उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंना एकत्र यावेच लागेल, कारण..; निलंबित काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 12:41 PM2023-05-24T12:41:29+5:302023-05-24T12:42:07+5:30
काटोलमध्ये विद्यमान आमदारांबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे. विविध संस्थांमध्ये आमदारांची सत्ता गेली आहे असंही देशमुख म्हणाले.
नागपूर - सध्या परिस्थितीत महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अपात्रतेचा अधिकार विधानसभेच्या अध्यक्षांकडे आलेत. अशावेळी शिवसेना ठाकरेंची असो वा शिंदेंची नजीकच्या काळात त्यांना एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही, त्यामुळे हे दोघेही एकत्र येऊ शकतात असा मोठा दावा काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी केला आहे.
आशिष देशमुख म्हणाले की, शिवसेनेच्या सर्व ५४ आमदारांवरही अपात्रतेची टांगती तलवार आहे. निर्णय कुणाच्याही बाजूने लागला तरी आमदार अपात्र होणार आहेत. अपात्रतेची कारवाई केवळ या टर्मपुरती नसते तर पुढील ६ वर्षासाठी असते. त्यामुळे आमदारांचे राजकीय भवितव्य धोक्यात आहे. अपात्र व्यक्तीला निवडणूक लढवता येणार नाही. हा नियम राज्यसभा खासदारांसह सर्वांना लागू आहे. अशा परिस्थितीत दोन्ही शिवसेनेला एकत्र यावेच लागेल. ते एकत्र येतील आणि भाजपासोबत युती करतील त्यामुळे मविआ लवकरच फुटलेली दिसेल असा दावा त्यांनी केला.
तसेच २०१८ मध्ये मी आमदारकीचा राजीनामा दिला होता. कारण मला अपात्र व्हायचे नव्हते. ६ वर्ष राजकारणातून बाद व्हायचे नव्हते. मला माझ्या वकिलांनी दिलेला सल्ला होता. त्याआधारे मी सांगतो, दोन्ही शिवसेनेला एकत्र आल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मविआतील एक घटक पक्ष फुटला तरी जागावाटपाला काही अर्थ उरणार नाही असंही आशिष देशमुख यांनी म्हटलं.
दरम्यान, मी काँग्रेसमधून निलंबित असलो तरी ते तात्पुरते आहे. मी काँग्रेसमध्ये सक्रीय राहील. काटोलमध्ये विद्यमान आमदारांबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे. विविध संस्थांमध्ये आमदारांची सत्ता गेली आहे. मी २०१९ च्या विधानसभेत काही मतांनी पडलो. देवेंद्र फडणवीस यांना मी कडवी झुंज दिली होती. मी एका जागेवरून लढेन, जनतेचा जो कौल आहे ते पाहून मी निर्णय घेईल. काटोलमधून मी २०१४ मध्ये निवडून आलोय, त्यामुळे लोकांमध्ये माझ्या नावाची चर्चा आहे. अजून दीड वर्ष आहे पुढे पाहू काय होते असंही आशिष देशमुख यांनी सांगितले.