Uddhav Thackeray यांच्या निर्णयावर काँग्रेसची तीव्र नाराजी; द्रौपदी मुर्मूंना दिलेला पाठिंबा ठरणार महाविकास आघाडी तुटण्याचे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 08:22 PM2022-07-12T20:22:14+5:302022-07-12T20:23:12+5:30

शिवसेना महाविकास आघाडीत पण निर्णय घेताना आमच्याशी काहीही चर्चा केलेली नाही, असा बाळासाहेब थोरातांचा आरोप

Uddhav Thackeray extends support to NDA Presidential Candidate Draupadi Murmu Congress Unhappy may break Mahavikas Aghadi | Uddhav Thackeray यांच्या निर्णयावर काँग्रेसची तीव्र नाराजी; द्रौपदी मुर्मूंना दिलेला पाठिंबा ठरणार महाविकास आघाडी तुटण्याचे कारण?

Uddhav Thackeray यांच्या निर्णयावर काँग्रेसची तीव्र नाराजी; द्रौपदी मुर्मूंना दिलेला पाठिंबा ठरणार महाविकास आघाडी तुटण्याचे कारण?

googlenewsNext

Uddhav Thackeray Balasaheb Thorat : राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलैला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे खासदार कोणाला मतदान करणार या मोठा प्रश्न होता. त्या प्रश्नाचे आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले. एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू ( Draupadi Murmu ) यांना शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला. याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केली. 'शिवसेना कधीच कोत्या मनाने वागलेली नाही. एका आदिवासी महिलेला राष्ट्रपतीपदाची संधी मिळत आहे तर आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे अशी भावना खासदारांनी व्यक्त केली होती. त्याचा सन्मान करत शिवसेनेने राष्ट्रपती पदासाठी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे', असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. मात्र, ठाकरेंच्या या निर्णयाने काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली. अशा परिस्थितीत महाविकास आघाडी ( Mahavikas Aghadi ) तुटण्यासाठी हा निर्णय कारणीभूत ठरणार का अशीही चर्चा आहे. 

उद्धव ठाकरेंनी निर्णय जाहीर केल्यानंतर काँग्रेस नेते आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी एक निवेदन जारी करून नाराजी जाहीर केली. निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रपती पदाची निवडणूक ही वैचारिक लढाई आहे. लोकशाही आणि संविधान रक्षणासाठी सुरू असलेला हा संघर्ष आहे. स्त्री, पुरुष किंवा आदिवासी, बिगर आदिवासी अशी ही लढाई नाही. जे संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणाच्या बाजूने आहेत ते सर्व यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देत आहेत.

निवेदनात पुढे लिहिले आहे की, शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा का दिला? माहिती नाही. त्यासाठी त्यांनी काही कारणही सांगितले, मात्र त्या पाठीमागील त्यांची खरी भूमिका काय ते शिवसेनेचे नेतृत्वच सांगू शकेल. शिवसेना हा एक वेगळा राजकीय पक्ष आहे. त्यामुळे ते त्यांची भूमिका घेऊ शकतात. मात्र या वैचारिक लढाईत जेव्हा गैर लोकशाही मार्गाचा अवलंब करून राज्यातील सरकार पाडले गेले, शिवसेनेच्या अस्तित्वाला आव्हान दिले गेले, अशा परिस्थितीत शिवसेनेने घेतलेली भूमिका अनाकलनीय आहे. शिवसेना महाविकास आघाडीत आहे, पण हा निर्णय घेताना त्यांनी आमच्याशी काहीही चर्चा केलेली नाही, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, शिवसेनेच्या खासदारांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंवर दबाव आणल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यावर उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट उत्तर दिलं. "माझ्यावर खासदारांनी कोणताही दबाव आणलेला नाही. द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजाचं प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे आमच्या पक्षातील आदिवासी समाजाचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या नेत्यांनी एका आदिवासी उमेदवाराला देशाचं राष्ट्रपतीपद भूषवण्याची संधी मिळत असल्यामुळे आपण पाठिंबा द्यायला हवा अशी विनंती माझ्याकडे केली. शिवसेनेनं याआधीही पक्षीय अभिनिवेशन बाजून ठेवून प्रतिभाताई पाटील, प्रणब मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे शिवसेना कधीच कोत्या मनानं वागलेली नाही", असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

 

Web Title: Uddhav Thackeray extends support to NDA Presidential Candidate Draupadi Murmu Congress Unhappy may break Mahavikas Aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.