बाळासाहेबांचे संस्कार, उद्धव ठाकरेंनी शब्द मोडला नाही; शिवसेनेचा संभाजीराजेंवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 11:46 AM2022-05-27T11:46:29+5:302022-05-27T11:47:14+5:30
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार उद्धव ठाकरेंवर आहेत. दिलेला शब्द मोडला हे कधीच घडले नाही असं शिवसेनेनं म्हटलं.
मुंबई – राज्यसभेवर शिवसेनेचे २ खासदार जावेत यासाठी पक्षप्रमुखांनी विचार केला. शिवसेनेसाठी ज्यांनी आयुष्य वेचले त्यांना संधी द्यावी असं ठरवलं. अशावेळी छत्रपती संभाजीराजेंचा विषय आला. उदारअंतकरणाने शिवसेनेने संभाजीराजे यांना पक्षात प्रवेश करा, खासदारकी घ्या अशी ऑफर दिली. तुम्ही तुमच्या विचारांशी ठाम आहे तर शिवसेनाही आपल्या विचारांशी ठाम आहे. तुम्ही राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती मग शिवसेनेचा द्वेष का? असा सवाल शिवसेनेचे प्रवक्ते खासदार अरविंद सावंत(Shivsena Arvind Sawant) यांनी विचारला आहे.
अरविंद सावंत म्हणाले की, साताऱ्याचीही गादी आहे. ते कधी राष्ट्रवादीत, कधी भाजपात असतात. प्रबोधनकार आणि शाहू महाराजांचे चांगले संबंध होते. शिवसैनिकांना डावलून राजे शिवसेनेत येत असतील तर त्यांना उमेदवारी देण्याचा विचार केला. तुम्हाला समाजाचं काम करायचं होतं कुणी अडवलं होतं? छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान कर्नाटकात झाला तेव्हा तुम्ही सगळे कुठे होता? तुमच्याविषयी आमच्या मनात आदर आहे असं त्यांनी सांगितले. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार उद्धव ठाकरेंवर आहेत. दिलेला शब्द मोडला हे कधीच घडले नाही असं त्यांनी म्हटलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द मोडला; छत्रपती संभाजीराजे यांचा गौप्यस्फोट
संभाजीराजेंचा शिवसेनेवर आरोप
शिवसेनेत प्रवेश करा तुम्हाला खासदार करू असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. परंतु मी प्रवेश करणार नाही स्पष्ट सांगितले. माझी उमेदवारी ही घोडेबाजारासाठी नव्हती. सगळ्या पक्षातील लोकांनी मला मदत करावी. निष्कलंक माझं व्यक्तिमत्व आहे. घोडेबाजार होऊ नये म्हणून मी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतोय. ही माघार नाही तर माझा स्वाभिमान आहे असं संभाजीराजेंनी सांगितले
त्याचसोबत मी अपक्ष म्हणून राज्यसभा निवडणूक लढवणार होतो. मला कुठल्याही पक्षाचा द्वेष नाही. मला सगळी गणिती माहिती होती. पुढचा प्रवास खडतर होता याची जाणीव होती. मला शिवसेना खासदारांचे फोन आले. ओबेरॉयमध्ये आमची बैठक झाली. शिवसेनेत प्रवेश करावा अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे असं त्यांनी सांगितले. परंतु मी शिवसेनेत प्रवेश करू शकत नाही हे स्पष्टपणे सांगितले. मुख्यमंत्र्यांना भेटायला वर्षावर गेलो. या भेटीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेत येण्याची ऑफर दिली. परंतु मी शिवसेना पुरस्कृत महाविकास आघाडीचा अपक्ष उमेदवार म्हणून मला पाठिंबा द्यावा असा प्रस्ताव दिला. त्यावर सगळं काही ठरलं. ड्राफ्ट फायनल झाला. त्यानंतर मी कोल्हापूरला जायला निघालो तेव्हा संजय पवारांना उमेदवारी दिल्याचं कळालं. सगळ्या अपक्ष आमदारांवर दबाव होता. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला असा गौप्यस्फोट संभाजीराजे यांनी केला.