उद्धव ठाकरेंनी शिंदेंना विचारले होते, बंडखोरी करणार आहात का?; आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 06:51 AM2023-02-23T06:51:12+5:302023-02-23T07:59:29+5:30
"Lokmat Digital Creator Awards 2023: ‘लोकमत डिजिटल क्रिएटर्स अवाॅर्ड’ समारंभात आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट
मुंबई - ‘तुम्ही बंडखोरीच्या विचारात आहात का? तुमच्या मनात काय आहे’, असे आपल्या वडिलांनी (उद्धव ठाकरे) बंडाच्या एक महिनाआधीच एकनाथ शिंदे यांना विचारले होते’, असा गौप्यस्फोट माजी मंत्री, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी बुधवारी ‘लोकमत डिजिटल क्रिएटर्स अवाॅर्ड’ वितरण समारंभात येथे केला.
या शानदार समारंभात लोकमतचे सहव्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा आणि मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी यांनी आदित्य ठाकरे यांची प्रकट मुलाखत घेतली, त्यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केला. तुम्ही बंडखोरीच्या विचारात आहात का, या उद्धव ठाकरे यांच्या प्रश्नात एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी काय उत्तर दिले हे मात्र आदित्य यांनी गुलदस्त्यात ठेवले. आजच्या परिस्थितीत उद्धव-राज ठाकरे एकत्र येणार का, या प्रश्नाचे थेट उत्तर त्यांनी टाळले.
विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागण्याची प्रतीक्षा असताना शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी २० जून २०२२ च्या रात्री बंड केले आणि ते सुरतला रवाना झाले होते. मात्र, त्याच्या बरोबर एक महिना आधी म्हणजे २० मे रोजी उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना बोलावून तुमच्या मनात काय आहे, असे विचारले होते ही बाब आदित्य यांनी या मुलाखतीत उघड केली. शिंदेंच्या मनात तेव्हाच गद्दारीचे चालले होते असा दावाही त्यांनी केला. शिंदे यांच्या संभाव्य बंडाची कल्पना आपण उद्धव ठाकरेंना आधीच दिलेली होती असा दावा तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलीकडेच ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत केला होता. याकडे लक्ष वेधले असता आदित्य यांनी वरील गौप्यस्फोट केला.
२० मे रोजी मी दाओसला गुंतवणूक परिषदेत सहभागी झालो होतो. माझ्या वडिलांनी शिंदे यांना बोलाविले. तेव्हा वडिलांच्या दोन सर्जरी झालेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी बंडाबाबत शिंदेंना विचारले. पक्षातून फुटण्याचे, मुख्यमंत्री बनण्याची संधी आहे का, याचे विचार शिंदेंच्या मनात त्यावेळी चालले होते. त्यांच्यावर मोठा दबावही होता. आपल्या देशात अलीकडे कोणाचा दबाव असतो हे सगळ्यांनाच माहिती आहे असे म्हणत आदित्य यांनी या मुलाखतीत एकप्रकारे भाजपवरही निशाणा साधला.
तुम्ही वरळीत लढा नाही तर मी ठाण्यातून लढतो
शिवसेनेचे आमदार म्हणायचे की, अजित पवार फक्त राष्ट्रवादीच्या आमदारांनाच फंड देतात? यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणतात, ‘अजित पवारांनी या आरोपानंतर अधिवेशनातच कोणाला किती निधी दिला याची यादीच दिली होती. आमदारांना आमच्या काळात खूप फंड दिला. आता त्यांना विचारा, आता फंड नाही, आवाजही दाबला जातोय. हे सगळे आज ना उद्या निलंबित होणार. मी त्यांना आव्हान देतोय, राजीनामा द्या आणि निवडणूक लढा, जनता निर्णय घेईल.
मी मुख्यमंत्र्यांनाही आव्हान दिले आहेच की वरळीतून लढा किंवा मी तुमच्या ठाण्यातून लढतो; पण निवडणूक घेण्याची त्यांच्यात हिंमत नाही. त्यांची गद्दारी लोकांना पसंत पडलेली नाही. त्यामुळेच महापालिकांसह इतर निवडणूक घेण्यास ते भीत आहेत असा टोलाही आदित्य यांनी हाणला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही दोस्त मानता की दुष्मन?
आदित्य ठाकरे : आमचे संबंध आजही चांगले आहेत. त्यांच्या मनात काय आहे माहिती नाही; पण आमचे मन साफ आहे. विचारांची लढाई लढताना वैयक्तिक शत्रुत्व ठेवण्याचे वातावरण आमच्या घरात कधीही नव्हते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचे संबंध कसे होते हे महाराष्ट्र जाणतो.
आपले कुटुंब आज एका संघर्षातून जात असताना उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येतील का?
आदित्य ठाकरे : मी नेहमी धोरणांवर बोलतो. योग्य, अयोग्य याची चर्चा करतो. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबतच्या चर्चा वैयक्तिक आहेत. देशातील स्थिती पाहता स्वत:ला महत्त्व देताना लोक दिसतात. स्वत:च्या पलीकडे अनेक विषय आहेत, जे लोकांसाठी महत्त्वाचे आहेत. इलेक्ट्रिक बस, पायाभूत सुविधा, रस्ते कसे असावेत, मुंबईसारखे असावेत की जोशीमठसारखे असावेत, यावर कुणीही चर्चा करताना दिसत नाही. युती किंवा कुटुंबातील गोष्टी या अंतर्गत असतात. मात्र, सामान्य जनतेच्या समस्यांविषयी कोणीच बोलत नाही.
शिवसेना आणि धनुष्यबाण हे एकनाथ शिंदेंना निवडणूक आयोगाने बहाल करताना २ हजार कोटी रुपयांचा व्यवहार झाला या खा. संजय राऊत यांच्या आरोपाशी आपण सहमत आहात का?
आदित्य ठाकरे : ‘हो सकता है’. लोकही तसे बोलतात. गद्दारांबाबत खोक्यांचे आरोप झालेच होते ना? बरे! आम्ही खोक्यांना हात लावला नाही असे कोणीही म्हटलेले नाही. सर्वोच्च न्यायालयातील लढाई आम्हीच जिंकू. शिंदेंनी केले ते बंड नव्हते. जे झालंय ती गद्दारी आहे. पाठीत सुरा खुपसला. ज्यांनी स्वत:ला विकले आहे, त्यांना थांबवून काय करणार. ज्यांनी आपला आत्मा विकला आहे, त्यांच्याकडून आणखी काय अपेक्षा आहेत