भाजपाकडून महागाई कमी होईल ही अपेक्षा म्हणजे गाढविणीस विश्वसुंदरीचा किताब मिळण्यासारखं - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 08:13 AM2017-09-25T08:13:06+5:302017-09-25T08:20:44+5:30

भाजपच्या एका शहाण्याने सांगितले की, शिवसेना आता खाल्ल्या ताटात घाण करीत आहे. घाणीत लोळणा-या डुकरांना सदान्कदा घाणच दिसते.

Uddhav Thackeray: Getting the donkey's assurance that the BJP will reduce inflation | भाजपाकडून महागाई कमी होईल ही अपेक्षा म्हणजे गाढविणीस विश्वसुंदरीचा किताब मिळण्यासारखं - उद्धव ठाकरे

भाजपाकडून महागाई कमी होईल ही अपेक्षा म्हणजे गाढविणीस विश्वसुंदरीचा किताब मिळण्यासारखं - उद्धव ठाकरे

googlenewsNext
ठळक मुद्देरेंद्र मोदींच्या नावाने निवडून आले आणि सत्तेच्या खुर्चीवर बसले तेच आज मोदींविरोधात घोषणा देत आहेत.मोदी लाटेवर शिवसेनेचे खासदार-आमदार निवडून आले अशी थाप मारणाऱ्यांनी तुमचे ओंडके २५-३० वर्षे शिवसेनेच्या लाटेमुळेच तरले हे विसरू नये.

मुंबई - भाजपच्या एका शहाण्याने सांगितले की, शिवसेना आता खाल्ल्या ताटात घाण करीत आहे. घाणीत लोळणा-या डुकरांना सदान्कदा घाणच दिसते व घाणच त्यांचे सर्वस्व असते. काही मंडळींचा जन्म हा घाणीतच झाल्याने त्यांच्या मेंदूत व डोळयांत घाणच घाण आहे अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर टीका केली आहे. 

शिवसेनेने शनिवारी मुंबईत रस्त्यावर उतरुन महागाईविरोधात तीव्र आंदोलन केले होते. त्यावर आशिष शेलार यांनी नरेंद्र मोदींच्या नावाने निवडून आले आणि सत्तेच्या खुर्चीवर बसले तेच आज मोदींविरोधात घोषणा देत आहेत. खाल्ल्या ताटात घाण करणारे अशांनाच म्हणतात, असे टि्वट त्यांनी केले होते. त्यावर  मोदी लाटेवर शिवसेनेचे खासदार-आमदार निवडून आले अशी थाप मारणाऱ्यांनी तुमचे ओंडके २५-३० वर्षे शिवसेनेच्या लाटेमुळेच तरले हे विसरू नये अशी जाणीव शिवसेनेने करुन दिली आहे. 

सत्ता म्हणजे गुलामीच्या बेड्या नव्हेत असे मानणाऱ्यांपैकी आम्ही एक आहोत. त्यामुळेच न पटणाऱया अनेक गोष्टींविरोधात परखडपणे बोलण्याचे स्वातंत्र्य आम्ही कायम राखले आहे. शिवसेनेने महागाईविरोधात जोरदार आंदोलन केले व त्याचा भडका शनिवारी मुंबईत उडाला, पण सत्ताधारी पक्षाच्या पिंपळावरील मुंज्यांना मुडद्यांच्या टाळूवरील लोणीही खायचे असल्याने त्यांनी महागाईविरोधी आंदोलनावर घाणेरड्या शब्दांत टीकास्त्र सोडले असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. 

आमदारांची फोडाफोडी हेच ज्यांचे एकमेव धोरण आहे अशा लोकांकडून महागाई कमी करण्याची अपेक्षा करणे म्हणजे गाढविणीस विश्वसुंदरीचा किताब मिळण्यासारखे आहे. महाराष्ट्रात गाढवांचे बुद्धिबळ सुरू आहे व गाढविणी सौंदर्य स्पर्धेत उतरल्या आहेत असे लेखात म्हटले आहे. 

काय म्हटले आहे अग्रलेखात 

- सरकारी खुर्च्यांची ‘दोन फुल्यां’ची मस्ती कोणी शिवसेनेस दाखवू नये. महागाईविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरली याचा इतका जळफळाट करून घ्याल तर त्या जळाजळीत तुमचीच राख होईल. त्यापेक्षा महागाई कमी करा. अर्थात आमदारांची फोडाफोडी हेच ज्यांचे एकमेव धोरण आहे अशा लोकांकडून महागाई कमी करण्याची अपेक्षा करणे म्हणजे गाढविणीस विश्वसुंदरीचा किताब मिळण्यासारखे आहे. महाराष्ट्रात गाढवांचे बुद्धिबळ सुरू आहे व गाढविणी सौंदर्य स्पर्धेत उतरल्या आहेत.

- सत्ता म्हणजे गुलामीच्या बेड्या नव्हेत असे मानणाऱ्यांपैकी आम्ही एक आहोत. त्यामुळेच न पटणाऱया अनेक गोष्टींविरोधात परखडपणे बोलण्याचे स्वातंत्र्य आम्ही कायम राखले आहे. शिवसेनेने महागाईविरोधात जोरदार आंदोलन केले व त्याचा भडका शनिवारी मुंबईत उडाला, पण सत्ताधारी पक्षाच्या पिंपळावरील मुंज्यांना मुडद्यांच्या टाळूवरील लोणीही खायचे असल्याने त्यांनी महागाईविरोधी आंदोलनावर घाणेरड्या शब्दांत टीकास्त्र सोडले आहे. महागाईच्या विरोधात शिवसेनेच्या झेंड्याखाली ठिकठिकाणी हजारो लोक रस्त्यावर उतरले व सरकारच्या नावाने त्यांनी शिमगा केला. ही पोटदुखी आम्ही समजू शकतो, पण ‘महागाई’विरोधात आवाज उठवणे हा राज्यद्रोही, नालायक प्रकार असल्याची उलटी बोंब मारणे म्हणजे जनतेच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखेच आहे. 

