या पायऱ्यांवर एकत्र आल्याचे चित्र माध्यमांनी टिपले. यावेळी आमदार रवींद्र वायकर, मिलिंद नार्वेकर हेदेखील उपस्थित होते. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांमध्ये विधान भवन परिसरात संवाद झाल्याचेही दिसून आले.
विधान भवनात एन्ट्री करताना उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाचवेळी आले. त्यामुळे आतमध्ये प्रवेश करताना दोघेही एकमेकांशी संवाद करताना पाहायला मिळाले. सत्तासंघर्षानंतर हे पहिलेच दृश्य पाहायला मिळाले. सरकार पाडल्यापासून ठाकरे-भाजपा यांच्यात टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला. त्यात अनेक महिन्यांनी फडणवीस-उद्धव ठाकरे एकत्र आल्याचे चित्र महाराष्ट्राला दिसून आले. त्यात दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावर कुठलाही ताणतणाव दिसून आला नाही. दोघांच्या चेहऱ्यावर हास्य होते.
मुख्यमंत्रिपदावरून संघर्ष
२०१४ च्या निवडणुकीनंतर राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची धुरा आली. त्यात उद्धव ठाकरे हे सत्तेत असतानाही अनेकदा सरकारविरोधात भूमिका घ्यायचे. तरीही फडणवीस आणि ठाकरे यांच्यातील संवादामुळे सरकारला कुठेही अडचण आली नाही. मात्र २०१९ च्या निवडणुकीत भाजपा-शिवसेनेने एकत्रित निवडणूक लढवली. परंतु निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदावर दावा करत थेट भाजपाशी फारकत घेत काँग्रेस-राष्ट्रवादीशी जवळीक साधली.
राज्यात महाविकास आघाडी निर्माण झाली. त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी नियुक्त झाले. त्यामुळे सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसायला लागले. देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते झाले. शिवसेना-भाजपाच्या या राजकारणात फडणवीस-ठाकरे दुरावले. त्यानंतर अडीच वर्षांनी शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह उद्धव ठाकरे सरकारचा पाठिंबा काढला. त्यामुळे मविआ सरकार कोसळले. सत्ता नाट्यात भाजपाने एकनाथ शिंदे यांना साथ देत त्यांना मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा दिला. या राजकीय घडामोडीत फडणवीस-ठाकरे यांच्यात टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला.