शिवसेनेने दिलेले आश्वासन उद्धव ठाकरेंनी पाळले, राज्यात १० रुपयांत मिळणार भोजन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 06:00 PM2019-12-21T18:00:14+5:302019-12-21T18:01:32+5:30
Maharashtra Government : शिवसेनेचे हे आश्वासन सोशल मीडियावर विनोदाचा विषय ठरले होते. मात्र...
नागपूर - राज्यात सत्ता आल्यास भुकेल्यांना १० रुपयांत भोजन देण्याचे आश्वासन शिवसेनेने आपल्या जाहीरनाम्यात दिले होते. शिवसेनेचे हे आश्वासन सोशल मीडियावर विनोदाचा विषय ठरले होते. मात्र मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी १० रुपयांत थाळीबाबत दिलेले आश्वासन पाळले असून, राज्यात १० रुपयात थाळी देण्याची घोषणा आज विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी केली.
विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी समारोपाच्या भाषणात इतर मोठ्या घोषणांप्रमाणेच १० रुपयांत भोजन देण्याचीही घोषणा केली. राज्यातील गोरगरीबांसाठी १० रुपयामध्ये शिवभोजन योजना सुरु करण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्वावर ही योजना सध्या ५० ठिकाणी सुरु करण्यात येणार आहे. त्यानंतर ही योजना संपूर्ण राज्यात राबली जाईल,'' असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
"आमच्या सरकारने असं ठरवलं आहे की गोरगरिबांना १० रुपयांमध्ये शिवभोजन देण्याची योजना आम्ही सुरू करत आहोत."
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) December 21, 2019
-मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे pic.twitter.com/ZBoHJSrpLf
दरम्यान, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची मोठी धोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत असलेले दोन लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केली आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना असे नाव या योजनेला देण्यात आले आहे.
राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, ''गेल्या काही काळात नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांचे ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्याची घोषणा आम्ही करत आहोत. शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येईल. कर्जमाफीच्या प्रकियेची सुरुवात ही मार्च महिन्यांपासून होईल. तसेच कर्जमाफीचे पैसे हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जातील. तसेच नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी येत्या १५ दिवसांत योजना जाहीर केली जाईल.''