Devendra Fadnavis : "उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झाला, Get Well Soon"; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 03:21 PM2024-02-10T15:21:00+5:302024-02-10T15:33:44+5:30
Devendra Fadnavis And Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी राज्यात गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या गुन्हेगारीच्या घटनांवरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका केली आहे. "महाराष्ट्रात मागील काही दिवसांत गुन्हेगारीच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र काल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यासाठी माझ्याकडे शब्दच राहिले नाहीत. मी त्यांच्यासाठी वापरलेले फडतूस-कलंक हे फार सौम्य शब्द झाले."
"आता फडणवीस यांची मानसिक तपासणी करण्याची गरज असून महाराष्ट्राला ‘मनोरुग्ण’ गृहमंत्री लाभलाय का? असा प्रश्न पडावा असं कालचं त्यांचं वक्तव्य होतं" असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला आहे. याला आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "उद्धवजींच्या डोक्यावर परिणाम झाला, Get Well Soon" असा खोचक टोला लगावला आहे. "उद्धव ठाकरेंची भाषा आणि त्यांचे जे शब्द आहेत. ते पाहिल्यावर आता माझं ठाम मत झालेलं आहे की, उद्धवजींच्या डोक्यावर परिणाम झाला. त्यामुळे मी Get Well Soon एवढंच म्हणेन" असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
"राज्यात घडलेल्या घटना गंभीर आहेत, त्या व्यक्तिगत वैमनस्यातून घडलेल्या घटना आहेत. त्यामुळे याचा कायदा, सुव्यवस्था आणि राज्याची परिस्थिती याच्याशी थेट संबंध जोडणं अयोग्य आहे. त्याबाबत कडक कारवाई करत आहे" असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सरकारवर टीका केली आहे. पूर्वी गँगवॉर दोन गटांमध्ये व्हायचं, आता सरकारमध्ये गँगवॉर सुरू आहे असं म्हणत निशाणा साधला आहे.
"अभिषेक घोसाळकरवर गोळ्या मॉरिसने चालवल्या की आणखी कुणी?"
"अभिषेक घोसाळकरवर गोळ्या मॉरिसने चालवल्या की आणखी कुणी चालवल्या? त्या दोघांनाही मारण्याची सुपारी आणखी कुणी दिली होती का?" असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. "अभिषेक घोसाळकर आणि मॉरिसचा फेसबुक लाईव्हचा व्हिडीओ समोर आला. यात गोळ्या झाडताना दिसतं. पण कोण झाडतंय हे दिसत नाही. मॉरिसने बॉडीगार्डच्या शस्त्रातून गोळ्या चालवल्या. त्या गोळ्या खरंच त्याने चालवल्या की, आणखी कोणी चालवल्या? त्या दोघांना मारण्याची सुपारी आणखी कोणी दिली होती का? हा एक मोठा प्रश्न मनात आहे" असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी घणाघात केला आहे.