उद्धव ठाकरेंचा फडणवीसांच्या निर्णयाला दे धक्का; गुजरातच्या कंपनीचं कंत्राट रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 11:43 AM2019-12-03T11:43:46+5:302019-12-03T11:44:49+5:30
मेट्रो कारशेडला स्थगिती दिल्यानंतर आणखी एक मोठा निर्णय
मुंबई: भाजपाला सत्तेपासून दूर राखण्यात यशस्वी ठरलेल्या शिवसेनेनं आता फडणवीस सरकारचे अनेक निर्णय बदलण्यास सुरुवात केली आहे. मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्यानंतर ठाकरे सरकारनं गुजरातमधील इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला दिलेलं ३२१ कोटी रुपयांचं कंत्राट रद्द केलं आहे. फडणवीस सरकारकडून घोड्यांच्या आंतरराष्ट्रीय जत्रेच्या आयोजनाचं कंत्राट गुजरातमधील कंपनीला देण्यात आलं होतं. मात्र यामध्ये गंभीर स्वरुपाच्या आर्थिक अनियमितता असल्याचा ठपका ठेवत हे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र विकास आघाडी सरकारनं घेतला आहे.
२६ डिसेंबर २०१७ रोजी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं अहमदाबादमधील लल्लूजी अँड सन्स कंपनीसोबत करार केला. त्यामुळे नंदूरबारमध्ये होऊ घातलेल्या सारंगखेडा चेतक फेस्टिवलच्या व्यवस्थापनाचं कंत्राट कंपनीला मिळालं. याच कंपनीला याआधी रण उत्सव आणि कुंभ मेळ्याचंही कंत्राट मिळालं होतं. मात्र राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार येताच पर्यटन विभागानं लल्लूजी अँड सन्स कंपनीसोबतचा करार तातडीनं रद्द केला. याबद्दलचे आदेश मुख्य सचिव अजॉय मेहता यांनी काढले.
लल्लूजी अँड सन्स कंपनीला कंत्राट देताना केंद्र सरकारच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आलं. याशिवाय कंत्राटामध्ये आर्थिक अनियमिततादेखील आढळून आल्याची माहिती पर्यटन विभागाचे अवर सचिव एस. लंभाटे यांनी दिली. एमटीडीसीकडून दरवर्षी डिसेंबर महिन्यात घोड्यांच्या जत्रेचं आयोजन केलं जातं. देशातल्या जुन्या जत्रांपैकी एक असणारी ही जत्रा २०१६ पासून आंतरराष्ट्रीय स्तरावर भरवली जाते.