"जाहिरात दुरुस्त झाली, पण फडणवीसांचा कान दुरुस्त होण्याची चिन्हं दिसत नाहीत," ठाकरे गटाचा सरकारला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 07:24 AM2023-06-16T07:24:34+5:302023-06-16T07:28:24+5:30
‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या वृत्तपत्रांमधील जाहिरातीवरून मंगळवारी राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचे रण पेटले होते.
‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या वृत्तपत्रांमधील जाहिरातीवरून मंगळवारी राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचे रण पेटले. या पार्श्वभूमीवर, मी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भक्कमपणे सोबत आहोत अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली होती. यानंतर नवी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. दुसरीकडे उपमुख्यमंत्र्यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. दरम्यान, या प्रकरणावरून ठाकरे गटानं सरकारवर पुन्हा एकदा टीकेचा बाण सोडला आहे.
गुरुवारी पालघर येथील एका सरकारी कार्यक्रमातही ‘कानदुखी पार्ट – २’चा भाग पाहायला मिळाला. पालघर येथे पोहोचल्यावर कार्यक्रमाच्या ठिकाणी जाताना आपल्या गाडीत बसण्याचा मुख्यमंत्र्यांचा आग्रह फडणवीस यांनी धुडकावून लावला. जाहिरात दुरुस्त झाली, पण फडणवीसांचा कान दुरुस्त होण्याची चिन्हे काही दिसत नाहीत, असं म्हणत ठाकरे गटानं सामनाच्या संपादकीयमधून निशाणा साधलाय.
काय म्हटलेय अग्रलेखात?
शिंदे व त्यांच्या लोकांनी महाराष्ट्रातील सर्व वर्तमानपत्रांत दिलेल्या जाहिरातींचे हे असे पडसाद महाराष्ट्रात उमटले. फडणवीस यांच्यापेक्षा आपणच महाराष्ट्रात लोकप्रिय असून जनतेचा कौल आपल्यालाच आहे असा ‘टेंभा’ मिरवणारी मुख्यमंत्री शिंदे यांची एक जाहिरात प्रसिद्ध होताच गोंधळ उडाला व भाजपच्या लोकांनी शिंद्यांच्या गटाला बेडूक वगैरे म्हणेपर्यंत मजल गेली. तरीही भाजपचे बावनखणी बावनकुळे म्हणतात, ‘‘सर्वकाही ठीक आहे.’’ एखाद्या औषधाचे जसे साईड इफेक्ट होतात तसे साईड इफेक्ट या जाहिरातीचे झाले, असे म्हणत संपादकीयमधून निशाणा साधण्यात आलाय.
सर्वच जिभा पांगळ्या पडल्या
एकतर भाजपास अचानक लुळेपांगळे झाल्यासारखे वाटले आणि फडणवीस यांची प्रकृती बिघडली. मुख्यमंत्र्यांबरोबरचा त्यांचा कोल्हापूर दौरा त्यांनी रद्द केला. फडणवीस यांचा कान दुखत आहे, असे कारण देण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांबरोबरचे पुढील दोन-तीन दिवसांचे सर्वच कार्यक्रम रद्द करून फडणवीस हे शांत बसले. शिंदे-मिंधे गटाकडून तर एरवी चालणाऱ्या सर्वच जिभा जणू पांगळ्या पडल्या, असे यात नमूद करण्यात आलेय.
फडणवीसांची कानदुखी बरी का होत नाही?
वादग्रस्त जाहिरातीवर फुंकर मारणारी दुसरी नवी जाहिरात शिंदे गटाने देऊनही भाजपची कानदुखी बरी व्हायला तयार नाही. कानाचे दुखणे मनापर्यंत गेले की काय? यावर पुन्हा बावनकुळे मखलाशी करतात, ‘‘जाहिरातीची चूक सुधारली आहे. दुखावलेली मने बरी झाली आहेत.’’ श्रीमान बावनकुळे, सर्वकाही बरे झाले असेल तर फडणवीस यांची कानदुखी का बरी होत नाही? असा सवाल करण्यात आलाय.
गुरुवारी पालघर येथील एका सरकारी कार्यक्रमातही ‘कानदुखी पार्ट – २’चा भाग पाहायला मिळाला. पालघर येथे पोहोचल्यावर कार्यक्रमाच्या ठिकाणी जाताना आपल्या गाडीत बसण्याचा मुख्यमंत्र्यांचा आग्रह फडणवीस यांनी धुडकावून लावला. कधीकाळी याच मुख्यमंत्र्यांच्या गाडीचे चालक बनलेले फडणवीस अशी छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती. पालघरमध्ये मात्र ते स्वतंत्र गाडीतून गेले. याचा अर्थ काय? ‘कानदुखी ते गाडीदुखी’ असा हा प्रवास आहे आणि भाजप-मिंधे सरकारची गाडी रुळावरून घसरत आहे, असाच त्याचा अर्थ आहे. जाहिरात दुरुस्त झाली, पण फडणवीसांचा कान दुरुस्त होण्याची चिन्हे काही दिसत नाहीत, असे म्हणत संपादकीयमधून निशाणा साधण्यात आलाय.