उद्धव ठाकरेंनी शब्द पाळला; खातेवाटपात दाखवले औदार्य
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 12:27 PM2019-12-16T12:27:58+5:302019-12-16T12:28:31+5:30
गेल्यावेळच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदी असताना गृहखाते स्वत:कडेच ठेवले होते. मात्र उद्धव ठाकरे यासाठी अपवाद ठरले आहेत. त्यांनी गृहखाते एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविले आहे.
मुंबई - विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात निर्माण झालेल्या त्रिशंकू स्थितीतून मार्ग काढत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने सरकार स्थापन केले. राज्याचे नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आले असले तरी उद्धव ठाकरे यांनी खाते वाटप करताना आपलाच शब्द राखला आहे.
राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाले आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत:कडे गृह खाते न ठेवण्याचे औदार्य दाखवले आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पूर्णवेळ गृहमंत्री असायला हवा अशी मागणी खुद्द उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत असताना केली होती. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि नगरविकास खाते होते. उद्धव ठाकरे यांनी ही दोन्ही खाती स्वत:कडे ठेवली नाहीत.
मुख्यमंत्री पदानंतर गृहमंत्रीपद महत्वाचे समजले जाते. त्यामुळे हे पद आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी सत्तेत असेलेल्या पक्षांकडून रस्सीखेच सुरू होते. मात्र गेल्यावेळच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदी असताना गृहखाते स्वत:कडेच ठेवले होते. मात्र उद्धव ठाकरे यासाठी अपवाद ठरले आहेत. त्यांनी गृहखाते एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविले आहे.