उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे एकाचवेळी दिल्लीला जाणार; काय घडतेय? एनडीए, इंडिया आघाडीत मोठ्या हालचाली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 07:20 PM2024-06-04T19:20:51+5:302024-06-04T19:21:47+5:30
Lok sabha Election Result 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीने भाजपाला पुन्हा एकदा २८ वर्षांपूर्वीच दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींसारख्या परिस्थितीवर नेऊन ठेवले आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीने भाजपाला पुन्हा एकदा २८ वर्षांपूर्वीच दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींसारख्या परिस्थितीवर नेऊन ठेवले आहे. १९९६ मध्ये वाजपेयींना बहुमत न मिळाल्याने मित्रपक्षांना झुकते माप देत सरकार हाकले होते. तशीच परिस्थिती आता मोदींसमोर आली आहे. मोदींना आता मित्र पक्षांचे रुसवे, फुगवे काढत पुढे घेऊन जावे लागणार आहे. अशातच इंडीया आघाडी आणि एनडीएने घटक पक्षांची तातडीची बैठक उद्या दिल्लीत बोलावली आहे.
या बैठकांना उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्रातून शरद पवार, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार असल्याचे समजते आहे. तर दुसरीकडे एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी राज्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार आहेत. ठाकरे आणि शिंदे एकाच वेळी दिल्लीत असण्याची शक्यता आहे.
निकालापूर्वी आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे एनडीएत येणार असल्याचा दावा केला होता. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंकडे सत्तेची चावी आहे. पुढील रणनिती ठरविण्यासाठी भाजपा आणि काँग्रेसने ही बैठक बोलावली आहे. आता या बैठकीला कोण हजर राहते आणि कोण गैरहजर याकडे देशाचे लक्ष लागले आहे. एनडीएच्या बैठकीला नितीशकुमार, चंद्राबाबू नायडू हजर राहतात का याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
आतापर्यंत आलेल्या कलांमध्ये भाजपाला २४१ जागांवर आघाडी मिळाली आहे. तर भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सुमारे २९५ जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे या निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीनेही जोरदार मुसंडी मारली आहे. इंडिया आघाडीतील सर्व पक्षांनी मिळून २३० जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे मागच्या दोन निवडणुकांत स्वबळावर बहुमत मिळवून सरकार स्थापन करणाऱ्या भाजपाला यावेळी मित्रपक्षांच्या मदतीने सरकार चालवण्यासाठी मित्रपक्षांची मदत घ्यावी लागणार आहे.