ओबीसी आरक्षणाचे शिवधनुष्य ज्यांनी पेलले, त्यांचे धन्यवाद द्यावे तितके कमीच- उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 08:57 PM2022-07-20T20:57:05+5:302022-07-20T20:57:33+5:30
ओबीसी समाजाला न्याय मिळाला याचं समाधान असल्याचीही व्यक्त केली भावना
Uddhav Thackeray on OBC Reservation: महाराष्ट्रातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची कोर्टात सुरू असलेल्या लढाईला आज यश आले. राज्यातील राजकारणात सध्या फारच तणावपूर्ण परिस्थिती असताना ओबीसी समाजासाठी एक चांगली बातमी मिळाली. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीत ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग आज मोकळा झाला. सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court ) बाठिंया आयोगाचा अहवाल मान्य केला असून दोन आठवड्यात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याचे निर्देश दिले. या निर्णयामुळे ओबीसी समाजातील जनतेने जल्लोष केला. या मुद्द्यावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मत व्यक्त केले.
आज सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने ओबीसी समाजाला न्याय मिळाला याचे समाधान आहे, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. "ही श्रेय घेण्याची लढाई अजिबात नाही. कारण सर्वसामान्य जनतेच्या, विशेषत: दुर्बल समाजाच्या भल्यासाठी काम करणं हे कुठल्याही सरकारचे कर्तव्यच असतं आणि म्हणूनच ओबीसी आरक्षणासाठी अगदी पहिल्यापासून महाविकास आघडीतले आम्ही सर्व पक्ष मनापासून प्रयत्न करीत होतो. हा तिढा अवघड होता पण तो सोडविण्यासाठी आम्ही त्यावेळेस विरोधी पक्ष, संघटना या सर्वांशी वारंवार चर्चा करून त्यांनाही विश्वासात घेतले होते. जयंत बांठीया यांच्यासारखा अनुभवी वरिष्ठ अधिकारी आणि त्यांची टीम यांनी हे शिवधनुष्य पेलले त्याबद्द्ल त्यांनाही जितके धन्यवाद द्यावे तितके कमीच आहेत", असे उद्धव ठाकरेंनी नमूद केले.
"ओबीसी राजकीय आरक्षणासाठी आयोगाचे सर्व सदस्य तर अतिशय मेहनतीने काम करीत होतेच शिवाय राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेतील सर्व घटकांनी देखील सर्वतोपरी प्रयत्न केले. खरं तर सगळ्यांनीच ओबीसी आरक्षण मिळालेच पाहिजे यावर लक्ष्य केंद्रीत करून एक चांगला लढा दिला. त्यामुळे महाराष्ट्राने केलेल्या प्रयत्नांना यश आले. मी आज मुख्यमंत्री नसलो तरी आमच्या काळात यावर सर्वानुमते जी पाऊले उचलण्यात आली होती तिला यश मिळालं यासारखे समाधान नाही", अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भावना व्यक्त केल्या.