उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे गजनी, नितेश राणेंनी उडवली खिल्ली
By admin | Published: July 16, 2017 01:44 PM2017-07-16T13:44:07+5:302017-07-16T13:51:10+5:30
काँग्रेसचे आमदार आणि स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एका व्यंगचित्राद्वारे टर उडविली आहे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - काँग्रेसचे आमदार आणि स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एका व्यंगचित्राद्वारे टर उडविली आहे. या चित्रातून त्यांनी उद्धव यांची संभावना "गजनी" अशी केली आहे. या व्यंगचित्रावरून शिवसेना आणि राणे यांच्यामध्ये पुन्हा एकदा कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राचे गजनी अशी उपमा देऊन नितेश राणेंनी सेनेला डिवचण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. गजनी चित्रपटात अभिनेता अमीर खानने त्याच्या शरीरावर विविध शब्द आणि ओळी गोंदवून घेतल्या होत्या. या चित्रपटात त्याने उद्योगपती संजय सिंघानियाची भूमिका साकारली होती. खलनायकाने एकदा डोक्यावर जोरदार प्रहार केल्याने स्मरणशक्ती गमावलेला सिंघानिया अनेक महत्त्वाच्या गोष्टी त्याच्या शरीरावरच गोंदवून घेतो, अशी या चित्रपटाची कथा होती. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांची अवस्था झाल्याचे नितेश यांनी रेखाचित्राच्या माध्यमातून सुचवण्याचा प्रयत्न केला आहे.
भाजपा आमचा मित्र पक्ष आहे, एनडीच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला विरोध, जीएसटीला विरोध, कर्जमाफीला विरोध, सत्तेत आहे आणि समृद्धीला शिवसेनेचा विरोध आहे आदी मुद्द्यांकडे राणे यांनी या व्यंगचित्रातून लक्ष वेधले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते आणि आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्याची मागणी केली होती. महाराष्ट्र सरकारचं समर्थन परत घेणार असल्याच्या पोकळ धमक्या देणा-या शिवसेनेच्या नावे रेकॉर्ड नोंदवला गेला पाहिजे, असं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला चिठ्ठी लिहून नितेश राणेंनी कळवलं होतं.
त्यावेळी नितेश राणे म्हणाले होते, मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून एक रेकॉर्ड रजिस्टर करू इच्छितो, शिवसेनेनं ब-याचदा भाजपा सरकारचं समर्थन परत घेण्याच्या पोकळ धमक्या दिल्या आहेत. गिनीज बुकात नोंद होणारा हा पहिलाच अशा प्रकारचा विक्रम असेल. माझ्या या पत्रालाच नोंदणीसाठीचा अर्ज समजण्यात यावे, असे नितेश राणेंनी पत्रामध्ये नमूद केले होते. नितेश राणे टीका करत म्हणाले की, शिवसेनेसाठी हा एक वेगळा रेकॉर्ड असेल.
नितेश राणे हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. विशेष म्हणजे काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी नितेश राणे यांचे वडील गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेत होते. शिवसेनेच्या 1996च्या सत्ता काळात नारायण राणेंनी महसूल मंत्री आणि मुख्यमंत्रीपदासारखी महत्त्वाची खाती सांभाळली होती. गेल्या काही दिवसापूर्वी नारायण राणे काँग्रेसमध्ये नाराज असल्यामुळे ते भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत होते. मात्र, नारायण राणे यांच्या सर्व मागण्या भाजपकडून पूर्ण होत नाहीत. त्यामुळे राणे भाजप प्रवेशाचा निर्णय घेत नाहीत, असे समजले होते. मात्र नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे. ते भाजपामध्ये आल्यास भाजपमध्ये पुन्हा दोन गट पडतील व निष्ठावान भाजपा कार्यकर्त्यांना डावलून काँग्रेसमधील कार्यकर्त्यांना जिल्ह्यातील महत्त्वाची पदे मिळतील, अशी भीती भाजप पदाधिकाऱ्यांना वाटत असल्यामुळे भाजपा पदाधिकाऱ्यांनी नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाला विरोध केला होता. मात्र नारायण राणे यांनी आपला ठाम निर्णय अजूनही घेतला नसून ते 25 एप्रिलला निर्णय जाहीर करतील, अशी चर्चा होती.