शिवशाहीत मावळ्यांना युद्धभूमीवरच चलनबदलासाठी उभे करून स्वराज्याचे हसे झाले नाही - उद्धव ठाकरे

By admin | Published: December 27, 2016 07:59 AM2016-12-27T07:59:29+5:302016-12-27T08:01:39+5:30

शिवस्मारकाच्या नुकत्याच झालेल्या भूमिपूजन सोहळयावरुन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर निशाणा साधला आहे.

Uddhav Thackeray did not laugh at Shiv Sena with Swarajya | शिवशाहीत मावळ्यांना युद्धभूमीवरच चलनबदलासाठी उभे करून स्वराज्याचे हसे झाले नाही - उद्धव ठाकरे

शिवशाहीत मावळ्यांना युद्धभूमीवरच चलनबदलासाठी उभे करून स्वराज्याचे हसे झाले नाही - उद्धव ठाकरे

Next

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 27 - शिवस्मारकाच्या नुकत्याच झालेल्या भूमिपूजन सोहळयावरुन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर निशाणा साधला आहे.  स्वत: उद्धव ठाकरेही पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत शिवस्मारकाच्या जलपूजन आणि भूमिपूजन सोहळयाला त्यानंतर वांद्रे-कुर्ला संकुलातील सभेला उपस्थित होते. 
 
छत्रपती शिवाजी महाराजांवर कोणा एकाला मालकी सांगता येणार नाही. ज्यांनी असा प्रयत्न केला त्यांना माती खावी लागेल असे उद्धव यांनी अग्रलेखात म्हटले आहे. शिवस्मारकाच्या जलपूजनाचा कार्यक्रम हा राजकीय पक्ष सोहळा असल्याची टीका उद्धव यांनी केली आहे. महाराष्ट्रातील नव राज्यकर्त्यांनी शिवचरित्राचा अभ्यास करावा असा सल्ला उद्धव यांनी दिला आहे. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणामध्ये शिवरायांनी केलेल्या चलन निर्मितीचा उल्लेख केला होता. तोच धागा पकडून नोटाबंदीच्या मुद्यावरुन पुन्हा एकदा पंतप्रधानांवर निशाणा साधण्यात आला आहे. शिवाजी महाराजांनी स्वत:चे चलन निर्माण केले व त्या चलनावरचा रयतेचा विश्‍वास घट्ट केला. आपल्याच चलनाचे मातेरे शिवशाहीत झाले नाही व मावळ्यांना युद्धभूमीवरच चलनबदलासाठी उभे करून स्वराज्याचे हसे केले नाही असा टोला उद्धव यांनी लगावला आहे. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाकिस्तान धोरणावरही टीका केली आहे. शिवरायांनी स्वराज्याच्या शत्रूला देशाचा दुश्मन मानले. औरंगजेब, अफझल खान, शाहिस्तेखान यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा कधीच दिल्या नाहीत असे उद्धव यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शिखर गाठलेले युगपुरुष आहेत. क्षुद्र राजकारणासाठी त्यांचा वापर करू नका असे उद्धव यांनी लिहीले आहे. 
 
काय म्हटले आहे अग्रलेखात 
- महाराष्ट्रातील राजकारण्यांना आमचे एकच सांगणे आहे, छत्रपतींचा वापर क्षुद्र राजकारणासाठी करू नका. छत्रपती म्हणजे शिखर गाठलेले युगपुरुष आहेत. त्यांच्यावर ‘मालकी’ सांगण्याचा प्रयत्न करणार्‍यांना माती खावी लागेल. महाराष्ट्राची ११ कोटी जनता व जगभरातील हिंदू हेच शिवरायांच्या विचारांचे वारसदार आहेत. तेव्हा मित्रांनो, इतिहासाचे भान ठेवा व राजकीय टाळ्या कमी वाजवा.
 
- छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, हे निदान महाराष्ट्राला तरी कुणी समजावून सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्राच्या नसांत व श्‍वासांत फक्त शिवाजी महाराजच आहेत, पण ‘शिवाजी’ महाराष्ट्रातच का जन्माला आले? याचे चिंतन काही मंडळींना करण्याची गरज आहे. शिवाजीराजांनी हिंदुत्वाला तेज दिले. लंगोटीतल्या सामान्य माणसांना लढण्याचे बळ दिले. जगातले पहिले हिंदवी स्वराज्य स्थापन करून हिंदुत्वास अर्थ मिळवून दिला. अशा शिवाजीराजांचे भव्य असे स्मारक (तीन हजार पाचशे कोटी रुपयांचे) मुंबईच्या समुद्रात साकार होत आहे व त्याचे पूजन हिंदुस्थानच्या पंतप्रधानांनी केले. त्यामुळे सरकारातील अनेकांच्या अंगात तेवढ्या काळापुरता शिवरायांचा संचार झाल्याचे दृश्य वृत्त वाहिन्यांवरून पाहता आले. महाराष्ट्रात येऊन ज्याने शिवरायांना मानाचा मुजरा केला नाही तो राष्ट्रभक्त नाहीच असे आम्ही मानतो. पंतप्रधानांच्या उपस्थितीत जो शिवस्मारक जलपूजनाचा राजकीय पक्ष सोहळा पार पाडला, त्यावर सरकारातील घनिष्ठ मित्रपक्षांनीच ‘संतापी’ तलवार उचलली आहे! हा शिवस्मारकाचा सोहळा म्हणावा की, भारतीय जनता पक्षाचा निवडणूक उत्सव? शिवाजी महाराज ही एकपक्षीय मक्तेदारी आहे काय, असा प्रश्‍न राजू शेट्टी यांनी विचारला. 
 
