"उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेरच येत नाहीत", राज ठाकरे यांचा निषाणा; ‘पुष्पा’ असा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांवरही टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 07:00 AM2024-10-14T07:00:13+5:302024-10-14T07:01:57+5:30
शरद पवार सांगतात आमचा पक्ष फोडला, तुम्ही काय केले आयुष्यभर, १९७८ ला काँग्रेस फोडली, १९९१ ला शिवसेना फोडली. तुम्ही कसल्या फोडाफोडीच्या गोष्टी बोलता, असा सवाल त्यांनी पवारांना केला.
मुंबई : दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भाषणाचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी गोरेगावमधील नेस्को सेंटर येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात समाचार घेतला. उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेरच येत नाही, सारखी वाघनखे काढतो, इथून अब्दाली आला, तिथून अफजलखान आला, इथून शाहिस्तेखान आला, अरे महाराष्ट्रबद्दल बोल, असा टोला त्यांनी लगावला. तर तिकडे ‘पुष्पा’चे वेगळेच चालू आहे, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांचे नाव घेऊन त्यांच्यावर निशाणा साधला.
शरद पवार सांगतात आमचा पक्ष फोडला, तुम्ही काय केले आयुष्यभर, १९७८ ला काँग्रेस फोडली, १९९१ ला शिवसेना फोडली. तुम्ही कसल्या फोडाफोडीच्या गोष्टी बोलता, असा सवाल त्यांनी पवारांना केला. अजित पवार इतके दिवस ओरडत होते, आता कसे गुलाबी जॅकेट घालून फिरतात? कोणी सांगितले मला माहिती नाही, पण भाजप यांना स्वीकारतो तरी कसा? असा प्रश्न करीत त्यांनी भाजपलाही लक्ष्य केले.
पगार द्यायला पैसे नसतील
लाडकी बहीण योजनेत या आणि पुढील महिन्याचे पैसे येतील, नंतर येणार नाहीत. फुकट योजनांमुळे जानेवारी-फेब्रुवारीत अशी स्थिती निर्माण होईल की या राज्य सरकारकडे पगार द्यायला पैसे नसतील. त्यापेक्षा महिलांना सक्षम बनवा, त्यांच्या हाताला काम द्या.
बेरोजगारांना फुकट पैसे, शेतकऱ्यांना फुकट वीज... लोकांना फुकटच्या सवयी लावायच्या आहेत. एकदा ही सवय लागली, की
सर्व राजकीय पक्षांना त्याप्रमाणे वागावे लागते, अशा शब्दांत त्यांनी महायुती सरकारच्या योजनांचा समाचार घेतला.