शिवसेना उबाठा गटाचा CM एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल; कुठे गेला तुमचा स्वाभिमान?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 04:25 PM2024-04-02T16:25:56+5:302024-04-02T16:26:26+5:30
Loksabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सगळेच पक्ष तयारीला लागलेत. परंतु अद्यापही महायुतीतील जागावाटप निश्चित झालं नाही. त्यामुळे ठाकरे गटाचे अनिल परब यांनी एकनाथ शिंदेंसह गेलेल्या आमदार, खासदारांवर निशाणा साधला.
मुंबई - Anil Parab on Ramdas Kadam ( Marathi News ) महायुतीत एकमत नाही हे कळतंय. कुणी कुठल्या जागा लढायच्या हे आपसात ठरवू द्या. बाळासाहेबांचे नाव घेऊन एकनाथ शिंदे गेलेत. बाळासाहेबांनी अशा बार्गेनिंगला लाथ मारली असती. ठाण्याच्या जागेसाठीही या लोकांना संघर्ष करावा लागतोय. जी ठाण्याची जागा आनंद दिघेंनी प्रतिष्ठेची खेचून आणली त्यासाठी घामटा निघतोय. मग कुठे गेला बाळासाहेबांचा स्वाभिमान आणि विचार. तुमच्या शपथेला भुलून खासदार, आमदार सोबत आलेत. भाजपा या लोकांना फरफटत नेतंय. कुठे गेला तुमचा स्वाभिमान? असा सवाल उबाठाचे आमदार अनिल परब यांनी विचारला आहे.
अनिल परब म्हणाले की, एकनाथ शिंदेंसोबत जे १३ खासदार दिले, त्यांना पुन्हा खासदार करणारच असं अभय दिलं होतं. ४० आमदार जे शिंदेसोबत गेलेत त्यांना पुन्हा निवडून आणण्याची शपथ त्यांनी घेतली होती. जर यापैकी एकही माणूस पडला तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि शेती करायला जाईन. त्यामुळे आता शिंदेंनी शेतीची अवजारे काढून ठेवावीत. कारण तुमाने यांची उमेदवारी कापली, इतरही वेटिंगवर आहेत, नाशिकची जागा मिळेल की नाही खात्री नाही. त्यामुळे जे गेलेत त्यांना शुभेच्छा देतो. १३ जण गेलेत त्यांच्या जागा आधी राखा, मग निवडणूक आणि त्यानंतर उमेदवारी मग जिंकणे वैगेरे आले. पहिल्या टप्प्यातच गळपटलेत. १३ जागा राखण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच आमच्याकडे सर्व्हेनुसार उमेदवारी मिळत नव्हती. संजय शिरसाट हे शिवसैनिक होते म्हणून तिकीट मिळाली. आता या शिवसेनेत आणि त्या शिवसेनेत काय फरक आहे ते कळेल. ज्या जागा त्यांच्या होत्या मग त्या मिळाल्या पाहिजे. मोदींच्या चेहऱ्यामुळे निवडून आले मग यावेळेला मोदींचा फोटो वापरून निवडून येण्याची हिंमत का नाही? बाळासाहेबांचा वारसा आणि स्वाभिमान त्यांना आता कळू द्या. दरवाजा कुणासाठी उघडायचा कुणासाठी नाही याचे निर्णय पक्षप्रमुख घेतात असं सांगत अनिल परब यांनी मातोश्रीचे दरवाजे या लोकांना उघडे आहेत का या प्रश्नावर उत्तर दिले.
रामदास कदमांचे १२-१३ घोटाळे उघड करणार
दरम्यान रामदास कदम मंत्री, विरोधी पक्षनेते होते, त्यांनी शासकीय पदाचा गैरवापर करून १२-१३ घोटाळे केलेत. ते येणाऱ्या काळात बाहेर काढेन. रामदास कदमांनी स्वत:च्या भावालाही सोडलं नाही. आता काचेची घरे कशी फुटतायेत बघा, रामदास कदमांचे भ्रष्टाचाराचे कागदे किरीट सोमय्यांना देतो, या प्रकरणाची ईडी चौकशीची मागणी करावी. मुंबईतील एसआरए घोटाळे, प्रदुषण मंडळाचा अध्यक्ष असताना केलेले घोटाळे याचा पाठपुरावा करण्याची गरज आहे. सोमय्यांनी मला वेळ दिला तर मी स्वत: त्यांना रामदास कदमांच्या घोटाळ्याची प्रकरणे समजवून सांगायला जाईन असा इशारा अनिल परब यांनी दिला.
त्याशिवाय किरीट सोमय्या कथाकथित महाराष्ट्रातले अण्णा हजारे आहेत. त्यांनी अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आणलीत. खेडच्या प्रकरणात सोमय्यांनी पुढाकार घेतला होता. त्यामुळे रामदास कदमांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे सोमय्यांना पाठवतो. कदमांच्या माणसानेच माझ्याविरोधात माहिती दिली. सोमय्या एवढं जोरात काम करतायेत, त्यामुळे माझ्यावतीने सोमय्यांनी काम करायला हवं असा टोला परबांनी सोमय्यांना लगावला.