- भाजपच्या मिरवणूक सोहळ्यातून शिवस्मारक महामंडळाचे अध्यक्ष विनायक मेटे संतापून निघून गेले, पण एव्हाना त्यांचा संताप प्रथेप्रमाणे थंड पडला असेल. शिवस्मारक हे स्वार्थी राजकारणाच्या गुंत्यात जखडून पडू नये व असे राजकारण करणार्‍यांवरच भवानी तलवार चालविण्याची वेळ प्रत्यक्ष महाराजांवर येऊ नये. प्रत्यक्ष सभा मंडपात शिवसैनिक व शिवप्रेमी जनता ‘जय भवानी, जय शिवाजी’चाच गजर करीत असताना सत्ताधारी पक्षांचे लोक पुढे बसून ‘मोदीं’चा गजर करीत होते. आम्ही स्वत: मोदी यांचे भाजपातील महत्त्व जाणतो. भाजपने आतासे बाळसे धरले आहे ते मोदी टॉनिकमुळेच. हे खरे असले तरी शिवाजी महाराजांपुढे कुणाची तुलना होऊ शकेल काय? स्वत: मोदीदेखील हे मान्य करणार नाहीत. मोदी हे स्वत: शिवाजीराजांचा आदर्श मानतात व त्यांच्या शिवशाहीचे गुणगान करतात, पण महाराष्ट्र धर्माची अखंड जोपासना हीच शिवरायांना खरी मानवंदना. 
 
- महाराष्ट्रातील नव राज्यकर्त्यांनी शिवचरित्राचा अभ्यास करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात मुंबईसारखी शहरे असल्यामुळे धनदांडग्यांकडे पैसा आहे. त्यासाठी कुणाला शिवरायांची आठवण झाली असेल तर ते चूक आहे. काँगे्रस राजवटीत हे पाप घडलेच होते व त्यामुळे महाराष्ट्राने नेहरूंसारख्या बलदंड नेत्यालाही सळो की पळो करून सोडले होते. शिवाजी महाराज म्हणजे चालताबोलता पुरुषार्थ! त्यांनी शून्यातून हिंदवी स्वराज्य जन्मास घातले. मोगलांची परकीय राजवट उलथवून पाडण्यासाठी शिवाजी महाराज कर्दनकाळासारखे झुंजले. शिवाजी महाराजांनी स्वत:चे चलन निर्माण केले व त्या चलनावरचा रयतेचा विश्‍वास घट्ट केला. आपल्याच चलनाचे मातेरे शिवशाहीत झाले नाही व मावळ्यांना युद्धभूमीवरच चलनबदलासाठी उभे करून स्वराज्याचे हसे केले नाही. 
 
- शिवाजी महाराजांच्या विचारांचे वैशिष्ट्य काय? तर त्यांनी स्वराज्याच्या शत्रूला देशाचा दुश्मन मानले व दुश्मनांचे कोथळेच काढले. शिवाजी महाराजांनी औरंगजेब, अफझल खान, शाहिस्तेखान यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा कधीच दिल्या नाहीत. शिवरायांनी औरंगजेबाला झुंजवत ठेवले. स्वराज्यावर चाल करण्यास पाठविलेल्या अफझलखानाचा कोथळा काढला व शाहिस्तेखानाची बोटे छाटली. शिवाजीराजांनी महाराष्ट्र धर्म मोठा केला. तो जाणता राजा होता. देशाने सदैव नतमस्तक व्हावे असा हा जाणता राजा. त्यांचे भव्य स्मारक जगाला प्रेरणा देत राहील. महाराष्ट्रातील राजकारण्यांना आमचे एकच सांगणे आहे, छत्रपतींचा वापर क्षुद्र राजकारणासाठी करू नका. छत्रपती म्हणजे शिखर गाठलेले युगपुरुष आहेत. त्यांच्यावर ‘मालकी’ सांगण्याचा प्रयत्न करणार्‍यांना माती खावी लागेल. महाराष्ट्राची ११ कोटी जनता व जगभरातील हिंदू हेच शिवरायांच्या विचारांचे वारसदार आहेत. तेव्हा मित्रांनो, इतिहासाचे भान ठेवा व राजकीय टाळ्या कमी वाजवा. काहींची मनगटे राजकीय टाळ्या वाजविण्याच्या कामी येतात, तर मर्दांची मनगटे शिवरायांच्या विचारांची भवानी तलवार पेलण्यासाठी असतात! हिंदुस्थानचा जाणता राजा, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजीराजे यांच्या अतिभव्य अशा स्मारक कार्यास आमच्या शुभेच्छा! हे स्मारक फक्त पैशाने व राजकारणात तोलू नये. विचार, महाराष्ट्र धर्म व कर्तबगारीने तोलावे. हे ‘शिवस्मारक’ व्हावे ही तर तमाम हिंदू जनांची इच्छा आहे!
 
           
 

Web Title: Uddhav Thackeray did not laugh at Shiv Sena with Swarajya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.