"एका महिलेला सरकार इतकं घाबरलं की गुंड पाठवले, राज्यात झुंडशाहीचं सरकार"; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 12:20 PM2022-04-24T12:20:35+5:302022-04-24T12:32:22+5:30
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी फक्त हनुमान चालीसा पठण करण्याची इच्छा व्यक्त केली.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी फक्त हनुमान चालीसा पठण करण्याची इच्छा व्यक्त केली. आता हनुमान चालीसा महाराष्ट्रात म्हटली जाणार नाही, तर मग पाकिस्तानात म्हटली जाणार का? असा सवाल उपस्थित करत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. एका महिलेला हे सरकार इतकं घाबरलं की गुंड पाठवण्यात आले. राज्यात झुंडशाहीचं सरकार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी झुंडशाही सुरू आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुंबईत काल घडलेली गोष्ट मुंबई पोलिसांच्या इतिहासातील सर्वात लाजीरवाणी गोष्ट आहे. झेड सिक्युरिटीमधील व्यक्ती तिथं येतात. ते सांगतात की बाहेर ७०-८० गुंड आहेत. त्यांच्याकडून हल्ला केला जाऊ शकतो. तरीही पोलिसांच्या उपस्थितीतच झेड सिक्युरिटी असलेल्या व्यक्तीवर हल्ला होतो. एकतर पोलिसांचं या हल्ल्याला समर्थन होतं किंवा ते इतके नाकाम झाले आहेत की त्यांना दबावामुळे काहीच करता येत नाही, असा आरोप फडणवीसांनी यावेळी केला. कालच्या घटनेला जबाबदार असणाऱ्या पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे अन्यथा राज्यात कुणीही सुरक्षित नाही हे सिद्ध होईल. जर झेड सिक्युरिटी असलेल्या व्यक्तीला पोलीस सुरक्षित बाहेर काढू शकत नाहीत. पोलिसांसमोर दगड मारले जाणार असतील तर मग अशाप्रकराचं झुंडशाही सरकार मी पाहिलेलं नाही, असंही फडणवीस म्हणाले.
किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो आणि आमचं शिष्टमंडळ केंद्रीय गृहसचिवांची भेट घेणार असल्याचंही फडणवीसांनी सांगितलं.