‘उद्धव ठाकरेंनी मोदींची माफी मागितली होती’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 12:41 IST2025-03-19T12:40:04+5:302025-03-19T12:41:22+5:30
उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पुन्हा युतीत येण्यासाठी प्रयत्न करत होते. नोटीस आल्यावर त्यांनी पंतप्रधान मोदी यांची माफी मागितली होती. आम्ही महायुती सरकारमध्ये सामील होऊ, असे त्यांनी तिथे सांगितले. पण, इथे येऊन त्यांनी पलटी मारली आणि...

‘उद्धव ठाकरेंनी मोदींची माफी मागितली होती’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
मुंबई : उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पुन्हा युतीत येण्यासाठी प्रयत्न करत होते. नोटीस आल्यावर त्यांनी पंतप्रधान मोदी यांची माफी मागितली होती. आम्ही महायुती सरकारमध्ये सामील होऊ, असे त्यांनी तिथे सांगितले. पण, इथे येऊन त्यांनी पलटी मारली आणि त्यांचा डाव आम्ही पलटवून टाकला, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
नागपूरच्या घटनेवरून विधान परिषदेत निवेदन देताना शिंदे यांनी उद्धवसेनेवर कडाडून टीका केली. हिंदुत्वाचे आणि बाळासाहेबांचे विचार सोडून खुर्चीसाठी काँग्रेससोबत युती केली. लोकसभा निवडणुकीत दहशतवादी याकुबची कबर कोणी सजवली, पाकिस्तानचे झेंडे कोणी नाचवले? असा सवाल त्यांनी केला. या आरोपामुळे जोरदार खडाजंगी झाली.
अनिल परब दिल्लीत जाऊन कोणाला भेटले?
नोटिसला घाबरून आ. अनिल परब कुठे गेले होते, दिल्लीत कुणाची भेट घेतली, हे मला माहीत आहे. तिथे जाऊन माफी मागितली आणि राज्यात माघारी येऊन पलटी मारली. तुमच्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. मी खुर्चीसाठी काहीच केले नाही. जे केले ते खुलेपणाने केले, असा टोला शिंदे यांनी लगावला.