ठाकरे सरकार अल्पमतात, राज्यपालांनी निर्णय घ्यावा; देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच समोर आले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 10:44 PM2022-06-28T22:44:19+5:302022-06-28T23:32:56+5:30
भाजपाने हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याने आपण त्यावर वेट अँड वॉचची भुमिका घेत असल्याचे जाहीर करत यापासून लांब राहण्याचा प्रयत्न केला होता. परंतू पडद्यामागे देवेंद्र फडणवीस तीनवेळा दिल्लीला जाऊन आले होते.
मविआ सरकारकडे बहुमत राहिलेले नाही, यामुळे मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी भाजपाने केल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर सांगितले.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना आज ईमेलद्वारे भाजपाने पत्र दिले आहे. यामध्ये राज्यातील परिस्थितीचा उल्लेख केला आहे. ज्या बातम्या आम्हाला पहायला मिळत आहेत, त्यानुसार शिवसेनेचे ३९ आमदार राज्याबाहेर आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत त्यांना रहायचे नाही, अशी भुमिका त्यांनी घेतलेली आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
यामुळे मविआ सरकारकडे बहुमत राहिलेले नाही. यामुळे त्यांना बहुमत चाचणी घेण्यास सांगावे, अशी विनंती राज्यपालांना केली आहे. मुख्यमंत्र्यांना फ्लोअर टेस्ट घेण्याचे आदेश द्यावेत. आता राज्यपाल यावर निर्णय घेतील, असे फडणवीस म्हणाले. फडणवीस यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, आशिष शेलार आदी नेते होते.
We have given a letter to the Maharashtra Governor demanding an immediate Floor test: Devendra Fadnavis, Maharashtra LoP and BJP leader, in Mumbai pic.twitter.com/KtZN8cyWBA
— ANI (@ANI) June 28, 2022
पत्रात काय उल्लेख...
- भाजपा-शिवसेनेने एकत्रितपणे निवडणुका लढविल्या होत्या. परंतू निवडणुकीनंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केले.
- शिवसेनेत गेल्या 8-9 दिवसांपासून अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे आणि त्यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत आता आघाडी नको आहे. शिवसेनेचे 39 आमदार ही आघाडी संपुष्टात येण्याच्या बाजूने आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत बहुमत गमावले आहे.
- दुसरीकडे शिवसेनेच्या या आमदारांना धमक्या दिल्या जात आहेत. त्यांचे 40 मृतदेह गुवाहाटीतून परत येतील, असे जाहीरपणे राज्यसभा सदस्य संजय राऊत सांगत आहेत. शिवाय शिवसेनेचे इतरही नेते अशाच प्रकारची धमकीयुक्त भाषा वापरत आहे. यासंदर्भात सर्व पुरावे सोबत जोडले आहेत.
- संसदीय लोकशाहीत सभागृहातील बहुमत ही सर्वोच्च बाब असल्याने आणि त्याशिवाय, ते सरकार अस्तित्त्वात राहू शकत नसल्याने तातडीने मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगावे, ही माझी राज्यपालांकडे विनंती आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे विविध दाखले सुद्धा देण्यात आले आहेत.