"एक दिवस तुम्हाला 'मातोश्री'च्या दारात यावेच लागेल, हे माझं भाकीत नसून..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 12:57 IST2025-03-01T12:57:05+5:302025-03-01T12:57:34+5:30
देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री, त्यांच्याशी जवळीक साधण्याचं काम नाही. ते जे उत्तम गोष्टी करतात त्याबद्दल चांगली भूमिका मांडायला हरकत नाही यालाच लोकशाही म्हणतात असं सांगतात फडणवीस-ठाकरे जवळकीवर संजय राऊतांनी भाष्य केले.

"एक दिवस तुम्हाला 'मातोश्री'च्या दारात यावेच लागेल, हे माझं भाकीत नसून..."
मुंबई - ही तुमची सत्तेमुळे फडफड सुरू आहे. जेव्हा सत्ता जाईल तेव्हा कळेल. एक दिवस तुम्हाला मातोश्रीच्या दारात यावेच लागेल, शिवसेना भवनाच्या दारात उभं राहावे लागेल असं सांगत खासदार संजय राऊत यांनी रामदास कदमांवर घणाघात केला आहे. रामदास कदमांनीउद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत जहरी टीका केली होती. त्याला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे.
संजय राऊत म्हणाले की, आमच्यासारखे लोक पक्षासोबत इमानइतबारे राहिले आहेत त्यांच्याकडे बळ आहे, दिल्लीच्या मोगलांशी हातमिळवणी करून जे महाराष्ट्राचा विध्वंस करणाऱ्या शक्ती आहेत त्यांना रोखण्याची, संपवण्याची ताकद उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला परमेश्वराने दिली आहे. हे तुमचे फडफडणं तात्पुरते आहे. सत्ता आहे म्हणून फडफडणं आहे. एक दिवस तुम्हाला मातोश्रीच्या दारात यावे लागेल. शिवसेना भवनाच्या दारात उभं राहावे लागेल हे माझं भाकीत नसून हा माझा दावा आहे असा टोला त्यांनी रामदास कदमांना लगावला.
तर राजकारणात पैशाचा जोर वाढलेला आहे. ज्याप्रकारे निर्णय देवेंद्र फडणवीस घेत आहेत त्यातून याला बूच लावण्याचं काम सुरू आहे. भ्रष्टाचाराचा पैसा आमदार, नगरसेवक खरेदी विक्रीत वापरला जातोय, त्याला आवर घालण्याचं काम फडणवीस करतायेत. त्यामुळे जे पैशाच्या अपेक्षेने गेले आहेत त्यांना मधल्या मध्ये लटकत राहावे लागणार आहे. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री, त्यांच्याशी जवळीक साधण्याचं काम नाही. ते जे उत्तम गोष्टी करतात त्याबद्दल चांगली भूमिका मांडायला हरकत नाही यालाच लोकशाही म्हणतात असं सांगतात फडणवीस-ठाकरे जवळकीवर संजय राऊतांनी भाष्य केले.
काय म्हणाले होते रामदास कदम?
दरम्यान, फक्त कोकणातूनच नव्हे तर राज्यभरातून अनेक जण शिवसेनेत प्रवेश करतायेत. कोकणात ठाकरेंचा एक आमदार निवडून आलाय. बाकी कोकणातून त्यांची जागा आली नाही. कोकणातून पूर्णपणे उद्धव ठाकरेंना हद्दपार केलेले आहे. भविष्यात महाराष्ट्रातही उद्धव ठाकरे हद्दपार होतील. गंगेत अनेक लोकांनी डुबक्या मारल्या त्या सर्वांनीच पाप केले होते का, ज्यांना कावीळ असते त्यांना जग पिवळं दिसतं. सकाळी उठल्यापासून उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना केवळ एकनाथ शिंदेंच दिसतात, ठाकरेंकडे हम दो, हमारे तीन इतकेच शिल्लक राहतील असं रामदास कदमांनी म्हटलं होते.