आठवले, कवाडे, गवई हे बाबासाहेबांच्या विचारांचे खरे शिलेदार; राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर टीका
By आशीष गावंडे | Published: August 14, 2024 05:25 PM2024-08-14T17:25:43+5:302024-08-14T17:26:33+5:30
प्रकाश आंबेडकर यांनी घुमजाव करत स्वबळाचा नारा दिला. त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांना छेद देऊन ज्या पक्षांना पडद्याआडून मदत केली, ते बाबासाहेबांना कदापी आवडले नसते
अकाेला - निष्ठावान शिवसैनिकांसाठी मातेसमान असलेल्या शिवसेना पक्षाला फाेडून गद्दारांची सेना स्थापन करणाऱ्या शिंदे यांच्या सेनेला प्रकाश आंबेडकर खरी शिवसेना मानत असतील तर मागील अनेक वर्षांपासून या राज्यात व देशात बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे काम रामदास आठवले, प्रा.जाेगेंद्र कवाडे व राजेंद्र गवई करीत आहेत असं म्हटल्यास वावगे ठरु नये. प्रकाश आंबेडकरांची सतत बदलणारी भूमिका पाहता रामदास आठवले, प्रा.कवाडे, गवई हेच बाबासाहेबांच्या विचारधारेचे खरे शिलेदार असल्याचा टाेला शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी लगावला.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उध्दवसेनेच्या वतीने शिव सर्वेक्षण अभियान राबविल्या जात आहे. यापृष्ठभूमिवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत अकोला शहरात दाखल झाले असता, त्यांनी बुधवारी आयाेजित पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्यासह महायुती सरकावर टिकेची ताेफ डागली. आम्ही डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला व विचारांना मानताे. लाेकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आमचे घटक होणार हाेते. त्यांना अकाेला लाेकसभा मतदार संघासह एकूण सात जागा दिल्या जाणार हाेत्या. परंतु आंबेडकर यांनी घुमजाव करत स्वबळाचा नारा दिला. त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांना छेद देऊन ज्या पक्षांना पडद्याआडून मदत केली, ते बाबासाहेबांना कदापी आवडले नसते. माणसाला ज्ञान असेल तर त्याचा मान राखून बाेललं गेले पाहिजे अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाचा समाचार घेतला.
दाेन नेत्यांनी भाजपला पाठबळ दिले
लाेकसभेची निवडणूक ही संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांच्या विराेधात हाेती. पंतप्रधान माेदी,गृहमंत्री अमित शाह व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक जिंकण्यासाठी तपास यंत्रणांचा वापर केला. एकीकडे महाराष्ट्र हिताच्या गप्पा करायच्या अन् दुसरीकडे धर्मांध,जातीपातीचे राजकारण करणाऱ्या शक्तींना मदत करायची. लाेकसभा निवडणुकीत भाजपला राज्यातील दाेन नेत्यांचे पाठबळ लाभले. ही बाब जनतेच्या लक्षात आली असल्याचे खा.राऊत यांनी सांगितले.
नितीन विकला गेला नाही,याची सल!
शिवसेनेच्या आमदारांना ५० खाेक्यांची लाच देऊन काही गद्दार गुवाहाटीला पळून गेले हाेते. जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख हे पक्षासाेबत एकनिष्ठ राहिले. नितीन विकल्या गेला नाही,याची सल भाजप व गद्दार सेनेच्या मनात असल्यामुळेच आ.देशमुख यांना ‘एसीबी’च्या माध्यमातून अडचणीत आणन्याचे प्रयत्न केले जात असल्याचे खा.राऊत यांनी स्पष्ट केले.
केंद्रात कुबड्यांचे सरकार
महाराष्ट्राच्या राजकारणात जातीपातीचे विष पेरणाऱ्या भाजपला केंद्रात सर्वसामान्य जनतेने लायकी दाखवली. स्पष्ट बहुमत नसलेल्या भाजपला इतर दाेन पक्षांची मदत घ्यावी लागली. हे कुबड्यांचे सरकार कधीही काेसळू शकते,असे खा.राऊत म्हणाले.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता
तपास यंत्रणांचा गैरवापर करणाऱ्या भाजपला धडा शिकवण्यासाठी महाविकास आघाडीची माेट बांधण्यात आली आहे. नाेव्हेंबर महिन्यात राज्यात उध्दवसेना,काॅंग्रेस व शरद पवार यांचा सहभाग असलेल्या महाविकास आघाडीचीच सत्ता येइल,यात तीळमात्र शंका नसावी,असे खा.राऊत यांनी स्पष्ट केले.