- महाराष्ट्रात अशी सुरेमारी झाली असून जनता रक्तबंबाळ होऊन पडली आहे. सामान्य माणसांच्या जीवन-मरणाचा हा प्रश्न आहे व महागाई हा प्रश्नच नसून राजकीय बोंब आहे असे सांगणारे भंपक आहेत. भाजपच्या एका शहाण्याने सांगितले की, शिवसेना आता खाल्ल्या ताटात घाण करीत आहे. घाणीत लोळणाऱया डुकरांना सदान्कदा घाणच दिसते व घाणच त्यांचे सर्वस्व असते. काही मंडळींचा जन्म हा घाणीतच झाल्याने त्यांच्या मेंदूत व डोळय़ांत घाणच घाण आहे. अमेरिकेत वादळ आल्यामुळे हिंदुस्थानात पेट्रोल व डिझेलचे भाव वाढल्याचे तर्कट केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडले. अमेरिकेतील वादळाने युरोप व खुद्द अमेरिकेत भाववाढ झाली   नाही. मग फक्त हिंदुस्थानातच का व्हावी? 

-  मोदींचे राज आल्यापासून विकास दर घसरला आहे, उद्योगधंदा घटला आहे, रोजगार कमी झाला आहे आणि महागाईचा पारा भडकला आहे. अमेरिकेतील वादळामुळे हे सर्व झाले असेल तर दिल्लीचे सरकार त्या वादळात वाहून का गेले नाही? असा प्रश्न सामान्य जनतेच्या मनात निर्माण होऊ शकतो. महाराष्ट्रात व देशात स्वयंपाकाचा गॅस का महागला, भाज्या व कडधान्ये का महागली याचे उत्तर मिळायला हवे. बुलेट ट्रेनचे रूळ टाकल्याने त्यावरून महागाई एक्प्रेस घसरेल व घराघरातून सोन्याचा धूर निघेल अशी फेकाफेक आता राज्यकर्त्यांनी करू नये. लाटणे मोर्चा काढून सरकारला सळो की पळो करणाऱया मृणाल गोरे आज असत्या तर त्यांनी त्याच लाटण्याने सरकारला बेदम चोप दिला असता, पण शिवसेनेच्या रणरागिणीही काही कमी नाहीत. फक्त व्यक्तिपूजेने व सरकारचा उदोउदो करणाऱया फौजांच्या आक्रमक प्रचाराने जनतेच्या जीवन-मरणाचे प्रश्न सुटणार नाहीत. जनतेच्या आंदोलनाचा जोर आणि जोम असा काही विलक्षण आहे की, त्यामुळे निद्रिस्त मने जागी व्हावीत व जागी असलेली पेटून उठून कृतिशील बनावीत. 

- महाराष्ट्रात सर्वच महाग झाले आहे. घरापासून शिक्षणापर्यंत, कोथिंबिरीच्या जुडीपासून साखरेपर्यंत. मग स्वस्त काय झाले? तर सरकारी पक्ष व त्यांच्या एजंटांकडून शिवसेनेस रोज मिळणारे शिव्याशाप व लाखोल्या. आम्ही जनतेसाठी भाजप मंडळींच्या शिव्या खात आहोत व तेच आमचे टॉनिक आहे. हे टॉनिक ज्यास सदैव मिळते ते राजकीय पक्ष व संघटना किमान ५०० वर्षे जगतात, पण सध्या ‘बाळसे’ नावाची सूज धरलेल्या पक्षांना इतके आयुष्य कधी लाभणार आहे काय? मोदी लाटेवर शिवसेनेचे खासदार-आमदार निवडून आले अशी थाप मारणाऱ्यांनी तुमचे ओंडके २५-३० वर्षे शिवसेनेच्या लाटेमुळेच तरले हे विसरू नये. प्रश्न इतकाच आहे की, मोदी लाटेचा इतकाच महिमा असेल तर या लाटेने गरीबांचे प्रश्न का सुटत नाहीत व रोज लोकांना बनवाबनवीच्या टोप्या का घालाव्या लागत आहेत? अमेरिकेतील वादळाने पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले असे तुमचेच मंत्री सांगतात. मग मोदी लाटेच्या नामाने महागाई का कमी होत नाही? सरकारी खुर्च्यांची ‘दोन फुल्यां’ची मस्ती कोणी शिवसेनेस दाखवू नये. 

- तुमच्या बारशाचे पेढे खाणाऱ्यांपैकी शिवसेना आहे व पेढेवाल्यांचे पैसेही आम्हीच दिले आहेत. महागाईविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरली याचा इतका जळफळाट करून घ्याल तर त्या जळाजळीत तुमचीच राख होईल. त्यापेक्षा महागाई कमी करा. अर्थात आमदारांची फोडाफोडी हेच ज्यांचे एकमेव धोरण आहे अशा लोकांकडून महागाई कमी करण्याची अपेक्षा करणे म्हणजे गाढविणीस विश्वसुंदरीचा किताब मिळण्यासारखे आहे. महाराष्ट्रात गाढवांचे बुद्धिबळ सुरू आहे व गाढविणी सौंदर्य स्पर्धेत उतरल्या आहेत.

Web Title: Uddhav Thackeray: Getting the donkey's assurance that the BJP will reduce inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.