हिवाळी अधिवेशनापूर्वी उद्धव ठाकरेंना बसणार मोठा धक्का?; शिंदे गटाच्या खासदाराचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 12:41 PM2022-11-09T12:41:13+5:302022-11-09T12:41:53+5:30
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसोबतच काँग्रेसचे ४ माजी आमदारही बाळासाहेबांच्या शिवसेनेत येतील असं खासदार कृपाल तुमाने यांनी म्हटलं आहे.
नागपूर - राज्याचं विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असताना अधिवेशनापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंना धक्का बसण्याची शक्यता आहे. त्याबाबत विदर्भातील शिंदे समर्थक खासदार कृपाल तुमाने यांनी मोठा दावा केला आहे. विदर्भात युवासेनेचे अनेक पदाधिकारी आज शिंदे गटात सहभागी झाले. २ महिन्यापासून या कार्यकर्त्यांचा शिंदे गटात समावेश होणार होता. पुढील काळात ८ जिल्हाप्रमुख शिंदे गटात सहभागी होतील असा दावा खासदार कृपाल तुमाने यांनी केला आहे.
खासदार कृपाल तुमाने म्हणाले की, हिवाळी अधिवेशन काळात हे पक्षप्रवेश पार पडतील. हे सर्व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहे. महाराष्ट्राचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आहे. ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनाही शिंदेसोबत यायचं आहे. बाळासाहेबांची खरी शिवसेना आमचीच आहे असा विश्वास शिवसैनिकांना वाटतो. डिसेंबर महिन्यात मोठा पक्षप्रवेश सोहळा नागपूरात होणार आहे. जिल्हाप्रमुखासोबत कार्यकर्त्यांची फळीदेखील शिंदे गटात येतील असं त्यांनी म्हटलं.
त्याचसोबत काँग्रेसचे ४ माजी आमदारही बाळासाहेबांच्या शिवसेनेत येतील. सर्वकाही ठरलं होते. भविष्यात काही खासदार शिंदे गटात येतील. हिवाळी अधिवेशनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूरात येतील तेव्हा हा पक्षप्रवेश सोहळा होईल. आज पूर्व विदर्भातील युवासेनेचे ६ जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले असंही खासदार कृपाल तुमाने यांनी म्हटलं.
विदर्भात ठाकरेंची ताकद कमी करणार?
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेचे ४० आमदार आणि १२ खासदार हे एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना कमकुवत झाली. परंतु आदित्य ठाकरे राज्यभरात दौरे करून संघटना बळकट करण्याचा प्रयत्न करत आहेत. उद्धव ठाकरेही मातोश्री येथून दररोज विविध विभागातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत शिंदे समर्थक ४० आमदारांच्या मतदारसंघात नवं नेतृत्व उभं करण्याच्या दृष्टीने रणनीती आखत आहेत. मात्र आजही शिंदे-ठाकरे गटामध्ये चढाओढ सुरू आहे. त्यात हिवाळी अधिवेशनात विदर्भात ठाकरेंची ताकद कमी करण्याची खेळी शिंदे गटाकडून आखली जात आहे. त्यामुळे विदर्भात येत्या काळात मोठी फूट पडल्याचं चित्र निर्माण होणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"