शिवसेनेचे (UBT) आमदार शिंदेंच्या संपर्कात; उद्धव ठाकरे म्हणाले, "त्यांना इतकाच सल्ला आहे की..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 22:00 IST2025-03-04T21:58:17+5:302025-03-04T22:00:02+5:30
शिवसेनेचे (यूबीटी) आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चेवर आज उद्धव ठाकरेंनी उत्तर दिले.

शिवसेनेचे (UBT) आमदार शिंदेंच्या संपर्कात; उद्धव ठाकरे म्हणाले, "त्यांना इतकाच सल्ला आहे की..."
गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात पुन्हा पक्षांतराच्या चर्चा सुरू आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे राजन साळवी यांनी पक्षांतर केल्याने या चर्चांना हवा मिळाली. उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेता एकनाथ शिंदे यांनीही ठाकरेंचे काही आमदार आणि खासदार संपर्कात असल्याचे म्हटले आहे. त्यावर आता ठाकरेंनी शिंदेंना राजकीय सल्ला दिला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
उदय सामंत, संजय शिरसाट यांच्यासह शिवसेनेच्या काही नेत्यांकडून सातत्याने ठाकरे गटाचे आमदार प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचे दावे केले जात आहेत. यात माजी आमदार आणि शिवसेनेतील फुटीनंतरही ठाकरेंसोबत राहिलेले राजन साळवी शिंदेंच्या शिवसेनेत गेले. त्यामुळे ठाकरेंच्या सेनेला गळती लागल्याची बोलले जात आहे.
उद्धव ठाकरेंनी शिंदेंना काय दिला सल्ला?
तुमच्या पक्षाचे आमदार आणि खासदार शिंदेंच्या संपर्कात आहेत, अशी चर्चा होत आहे? असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला होता.
या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, "सगळे आमदार माझ्यासोबत आहेत. मी त्यांना (एकनाथ शिंदे) इतकाच सल्ला देऊ इच्छितो की, त्यांनी त्यांचे आमदार सांभाळावेत. कारण ज्या प्रकारे त्यांची परिस्थिती या सरकारने केली आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःला सांभाळावे. ते गाणं आहे ना सपने मैं मिलती है, त्याप्रमाणे नंतर माझे आमदार त्यांच्या (शिंदे) स्वप्नात येतील", असा टोला ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला.
फडणवीसांनी उत्तर दिलं पाहिजे, ते स्वतः गृहमंत्री आहेत -ठाकरे
संतोष देशमुख हत्येचे फोटो मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आधीच आले होते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्याबद्दल उद्धव ठाकरे म्हणाले, "या प्रश्नाचं उत्तर स्वतः मुख्यमंत्र्यांनीच द्यायला पाहिजे. कारण ते स्वतः गृहमंत्री पण आहेत. प्रश्न योग्य आहे. कारण डिसेंबरपासून ही घटना गाजतेय", असे भाष्य ठाकरेंनी केले.
"धनंजय मुंडे यांनी जो राजीनामा दिला आहे, त्यांनी स्वतः कारण दिलं आहे; त्यांच्या तब्येतीचं. मी त्यांच्या तब्येतीबद्दल कोणतंही भाष्य करू इच्छित नाही, कारण कुणाच्या तब्येतीबद्दल चेष्टा करू नये. जशी माझ्या प्रकृतीबद्दल केली गेली होती. मी संस्कार पाळणारा आहे, त्यामुळे तब्येतील बद्दल बोलणार नाही, पण नेमकं खरं कारण काय?", असा सवालही ठाकरेंनी उपस्थित केला.
सरकारने राजीनामा का घेला नाही?
"धनंजय मुंडे म्हणाले प्रकृतीमुळे राजीनामा दिला. अजित पवार म्हणाले नैतिकतेच्या मुद्द्यावर दिला. जर त्यांनी प्रकृतीच्या कारणामुळे दिला असेल, तर इतके फोटो, व्हिडीओ बाहेर आल्यानंतरही त्यांचा राजीनामा का घेतला गेला नाही? याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे", असे ठाकरे म्हणाले.